नुकसान भरपाईसाठी महावितरणवर 100 कोटींचा दावा ठोकणार ः अॅड. आढाव कोपरगावमध्ये शेतकर्यांचे वीज तारांच्या घर्षणामुळे मोठे नुकसान
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहर व टाकळी शिवारात वीज तारांच्या घर्षणामुळे लागणार्या आगीत बागायती शेतीमाल व फळबागांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत उपाययोजना म्हणून कोपरगाव वीज उपकेंद्रापासून रवंदा उपकेंद्राला जाणार्या मुख्य विद्युतवाहिनीचा कंडक्टर बदलून नवीन टाकावा. अथवा सदरची मुख्य विद्युत वाहिनी कुंभारी गाव मार्गे किंवा अन्य मार्गे कायमस्वरूपी स्थलांतरीत कराव्यात. अन्यथा वीज तारांमुळे आग लागून बागायती शेतीच्या नुकसान भरपाईसाठी महावितरण कंपनीवर 100 कोटींचा दावा ठोकणार असून संभाव्य नुकसान भरपाई संबंधित अधिकार्यांच्या वेतनातून, निवृत्तीवेतन व संपत्तीमधून वसूल करणार असल्याचे कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड. शंकर आढाव यांनी सांगितले.
या संदर्भात अॅड. आढाव यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात, कोपरगाव ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता भूषण आचार्य, ग्रामीण उपविभागाचे कनिष्ठ अभियंता अनिकेत निरभवणे यांना लेखी पत्र देवून कळवले आहे. कोपरगावमध्ये आढाव कुटुंबाची 17 एकर पेरू व 4 एकरवर चिक्कूची बाग आहे. सदरची फळबाग 25 वर्षे जुनी आहे. या बागेत सेंद्रीय पद्धतीने फळझाडांची जोपासना केली आहे. त्यासाठी बागेत जमिनीवर सेंद्रीय खत म्हणून दरवर्षी 150 टन उसाचे पाचट पसरविले जाते. त्यामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणात गांडूळ तयार झालेले आहेत. परंतु, कोपरगाव वीज उपकेंद्रापासून रवंदे-धामोरी उपकेंद्राला जाणारी मुख्य विद्युतवाहिनी आढाव कुटुंबाच्या जमिनीमधून गेलेली आहे. सदरच्या मुख्य वाहिनीचे काम होऊन बरीच वर्षे झालेली आहेत. त्या वाहिनीचे कंडक्टर अतिशय जुने झालेले आहेत. त्यामुळे मुख्य वाहिनीच्या कंडक्टरच्या तारा तुटतात. त्या तारा जुन्या झाल्यामुळे सतत घर्षण होत राहते. याबाबत अॅड. आढाव यांनी पत्र देऊन लेखी कळविलेले आहे. परंतु महावितरणकडून अद्यापपर्यत कोणतीही कार्यवाही झाली नाही.
कंपनीच्या निष्काळजीपणामुळे त् मुख्य वाहिनीची एक तार भास्कर खंडीझोड या शेतकर्याच्या तोडणीस आलेल्या उभ्या ऊस पिकात तुटून पडल्याने 3 एकर पीक खाक झाले. याबरोबरच शेजारील शेतकरी कैलास जाधव यांचाही 2 एकर तोडणीस आलेला ऊस आगीत जळून खाक झाला आहे. यात दोन्ही शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेे आहे. याप्रमाणे दुर्दैवी घटना होऊनही सुमारे तीन महिन्यांचा कालावधी होऊनही महावितरणच्या अधिकार्यांनी सदर मुख्य वाहिनीचे कंडक्टर बदलण्याकामी कोणतीही दखल घेतलेली नसल्याने परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. आढाव यांच्या जमिनीतून गेलेल्या वीज तारांच्या घर्षणामुळे चिक्कूच्या बागेला आग लागली व 25 वर्षे वयाची 6 चिक्कूची झाडे जळून खाक झाली. त्यात सुमारे 6 कोटी 50 लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ही मुख्य विद्युत वाहिनी दुसरीकडून कुंभारी मार्गे अगर योग्य त्या अन्य मार्गे स्थलांतरित करावी. अन्यथा नुकसान भरपाई म्हणून 100 कोटी रुपयांची मागणी न्यायालयात केली जाईल, असा इशारा अॅड. शंकर आढाव व परिसरातील शेतकर्यांनी दिला आहे.