संगमनेर बसस्थानकाजवळील बेकायदा रिक्षाथांबा बंद करा! बजरंग दलाची मागणी; शहरात बेकायदा रिक्षा आणि थांब्यांची भरमार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
असंख्य अनधिकृत आणि भंगारातील रिक्षांचा वापर करुन त्याद्वारे प्रवाशांची धोकादायक पद्धतीने वाहतूक करणार्‍या रिक्षांची संगमनेरात सध्या चलती आहे. गेल्याकाही वर्षात उपप्रादेशिक परिवहन व पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शहरात अशा रिक्षांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने अंतर्गत वाहतुकीचा प्रश्नही मोठा गंभीर बनला आहे. अचानक वाढलेल्या या संख्येने मनाला वाट्टेल तेथे रिक्षाथांबे निर्माण झाले असून रस्ता, त्यावरील वर्दळ आणि पादचार्‍यांना वेठीस धरण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. हॉटेल काश्मिर समोरील रिक्षाथांबा तर नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असून आतातर याच परिसरातून माणुसकीला काळीमा फासण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे उद्दिग्न झालेल्या बजरंग दलाने शहरातील सर्व प्रवासी रिक्षांची परवाना तपासणी आणि बेकायदा रिक्षांच्या जप्तीची मोहीम राबवण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासह शहर पोलीस व नगर पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यावर कारवाई न झाल्यास त्या विरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

काही वर्षांपर्यंत ‘सुसंस्कृत’ म्हणून जिल्ह्यात ओळख असलेल्या संगमनेरात असंख्य बेकायदा आणि अनधिकृत गोष्टींचा शिरकाव झाला आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्याची थेट जबाबदारी असलेल्या यंत्रणा मात्र त्याकडे डोळेझाक करीत असल्याने शहरातील गुन्हेगारी घटनांसह बकालपणा वाढून सुसंस्कृत हा शब्द केवळ उच्चारण्यासाठीच शिल्लक राहिला आहे. मागील काही वर्षात अचानक वाढलेल्या असंख्य रिक्षा सुद्धा गांभीर्याने चिंतनाचा विषय असून महानगरांमध्ये कालबाह्य ठरलेल्या, भंगारात निघालेल्या मात्र संगमनेरातील रस्त्यारस्त्यावर दिसणार्‍या या रिक्षांचा वापर कसा आणि कशासाठी होतोय याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचा गंभीर प्रकार सध्या शहरात पदोपदी दिसून येत आहे.

वास्तविक शहरातंर्गत वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी पोलिसांची तर अधिकृत रिक्षा थांबे निर्माण करण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे. मात्र या दोन्ही घटकांना या गोष्टींचे कोणतेही सोयरसुतक नसल्याने शहराची रया रसातळाला गेली आहे. शहरातील चौकाचौकात परवानाच नसलेल्या, भंगारातील अशा असंख्य रिक्षा धारकांनी परस्पर मनाला वाटेल तेथे थांबे तयार केले आहेत. मग त्यात गजबजलेला चावडीचा परिसर असो अथवा अशोक चौकातील महादेव मंदिर असा कोणताही परिसर या बेकायदा रिक्षाचालकांच्या तावडीतून सुटलेला नाही. बसस्थानका जवळील हॉटेल काश्मिर जवळचा शहरातील सर्वात मोठा रिक्षा थांबा तर हजारो नागरिक आणि वाहनधारकांना दररोज त्रासदायक ठरत असतानाही आजवर येथील मुजोर रिक्षाचालकांवर कारवाईसाठी यंत्रणेतील घटक धजावलेला नाही.

बसस्थानकाकडून अकोले व तालुक्याच्या ग्रामीण भागात जाण्यासाठी असलेल्या या प्रचंड वर्दळीच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला असंख्य रिक्षा मनमानी पद्धतीने उभ्या राहतात. आपला हा बेकायदा तळ आज नाहीतर उद्या हटविला जाईल हे माहिती असल्याने येथील रिक्षाचालकांनी एका राजकीय धुरिणाच्या अराजकीय संघटनेचा बॅनर लावून त्याखाली आपला हा ‘तळ’ उभा केला आहे. यापूर्वी तो येथून हटविण्यासाठी तत्कालीन पोलीस निरीक्षक श्यामकांत सोमवंशी यांनी पुढाकार घेतला होता. मात्र त्यांच्यावर राजकीय दबाव आल्याने त्यांना त्यापासून परावृत्त व्हावे लागले होते. पालिका अशा बेकायदा कृत्यांना समर्थन करीत असेल तर शहराची वाहतूक व्यवस्था कधीही सुरळीत होवू शकत नाही असे त्यांचे स्पष्ट म्हणणे होते, म्हणूनच त्यांनी पालिकेच्या सिग्नल व्यवस्थेला कर्मचारी देण्यास नकार दिला आणि पालिकेनेही केवळ हा बेकायदा रिक्षाथांबा कायम ठेवण्यासाठी सामान्य जनतेच्या 35 लाख रुपये किंमतीच्या सिग्नल व्यवस्थेचा कचरा केला, या गोष्टी कधीही लपून राहिलेल्या नाहीत.

तेव्हापासून येथील रिक्षाचालकांच्या मुजोरीत प्रचंड वाढ झाली असून मनाला येईल तशा रिक्षा उभ्या करणे, अचानक वळण घेणे, अरुंद रस्ता व प्रचंड वाहतूक असल्याचे माहिती असूनही दुहेरी रिक्षा उभ्या करणे, घोळक्याने भररस्त्यात उभे राहणे असे कितीतरी प्रकार येथे नित्याचे आहेत. त्यातून दिवसभरात अनेकदा वाहतुकीचा खोळंबाही होतो आणि अनेक वाहनचालकांशी त्यांची हुज्जतही होते. मात्र कोणी त्यांच्याशी वाद घातला की सगळे रिक्षावाले एकाचवेळी ‘झुंडीने’ गोळा होत असल्याने एकटा-दुकटा वाहनचालक त्यांच्या नादालाच लागत नाही अशी येथील या बेकायदा रिक्षा थांब्याची अवस्था आहे. वास्तविक या रस्त्यावरील वाहतुकीचा बोजा पाहता येथील रिक्षाथांबा कोणत्याही परिस्थितीत हटविण्याची गरज आहे, मात्र त्यांच्या मनमानीला राजकीय वलय प्राप्त असल्याने आजवर पोलीस निरीक्षक सोमवंशी वगळता एकाही अधिकार्‍याने त्यांच्या वाट्याला जाण्याचा साधा प्रयत्नही केल्याचे ऐकीवात नाही.

सोमवारी (ता.8) तर या बेकायदा थांब्यावरील रिक्षाचालकांचा माणुसकीला काळीमा फासणारा संतापजनक प्रकार समोर आला. दुपारच्या वेळी या परिसरातून जाणार्‍या एका अल्पवयीन मुलीला उन्हाचा तडाखा बसल्याने तिला भोवळ येवून ती भरउन्हात रस्त्यावर पडली. यावेळी समोरच्या बाजूला रस्ता आडवून तंबाखू चोळणारे आणि गप्पा मारीत एकमेकांना टाळ्या देणारे असंख्य रिक्षाचालक हा प्रकार बघत होते, मात्र त्यांच्यातील माणुसकी कधीही यमलोकी गेल्याने त्यातील एकही माणूस त्या लहानशा मुलीच्या मदतीसाठी पुढे सरसावला नाही. सुदैवाने त्याचवेळी तेथून जात असताना एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष योगेश सूर्यवंशी, बजरंग दलाचे विशाल वाकचौरे व दीपक रणशेवरे यांनी हा प्रकार पाहिला आणि त्यांच्या काळजाला पाझर फुटला.

त्यांनी लागलीच आपल्या दुचाकी बाजूला उभ्या करीत जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत असलेल्या त्या मुलीला तेथून सावलीत नेले व तिला पाणी पाजून शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही ती लहानशी मुलगी अस्वस्थच असल्याने तिला रुग्णालयात नेण्यासाठी सूर्यवंशी यांनी तेथील रिक्षाचालकांना विनंती केली, मात्र मुजोर बनलेल्या त्या रिक्षाचालकांनी त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला. विशेष म्हणजे त्यावेळी सूर्यवंशी यांनी संबंधित रिक्षाचालकांना हवे ते भाडे देण्याचीही तयारी दाखवली, मात्र त्यानंतरही त्यांच्या काळजाला पाझर फुटू शकला नाही. अखेर त्या तिघाही जणांनी रस्त्याने जाणार्‍या अन्य एका रिक्षाला आडवे होवून ती रिक्षा थांबवली व त्यातून त्या मुलीला सुरुवातीला तिच्या घरी व त्यानंतर तिच्या आई-वडिलांसह तिला रुग्णालयात नेले व तिच्यावर उपचार घडवून आणले.

हा प्रकार रस्त्याने जाताना पाहणार्‍यांनाही संताप देवून गेला, मात्र त्याचा कोणताही परिणाम येथील मने मेलेल्या रिक्षाचालकांवर झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे अशा रिक्षा चालकांविरोधात आता एकलव्य संघटनेसह विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने पुढाकार घेतला असून सोमवारीच त्यांनी श्रीरामपूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासह संगमनेर शहर पोलीस ठाणे व संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना संयुक्त निवेदन दिले आहे. या निवदेनातून हॉटेल काश्मिर समोरील रिक्षाथांबा आणि तेथे उभ्या राहणार्‍या असंख्य रिक्षांची वस्तुस्थिती मांडण्यात आली आहे.

येथे असलेल्या बहुतेक रिक्षा प्रवाशी वाहतुकीचा परवाना नसलेल्या, महानगरांमध्ये कालबाह्य झालेल्या असल्याचे व रिक्षाचालकांना कोणताही अधिकृत बॅच-बिल्ला नसल्याचे तक्रार वजा निवेदनातून सांगण्यात आले आहे. अनेकवेळा येथील रिक्षाचालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी कोंबून महिला व विद्यार्थिनींना जाणीवपूर्वक पुढच्या सीटवर बसवत असल्याचा व फावल्या वेळेत भररस्त्यात झुंडीने थांबून रस्त्याने जाणार्‍या महिलांची छेडछाड केली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यातून करण्यात आला आहे. येथील हा बेकायदा रिक्षा थांबा कायमस्वरुपी बंद करुन शहरातील सर्व प्रवासी रिक्षांचे परवाने तपासणी व पालिकेकडून अधिकृत रिक्षाथांबे व तेथील रिक्षांची संख्या याबाबत स्पष्टता करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा या तिन्ही संघटना शहरातील बेकायदा रिक्षा आणि त्यांच्या अनधिकृत थांब्यांच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभे करील असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनातून यंत्रणेतील घटकांच्या मनातील माणुसकीचे दर्शन घडणार असल्याने त्यांच्या कारवाईकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.


राजकीय वलय प्राप्त असलेल्या हॉटेल काश्मिर समोरील रिक्षा थांब्याचा हजारो संगमनेरकरांना दररोज मोठा त्रास सहन करावा लागतो. हा रिक्षाथांबा येथून हटवू नये यासाठी सामान्य संगमनेरकरांच्या करातून 35 लाख रुपये खर्च करुन उभारलेली सिग्नल व्यवस्था जागेवरच सडून गेली. आता तर या थांब्यावरील रिक्षाचालकांकडून मानवतेची पायमल्ली आणि महिला, मुलींच्या छेडछाडीच्या गोष्टीही घडत असल्याचे गंभीर आरोप लावले गेल्याने आतातरी कर्तव्याची शपथ घेवून पदावर बसलेले अधिकारी या अतिशय गंभीर विषयाकडे गांभीर्याने पाहतील अशी आशा संगमनेरकरांना आहे.

Visits: 42 Today: 1 Total: 118369

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *