पाळणा दुर्घटनाग्रस्त साळवे कुटुंबाची मदतीसाठी याचना शिर्डी ग्रामस्थांकडून मदतीचे आवाहन; अधिकारी अजूनही फिरकले नाही


नायक वृत्तसेवा, शिर्डी
1 एप्रिलला शिर्डीत झालेल्या पाळणा दुर्घटनेत साळवे कुटुंबातील पती-पत्नी गंभीर झाले होते तर मुलगी साईशा हिलाही दुखापत झाली. दुर्दैवाने किशोर साळवे यांचे दोन्ही पाय अपघातात गेले तर पत्नीचा एक पाय पंजापासून काढण्यात आला. सध्या साळवे दाम्पत्यावर नाशिक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पुढील उपचारांसाठी पंधरा ते वीस लाख रुपये खर्च येऊ शकतो. त्यामुळे या कुटुंबातील त्यांची वयोवृद्ध आई हात जोडून मदतीची अपेक्षा करत आहे. दरम्यान साळवे कुटुंबावर कोसळलेल्या संकटात कोणताही शासकीय अधिकारी अथवा शिर्डीतील नेता, उत्सव समितीचे सदस्य भेटायला आला नाही याची खंत साळवेंच्या आईने व्यक्त केली.

साळवे कुटुंबातील प्रमुख किशोर याला एक मुलगी आहे ती या दुर्घटनेत जखमी झाली आहे. दहा वर्षाच्या या चिमुरडीला घेऊन वयोवृद्ध आई खूप हतबल झाली आहे. कारण हातावर पोट भरणारा मुलगा कष्ट करून आपला संसाराचा गाडा चालवत होता. शिर्डीचे वकील अनिल शेजवळ व अविनाश शेजवळ यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यावेळी वयोवृद्ध आईने हंबरडा फोडला व मदतीसाठी पदर पसरला. वास्तविक शिर्डी ग्रामस्थ, श्रीरामनवमी उत्सव समिती व साई संस्थानने अशा संकट काळात साळवे कुटुंबाला आर्थिक मदत करावी, असे मत अनिल शेजवळ यांनी व्यक्त केले. घराचा कुटुंबप्रमुख व त्यांची पत्नी आयुष्यभराचे अपंग झाल्यामुळे पुढील आयुष्य कसं जगायचं हाच मोठा प्रश्न साळवे कुटुंबासमोर आहे. तर साईशाच्या शिक्षणासाठी पैसे कोठून आणणार हाही प्रश्न उभा राहिला आहे.

सदर घटनेनंतर रमेश गोंदकर व त्यांचे बंधू विजय गोंदकर यांनी दोन लाख रुपयांची तातडीची मदत उपचारासाठी दिली आहे. तर छत्रपती शासन, युवा शिर्डी ग्रामस्थ यांनीही मदतीसाठी वर्गणी जमा करण्याचे आवाहन केले आहे. तर रामनवमी उत्सवातील शिल्लक राहिलेली रक्कम मदत म्हणून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, श्रीराम नवमी यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष संस्थानचे प्रभारी कार्यकारी अधिकारी राहुल जाधव हे होते. ही दुर्घटना यात्रेमध्ये घडल्याने त्यांनी साळवे कुटुंबाला साई संस्थानच्यावतीने उपचारांचा खर्च करून अपंग झालेल्या दाम्पत्याला संस्थानमध्ये सेवेत घ्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Visits: 101 Today: 1 Total: 1107572

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *