चंदनापुरीत लोकवर्गणीतून साकारले 1 कोटी 10 लाखांचे साईमंदिर! 19 ते 25 तारखेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे केले आयोजन


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील चंदनापुरीमध्ये दीडशे वर्षांपूर्वी साईबाबा काही दिवस वास्तव्यास होते अशी माहिती जुने जाणकार लोक सांगतात. त्यानुसार लोकसहभागातून येथे भव्य-दिव्य असे 1 कोटी 10 लाख रुपये खर्च करून साई मंदिर उभारण्यात आले आहे. शुक्रवारपासून (ता.19) गुरुवारपर्यंत (ता.25) श्री साई मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण, साईधाम पदयात्री निवास लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला चंदनापुरी हे गाव वसलेले आहे. दीडशे वर्षांपूर्वी साईबाबा या गावात काही दिवस वास्तव्यास होते असे गावातील जुने जाणकार लोक सांगत आहे. त्यामुळे गावामध्ये साईबाबांचे मंदिर व्हावे अशी मागणी नागरिकांची होती. त्यानुसार ग्रामस्थांनी 2017 मध्ये लोकसहभागातून साई मंदिर बांधण्यास सुरूवात केली आणि 2023 मध्ये आज भव्य-दिव्य असे साईमंदिर साकारले आहे. यामध्ये सर्व दिंड्या व पायी पदयात्री, स्वच्छतागृह, स्वयंपाकगृह सह निवासाची सुविधा करण्यात आलेली आहे. त्यासाठी एक कोटी दहा लाख रुपयांच्या आसपास खर्च आला आहे. हे साई मंदिर बांधण्यासाठी कौसल्याबाई व अनुसयाबाई शिवाजी रहाणे या दोघींनी पाच गुंठे जागा मोफत दिली आहे. हे मंदिर आज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

सात वर्षांनंतर या साई मंदिराचे काम झाले आहे. त्यामुळे शुक्रवार ते गुरुवार या सात दिवसांत ग्रंथपूजन व पारायण सोहळा, श्री साईचरित्र वाचन, श्री मूर्तीची भव्य शोभायात्रा, दररोज संध्याकाळी सात ते नऊ कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी श्री साई मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण, साईधाम पदयात्री निवास लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. याचबरोबर पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून जाणार्‍या-येणार्‍या सर्व दिंड्यांना याठिकाणी हमखासपणे थांबता येणार आहे. तरी कार्यक्रमासाठी तालुक्यातील भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन चंदनापुरी ग्रामस्थांनी केले आहे.

Visits: 120 Today: 3 Total: 1111973

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *