बातमीदार म्हणजे पत्रकारितेचा खरा ‘आत्मा’ आहे : सुनील माळी संगमनेर श्रमिक पत्रकार संघाची कार्यशाळा; बदलत्या पत्रकारितेवर विविध वक्त्यांचे भाष्य..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पत्रकारिता क्षेत्रात असलेली प्रत्येक व्यक्ती कधीही सर्वज्ञ नसते, तर ती नेहमी विद्यार्थ्याच्या भूमिकेत शिकत असते. पत्रकाराचे क्षेत्र हे नेहमीच जिवंत आणि रसरशीत असे असते. महाविद्यालयीन जीवनात सोबत असलेल्या बर्याच पत्रकारांच्या अन्य मित्रांनी वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रात जावून लाखों रुपये पगाराच्या नोकर्या मिळवल्या असतील, परंतु पत्रकारिता क्षेत्रातील रोजचे वैविध्य, जिवंतपणा, ताजेपणा, रोज मिळणारे समाधान आणि बातम्यांमधून घडलेला बदल पाहून मिळणारी कृतकृत्यता याचे मोल मोठ्या पगाराशी होवू शकत नाही. पत्रकाराची वृत्ती नेहमी बातमीदाराची असायला हवी, कारण बातमीदार हाच पत्रकारितेचा खरा आत्मा असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक सुनील माळी यांनी केले.

संगमनेर श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या एकदिवसीय पत्रकार कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात ‘आजच्या पत्रकारितेसमोरील आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते. या कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ संपादक, प्रकाशक घनश्याम पाटील यांच्या हस्ते झाले तर, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर होते. संघाचे अध्यक्ष गोरक्षनाथ मदने, उपाध्यक्ष गोरक्ष नेहे, सचिव संजय अहिरे व प्रकल्पप्रमुख संदीप वाकचौरे मंचावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना माळी पुढे म्हणाले की, बातमीदारीची नशा आणि त्यातून मिळणारी श्रमसाफल्याची भावना अन्य कोणत्याही क्षेत्रातून मिळू शकत नाही. पूर्वीच्या काळी बातम्यांसाठी फार मर्यादित क्षेत्रे होती. मात्र अलिकडच्या काळात बातम्यांचा आयाम पूर्णतः बदलल्याने बातमीचे विषयही मोठ्या प्रमाणात विस्तारले आहेत. आधी केवळ छपाई होवून येणार्या माध्यमांसाठीच बातमीदारी केली जात असे, आता त्याला इलेक्ट्रॉनिक, डिजिटल व समाज माध्यमांचीही जोड मिळाल्याचे त्यांनी सांगितले. केवळ छपाई माध्यमं असताना आज घडलेल्या एखाद्या घटनेची माहिती दुसर्या दिवशी सकाळी वृत्तपत्र हाती पडल्यावरच लोकांना समजत असे. पण आता घटनेनंतर अवघ्या काही तासांतच ती माहिती सर्वत्र पसरत असल्याने मुद्रित माध्यमात काम करणार्या पत्रकारांनी त्यापुढे जाण्याची, विश्लेषणात्मक बातम्यांची कास धरण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे उद्घाटक घनश्याम पाटील यांनी आजच्या पुढार्यांनी ‘नायक’ होणं पत्रकारांसमोरील सर्वात मोठे आव्हान असल्याचे सांगितले. राज्यातील मोठी भांडवलदारी वृत्तपत्र ग्रामीण पत्रकारांना अतिशय तोकडे मानधन देतात. अशा स्थितीत ‘त्या’ पत्रकारांकडून काही वेगळं अथवा चांगलं मिळण्याची अपेक्षा कशी केली जावू शकते असा सवालही त्यांनी उपस्थित केला. एकीकडे भांडवलदारांची वृत्तपत्र कोट्यवधीची कमाई करीत असताना दुसरीकडे त्या वृत्तपत्राचा आत्मा असलेल्या बातमीदारासाठी काहीही केले जात नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. आजच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांच्या लेखणीमध्ये शाईपेक्षा घाई अधिक असल्याचे दिसते. ही घाई किती जणांचे आयुष्य उध्वस्त करते याचा मात्र विचार होत नसल्याचे सांगत अशा माध्यमांमुळे पत्रकारितेची विश्वासार्हता कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यशाळेच्या दुसर्या सत्रात इलेक्ट्रॉनिक माध्यमांची दशा आणि दिशा या विषयावर ज्येष्ठ वृत्तनिवेदक मिलिंद भागवत यांचे व्याख्यान झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मयूर ज्वेलर्सचे संचालक महेश मयूर होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना भागवत यांनी येणारा प्रत्येक क्षण नवनवीन तंत्रज्ञानाचा असल्याचे सांगत त्यानुसार पत्रकारांनीही बदलण्याची गरज बोलून दाखवली. आजच्या पत्रकारितेत जो आपले कर्तृत्त्व सिद्ध करेल तोच या स्पर्धेत टिकेल असेही ते म्हणाले. बातमी लिहिणं ही एक कला आहे, त्याचे स्वरुप व्यापक करण्याची गरज असून गर्दीतला माणूस शोधण्याचे कसब इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करणार्यांनी आत्मसात करावे असा सल्लाही त्यांनी दिला. आज इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये आधुनिकतेचा शिरकाव झाला असून वृत्त निवेदन करण्यासाठी आभासी निवेदकाचे प्रयोग सुरु झाले आहेत, त्याचा स्वीकार करुन प्रत्येकाने आपल्यात बदल करुन मार्गक्रमण करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेली कार्यशाळा कौतुकास्पद असून अशाप्रकारचे उपक्रम मुंबईतही होत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात यू-ट्युबर सुशील कुलकर्णी यांनी बदललेल्या माध्यमांचे विस्तृत चित्र उपस्थितांच्या समोर उभे केले. आज पत्रकारितेच्या कामकाजात मोठे बदल झाले असून वाचक आणि दर्शकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्या पूर्ण करताना पत्रकारांनी पारंपरिक पत्रकारितेसह शोध पत्रकारिता आणि बातमीमागील बातमी देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. आज जगभरात समाज माध्यमांचे स्तोम माजले आहे. त्यानुसार आपणही अपडेट होण्याची आवश्यकता असताना त्याकडे आजचा पत्रकार गांभीर्याने पाहत नसल्याने त्याचे अस्तित्वच धोक्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. वर्तमानात काय चालले आहे, लोकांना काय हवे आहे, भय दाखवणे अथवा उघडे करणे हा पत्रकारितेचा धर्म नसून समाजाला जागृत करण्याचे काम पत्रकारांकडून घडण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या सत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिवव्याख्याते प्रा. एस. झेड. देशमुख, ज्येष्ठ पत्रकार स्मिता गुणे, उद्योजक नीलेश जाजू आदी उपस्थित होते.

