संगमनेर पोलीस उपविभागात सहा महिन्यांपासून प्रभारी राज! गुन्हेगारीचा स्तर वाढला; गुन्ह्यांचे तपासच लागत नसल्याचा परिणाम

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यातील संवेदनशील समजल्या जाणार्या संगमनेर उपविभागाला सहा महिने उलटूनही अद्याप उपविभागीय पोलीस अधिकारी मिळालेला नाही. त्यामुळे संगमनेर उपविभागात येणार्या संगमनेर-अकोले तालुक्यातील अर्धाडझन पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनागोंदी वाढली असून गुन्ह्यांचे तपासच ठप्प झाल्याने गुन्हेगारांचा सुळसुळाट झाल्याचे चित्र आहे. त्यातच या सर्व पोलीस ठाण्यांवर वरिष्ठांचा वचकच नसल्याने काही पोलीस ठाण्यांमधून प्रभारी अधिकार्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचेही समोर आले आहे. सध्या सुरू असलेल्या पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांमधून संगमनेर उपविभागाला एखादा खमका पोलीस अधिकारी मिळेल अशी अपेक्षा असताना ती अजूनही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या उपविभागात सध्या सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र दिसत आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये संगमनेरचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांची नागपूरचे उपायुक्त म्हणून येथून बदली झाली, तेव्हापासून संगमनेर उपविभागाचा अतिरिक्त भार शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्याकडे आहे. मात्र सातव यांच्या निवृत्तीचा काळ टप्प्यात असल्याने त्यांच्याकडून गेल्या सहा महिन्यांत एकाही प्रकरणाचा छडा लागलेला नाही. त्यामुळे पूर्वीच्या उपविभागीय अधिकार्यांनी तयार केलेले ‘विशेष पथक’ही सध्या विश्रांतीच्या मोडमध्ये असून गेल्या पंधरवड्यापूर्वी या पथकाने उघड केलेल्या मोटारसायकल रॅकेटशिवाय उपविभागातील एकाही पोलीस ठाण्यातून गुन्ह्यांची उकल झाल्याचे व आरोपी गजाआड केल्याचे कोणतेही वृत्त नाही.

उपविभागीय अधिकारी अशोक थोरात, रोशन पंडित व त्यानंतर रुजू झालेल्या राहुल मदने यांनी सलगपणे पथदर्शी काम करताना संगमनेर उपविभागातील शहर, तालुका, घारगाव, आश्वीसह अकोले तालुक्यातील अकोले व राजूर पोलीस ठाण्यातील कार्यतत्परता वाढवली होती. उत्तर नगर जिल्ह्यात सर्वाधीक महत्त्वाच्या उपविभागात गणना होणार्या संगमनेर उपविभागात यापूर्वी कार्यरत असलेल्या राहुल मदने यांनी आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात गुटखा, मोटारसायकल चोरी, सोनसाखळ्या लांबविण्याचे प्रकार, मोबाईल चोरी, घरफोड्या व सात खुनाच्या प्रकरणांची उकल केली होती. गेल्या काही दशकांत या अधिकार्याची कारकीर्द सर्वात संस्मरणीय ठरली. मात्र त्यांच्या बदलीनंतर सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही जिल्ह्यातील महत्त्वाच्या समजल्या या उपविभागासाठी अद्यापही अधिकारी मिळालेला नाही.

राहुल मदने यांच्या कार्यकाळात संगमनेरातील साखळी कत्तलखान्यांवर राज्यातील सर्वात मोठी कारवाई झाली होती. त्यानंतरच्या काळात त्यांनी सातत्याने येथील कत्तलखान्यांवर छापे घालून कसायांचे अक्षरशः कंबरडे मोडले होते. त्याचा परिणाम लपूनछपून वगळता संगमनेरातील गोवंश कत्तलखान्यांवर नियंत्रण मिळवण्यात पोलीस यशस्वी ठरले होते. मात्र त्यांच्या बदलीनंतर शहरातील कत्तलखान्यांच्या चालकांसह गुटखा, अंमलीपदार्थांची तस्करी यासह चोर्या, घरफोड्या, सोनसाखळी लांबविण्याच्या घटना सातत्याने घडत असून गेल्या सहा महिन्यांत अपवाद वगळता यातील एकाही प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही.

संगमनेर शहर संवेदनशील असून शहरात गेल्याकाही कालावधीत जातीय तणावाच्या घटनाही घडल्या आहेत. गेल्याच महिन्यात लव्ह जिहादच्या संशयावरुन काही हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांनी एकाचे अपहरण करुन त्याला सुकेवाडीजवळील निर्जन ठिकाणी नेवून बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर शहरात काहीकाळ तणावाचेही वातावरण निर्माण झाले होते. त्यातच जिल्ह्यातील ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत लव्ह जिहाद अथवा बळजोरीच्या धर्मांतराचे प्रकार समोर येतील तेथील प्रभारी पोलीस अधिकार्यांवर त्याचा ठपका ठेवला जाईल असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला होता. मात्र संगमनेरात सध्या अशा प्रकारांचे पेव फुटूनही केवळ खमका उपविभागीय अधिकारी नसल्याने संगमनेरातील सौहार्दाच्या वातावरणाला कोणत्याही क्षणी गालबोट लागण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. जिल्ह्यात संगमनेर उपविभागाचे महत्त्व व येथील वाढत्या गुन्हेगारीचा उंचावणारा आलेख पाहता जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा पोलीसप्रमुख राकेश ओला यांनी लवकरात लवकर संगमनेर उपविभागासाठी एखादा सक्षम आणि खमका उपविभागीय पोलीस अधिकारी द्यावा अशी मागणी आता नागरिकांमधून समोर येवू लागली आहे.

संगमनेरची कायदा व सुव्यवस्था आणि बदलत्या वातावरणासंदर्भात शुक्रवारी शहरातील काही पत्रकारांनी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शहरातील परिस्थिती जाणून घेताना संगमनेरसाठी खमक्या पोलीस उपअधीक्षकाची नेमणूक करणार असल्याचे सांगत अशा अधिकार्याच्या शोधात असल्याची माहिती दिली. लवकरच संगमनेर उपविभागाला चांगला पोलीस अधिकारी मिळेल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी पत्रकारांना दिली.
