महाराष्ट्रचा देशातील अग्रगण्य राज्य म्हणून लौकिक ः आ. थोरात संगमनेरात ध्वजवंदन करुन कामगार दिनाच्या दिल्या शुभेच्छा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
विविध परंपरा लाभलेले महाराष्ट्र राज्य विकासात देशमध्ये अग्रगण्य राज्य म्हणून लौकिकप्राप्त आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अनेकांनी हुतात्मे पत्करले असून मोठ्या संघर्षातून मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण झाले असून देशाच्या विकासात महाराष्ट्राचा मोठा वाटा असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते, माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले.

संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात शासकीय ध्वजारोहण आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, प्रभारी तहसीलदार गणेश तळेकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांसह सर्व विभागांचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार थोरात म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याचे 75 वर्ष आपण साजरे करत आहोत. याचबरोबर महाराष्ट्राच्या निर्मितीचे 63 वर्ष आपण साजरे करत आहोत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुढाकारातून 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्य झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अनेकांनी हुतात्मे पत्करले आहे. 63 वर्षाच्या वैभवशाली वाटचालीतून महाराष्ट्र हे देशातील सर्वात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जात आहे.

महाराष्ट्र दिनाबरोबर आज कामगार दिनही मोठ्या उत्साहाने साजरा होत असून महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये कामगार बंधूंचाही मोठा वाटा राहिला आहे. कृषी, सहकार, औद्योगीकरण, शिक्षण, सांस्कृतिक व वैभवशाली वातावरण हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य असून यापुढेही राज्याचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विविध शालेय विद्यार्थ्यांनी दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
