मुळा धरणाचा उपयुक्त पाणीसाठा पन्नास टक्क्यांवर! पावसाचा जोर ओसरला; भंडारदर्‍यातही साचले 83 टक्के पाणी..


नायक वृत्तसेवा, अकोले
गेल्या बारा दिवसांपासून जिल्ह्यातील तिनही मोठ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्राला झोडपून काढणार्‍या पावसाचा जोर आता पूर्णतः ओसरला असून धरणातील पाण्याची आवकही मंदावली आहे. मात्र वरुणराजाने अवघ्या बारा दिवसांतच जिल्ह्याच्या चिंता दूर सारतांना तिन्ही धरणांचे पाणीसाठे समाधानकारक स्थितीत पोहोचवले असून जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या मुळा धरणाचा उपयुक्त पाणीसाठा पन्नास टक्क्यांच्या पुढे गेला आहे तर उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेले भंडारदरा धरणही 83 टक्के भरले असून वेळापत्रकानुसार धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यात करण्यासाठी 1 हजार 257 क्युसेक्सचा विसर्ग सोडला जात आहे. निळवंडे धरणाची पाणीपातळी रविवारी पन्नास टक्क्यांवर जाण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील या तिनही मोठ्या धरणांच्या लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


दीर्घकाळ ओढ दिल्यानंतर गेल्या 19 जुलैरोजी आषाढी एकदशीच्या पूर्वसंध्येला धरणांच्या पाणलोटात पावसाचे जोरदार पुनरागमन झाले होते. तेव्हापासून शुक्रवारी सायंकाळपर्यंत पाणलोट क्षेत्रात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात आषाढसरींचे तांडव सुरु होते. त्यामुळे खपाटीला चाललेल्या तिनही धरणांतील पाणीसाठ्यात गेल्या बारा दिवसांतच समाधानकारक वाढ झाली. मात्र शुक्रवारपासून मुळा, प्रवरा व कृष्णवंती या तिनही नद्यांच्या पाणलोटातील पावसाचा जोर जवळपास ओसरला असून अधुनमधून कोसळणार्‍या आषाढसरी आणि मध्येच उघडीप असा खेळ सुरु झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात सततचा पाऊस कोसळत असल्याने परिसरात प्रचंड गारठा निर्माण झाला असून आदिवासी बांधवांच्या मनात आपल्या जनावरांची काळजी दाटली आहे.


पुनरागमनात जोरदार जलधारांच्या माध्यमातून मुळेचे पात्र फुगवणार्‍या वरुणराजाने जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण म्हणून परिचित असलेल्या 26 हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मुळा धरणाचा उपयुक्त पाणीसाठा आज सकाळी सहा वाजता 50 टक्क्यांवर तर एकूण पाणीसाठा 59 टक्क्यांवर नेला आहे. सध्या धरणात 4 हजार 643 क्युसेक्स वेगाने पाणी दाखल होत असून पावसाचा जोर ओसरल्याने त्यात घट झाली आहे. मागील बारा दिवसांपासून सातत्याने हरिश्‍चंद्रगडावर कोसळणार्‍या जलधारांनी आता विश्रांती घेतली असून अधुनमधून आषाढसरींचा फेर सुरु आहे. पावसाला पुन्हा जोर चढेल असा मुळा खोर्‍यातील आदिवासी बांधवांचा कयास आहे.


  उत्तर नगरजिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा आता थेट 83 टक्के झाला असून वेळापत्रकानुसार धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विद्युतगृहासह धरणाच्या मोरीतून एकूण 1 हजार 257 क्युसेक्स पाणी सोडले जात आहे. धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने अप्पर मोरीद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने पर्यटकांना प्रेमात पाडणारा छत्री धबधबा (अंम्ब्रेला फॉल) सुरु झाला असून भंडारदर्‍याच्या उद्यानात पर्यटकांची मांदीयाळी अनुभवण्यास मिळत आहे. शुक्रवारपासून पावसाचा जोर ओसरला असला तरीही परिसरातील सह्यकड्यावरुन घरंगळणारे पाण्याचे ओहोळ अजूनही आवेशात वाहत असल्याने पर्यटकांचा ओढा टिकून आहे. घाटघर परिसरात दाट धुके आणि त्यात हरवलेला कोकणकडा पाहण्यासाठीही पर्यटक मोठ्या संख्येने घाटघरच्या दिशेने जात असून शनिवार व रविवार वनविभागाच्या हद्दित प्रवेश करण्यास मनाई असल्याने अनेकांचा आज हिरमोडही झाला आहे.


निळवंडे धरणाच्या पाणलोटातील कळसूबाईच्या शिखरांवरील पाऊसही थांबला आहे. अधुनमधून कोसळणार्‍या आषाढसरी वगळता पावसाने विश्रांती घेतल्याने वाकी जलाशयाच्या भिंतीवरुन कोसळणारा प्रवाह कमालीचा मंदावला आहे. सध्या या जलाशयाच्या भिंतीवरुन 789 क्युसेक्सचा प्रवाह निळवंड्याच्या जलसाठ्यात विसावत असून त्यात भंडारदर्‍यातून सोडलेले पाणीही मिसळत असल्याने निळवंड्याचा पाणीसाठा हलता आहे. गेल्या चोवीस तासांत निळवंडे धरणात भंडारदर्‍यापेक्षा अधिक पाणी जमा झाले आहे हे विशेष. अकोले तालुक्याचा पश्‍चिम घाटमाथा पावसाने चिंब भिजत असला तरीही उत्तरेकडील आढळा धरण समूहासह भोजापूरच्या पाणलोटाला मात्र अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा असून जलसाठ्यातील किरकोळ वाढ वगळता या धरणांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात नवीन पाण्याची आवक झालेली नाही. त्यामुळे पशिचमेकडे हसू तर उत्तरेकडे असू अशी विरोधाभासी स्थिती सध्या तालुक्यात दिसत आहे.

गेल्या चोवीस तासांत भंडारदरा येथे 57 मि.मि., घाटघर येथे 40 मि.मि., रतनवाडी येथे 29 मि.मि., पांजरे येथे 27 मि.मि., वाकी येथे 30 मि.मि. व निळवंडे येथे अवघ्या 05 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामूळे भंडारदर्‍यात 228 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक होवून धरणसाठा 9 हजार 148 दशलक्ष घनफूट (82.87 टक्के), निळवंड्यात 244 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक होवून जलसाठा 3 हजार 790 दशलक्ष घनफूट (45.51), आढळा धरणात अवघे दोन दशलक्ष घनफूट पाणी दाखल होवून जलसाठा 509 दशलक्ष घनफूट (47.83 टक्के), भोजापूर धरणात मात्र अद्याप नवीन पाण्याची प्रतीक्षा असून पाणीसाठा उणे आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मुळा धरणात गेल्या 24 तासांत 625 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली असून एकूण धरणसाठा 15 हजार 251 दशलक्ष घनफूट (58.68 टक्के) झाला आहे.

Visits: 17 Today: 1 Total: 147732

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *