… अन्यथा शिर्डी विमानतळाला टाळे ठोकू! काकडी ग्रामस्थांचा इशारा; कर थकल्याने विकास रखडला

नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डी विमानतळाकडे करापोटी पाच ते साडेपाच कोटी रुपये थकल्याने विमानतळाला टाळे ठोकण्याचा इशारा काकडी ग्रामस्थांनी दिला आहे. मोठ्या प्रमाणात कर थकल्याने गावचा विकास रखडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

सन 2017 साली कोपरगाव तालुक्यातील काकडी गावात शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाले. मात्र मागील चार वर्षात काकडी ग्रामपंचायतला कर स्वरूपात मिळणारी हक्काची रक्कम अदा करण्यात आली नाही. ही थकीत रक्कम वाढत जाऊन आज घडीला पाच ते साडेपाच कोटी रुपये विमानतळ प्राधिकरणाकडे थकले आहेत. वारंवार मागणी करूनही प्राधिकरणाकडून कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. गेल्या अधिवेशनात राज्य सरकारने शिर्डी विमानतळासाठी दीडशे कोटींचा निधी जाहीर केला. मात्र ग्रामपंचायतच्या थकीत काराबाबत कुठलीही हालचाली होताना दिसत नाही. त्यामुळे काकडी गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांनी विमानतळ अधिकार्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. येत्या पंधरा दिवसात थकीत कर अदा करण्यासंदर्भात निर्णय झाला नाही तर विमानतळाला टाळे ठोकण्याचा ईशारा सरपंच पूर्वा गुंजाळ यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी दिला आहे.

2006 साली विमानतळासाठी भूसंपादन सुरू झाल्यानंतर काकडी ग्रामस्थांनी अत्यल्प मोबदल्यात 1500 एकर जमीन दिली. यावेळी स्थानिकांना नोकरीसह गावातील रस्ते, शाळा, पाणी पुरवठा योजना अशी विविध आश्वासने प्राधिकरणाकडून देण्यात आली. मात्र अनेक वर्षे उलटूनही आश्वासने पूर्ण होत तर नाहीत त्यातच कोट्यवधींचा कर थकल्याने काकडी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. हक्काच्या पैशांसाठी काकडी ग्रामपंचत आणि ग्रामस्थ वारंवार शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत. आता थेट विमानतळालाच टाळे ठोकण्याचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकार आणि विमानतळ प्राधिकरणाला जाग येणार का? हे बघणं महत्वाचे ठरणार आहे.
