संगमनेर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नितीन ओझा! वार्षिक सर्वसाधारण सभा; उपाध्यक्षपदी सतीश आहेर, कोषाध्यक्ष पदी निलीमा घाडगे तर सचिवपदी सुनील महाले यांची निवड..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील बहुतेक पत्रकारांचा समावेश असलेल्या संगमनेर श्रमिक पत्रकार संघाच्या नूतन अध्यक्षपदी नितीन ओझा (एबीपी माझा) यांची आज सर्वानुमते निवड करण्यात आली. संघाच्या आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आगामी वर्षभरासाठी या निवडी करण्यात आल्या. यावेळी संघाच्या उपाध्यक्षपदी सतीश आहेर (महानगर), कोषाध्यक्षपदी निलीमा घाडगे (केसरी) तर सचिवपदी सुनील महाले (आनंद) यांची एकमताने निवड झाली आहे.

विविध प्रसिद्धी माध्यमांसाठी काम करणार्या संगमनेरातील सक्रिय पत्रकारांचे सर्वात मोठे संघटन असलेल्या श्रमिक पत्रकार संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी संघाचे मावळते अध्यक्ष गोरक्षनाथ मदने (नायक/सी न्यूज) यांनी गेल्या वर्षभरात पत्रकार आणि समाजाला केंद्रस्थानी ठेवून संघटनेकडून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा धावता आढावा घेतला. कोविड संक्रमणाच्या काळाचा उल्लेख करतांना त्यावेळी शहरातील पत्रकारांनी समाजासाठी बजावलेल्या भूमिकेचे कौतुक केले. मानवतेची परिक्षा पाहणार्या त्या काळात रुग्णांना खाटा, ऑक्सिजन, उपचार व लस मिळवून देण्यासाठी पत्रकार संघटनेने केलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी विविध दाखल्यांसह ऊहापोह केला.

मावळते उपाध्यक्ष गोरक्ष नेहे (पुढारी) यांनी वर्षभर संघटनात्मक पातळीवर राबविलेल्या विविध उपक्रमांमधून पुरुषार्थाचे समाधान मिळाल्याचे सांगितले. संघाने राबविलेला प्रत्येक उपक्रम समाज आणि पत्रकार यांना केंद्रीत ठेवूनच झाल्याने त्याला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. मावळते सचिव संजय आहिरे (युवावार्ता) यांनी पत्रकार समाजाचे देणं लागतो या भावनेतून समाजाचे लोकप्रतिनिधीत्व करणार्यांसाठी सदृढ लोकशाहीच्या अनुषंगाने संघाने आयोजित केलेल्या सारंग कामतेकर यांच्या व्याख्यानाचा उल्लेख त्यांनी केला.

नूतन अध्यक्ष नितीन ओझा यांनी प्रमाणिकपणे सतत काहीतरी उपक्रम राबवणार्या संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळणं गौरवास्पद असल्याचे सांगितले. दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या मदतीसाठी एकवटलेल्या पत्रकारांच्या समुहातून या संघटनेचा जन्म झाल्याची आठवणही त्यांनी करुन दिली. यापूर्वीच्या सर्व पदाधिकार्यांनी संघाचे कार्य अतिशय उंचावर नेवून ठेवले आहे, त्याचे स्थान अबाधित ठेवण्याची जबाबदारी आता आपल्या टीमवर आल्याचे सांगत अत्यंत तोकड्या मानधनावर जोखमीचे काम करणार्या पत्रकारांसाठी संघाच्यावतीने अपघात विमा काढण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या सर्वसाधारण सभेला नूतन व मावळत्या पदाधिकार्यांसह श्याम तिवारी (नायक), आनंद गायकवाड (सकाळ), शेखर पानसरे (लोकमत), सचिन जंत्रे (पुण्यनगरी), अमोल मतकर (प्रभात/न्यूज स्टेट), सोमनाथ काळे (गांवकरी/सार्वमत), अंकुश बुब (सार्वमत), धिरज ठाकूर (प्रवरातीर), काशिनाथ गोसावी (प्रेस फोटोग्राफर), मंगेश सालपे (नगर सह्याद्री), संदीप वाकचौरे (मुक्त), भारत रेघाटे (भास्कर), सुशांत पावसे (सार्वभौम) व संजय साबळे (आकर्षण) आदी पत्रकार उपस्थित होते.

