श्रीरामपूरमध्ये मोबाईल हिसकावणार्‍या दोघांना केले जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 85 हजारांचा मुद्देमाल जप्त


नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
शहर व परिसरात मोटारसायकलवर येवून मोबाईल हिसकावणार्‍या दोघांना जेरबंद करण्यात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. यामुळे गुन्हेगारी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, वैशाली चंद्रकांत गोर्‍हे (वय 27, रा. इंदिरानगर, श्रीरामपूर) या अशोकनगरकडे जात असताना पाठीमागून येणार्‍या विना क्रमांक पल्सर मोटारसायकलवरील अनोळखी दोन इसमांनी त्यांचा मोबाईल हिसकावून नेला होता. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस पोलिसांत गुरनं. 29/2022 भादंवि कलम 392, 34 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. याची दखल घेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक़ दिनेश आहेर यांना पथक नेमून तपास करण्याचा आदेश दिला होता.

त्यानुसार पोलीस निरीक्षक आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोहर गोसावी, पोलीस नाईक रवींद्र कर्डिले, पोलीस कॉन्स्टेबल आकाश काळे, मयूर गायकवाड व चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल उमाकांत गावडे यांचे पथक नेमून तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. हे पथक श्रीरामपूर परिसरात मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक आहेर यांना रामदास लक्ष्मण थोरात (रा. भोकर, ता. श्रीरामपूर) हा चोरीचे मोबाईल वापरतो अशी माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती पथकास कळवून पंचांना सोबत घेवून कारवाईचे आदेश दिले.

पथकाने तत्काळ रामदास थोरात याच्या घरी जावून त्यास ताब्यात घेतले. पंचासमक्ष त्यांची झडती घेतली असता त्याच्याकडे काळ्या रंगाचा सॅमसंग कंपनीचा ए-51 मोबाईल फोन मिळून आला. याबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा मोबाईल प्रकाश रमेश चाबुकस्वार (रा. भोकर, ता. श्रीरामपूर) याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. त्यानंतर चाबुकस्वार यालाही त्याच्या राहत्या घराजवळून बजाज पल्सर मोटारसायकलसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे मोबाईलबाबत विचारपूस केली असता त्याने चोरीचा मोबाईल त्याचे साथीदार ज्ञानेश्वर ऊर्फ आरुष गणपत शिडुते (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) व योगेश सीताराम पटेकर (रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर) या दोघांनी विक्री करण्यासाठी दिले असल्याची कबुली दिली. त्यानंतर शिडुते व पटेकर यांचा शोध घेतला परंतु ते मिळून आलेे नाही. ताब्यात घेतलेल्या रामदास लक्ष्मण थोरात व प्रकाश चाबुकस्वार या दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी चोरीस गेलेला 10 हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल व 75 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल असा एकूण 85 हजाराचा मुद्देमालासह ताब्यात घेतला. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.

सदर कारवाईत अटक केलेला प्रकाश रमेश चाबुकस्वार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध अहमदनगर जिल्ह्यात विनयभंग व गंभीर दुखापत करणे असे 2 गुन्हे दाखल आहेत. मात्र, पोलिसांनी केलेल्या कारवाईने अवैध धंदे चालकांसह गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Visits: 4 Today: 1 Total: 29255

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *