प्रियकरानेच केली ‘त्या’ विद्यार्थ्याची हत्या! कुजलेल्या अवस्थेत मृतदेह; अनैतिक संबंधात कोवळा जीव गेला..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या पंधरवड्यापूर्वी आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथून अपहरण झालेल्या बारा वर्षीय आर्यन विक्रम चव्हाण या विद्यार्थ्याचा खून झाल्याचे मंगळवारी सायंकाळी समोर आले. मयत विद्यार्थ्याच्या आईसोबत अनैतिक संबंध असलेल्या संगमनेरच्या राजेंद्र जंबुकर याने त्याचे अपहरण केले व नंतर त्याचा खून करुन स्वतः आत्महत्या केल्याचा संशय असून पारगाव (कारखाना) पोलिसांसह संगमनेर शहर पोलिसांकडून त्या दृष्टीने तपास केला जात आहे. मयत विद्यार्थ्याचा मृतदेह गुंजाळवाडी रस्त्यावरील एका कोरड्या विहिरीत कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे, त्यावरुन काही दिवसांपूर्वीच संशयीताने त्याचा खून केल्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणातून वाचणं अशक्य असल्याची उपरती झाल्यानंतर आरोपीच्या डोक्यातील प्रेमाची नशा उतरुन त्याने गळफास घेतला असावा असेही आता बोलले जात आहे.
पंधरवड्यापूर्वी बुधवारी (ता.11) संगमनेरात राहणारा सराईत गुन्हेगार राजेंद्र रोहिदास जंबुकर (वय 27, रा.ढोलेवाडी) याने पुणे जिल्ह्यातील आंबगेगाव तालुक्यात असलेल्या निरगुडसर येथील आर्यन विक्रम चव्हाण (वय 12) या विद्यार्थ्याचे तेथील पंडित जवाहरलाल नेहरु विद्यालयाच्या प्रवेशद्वारावरुन अपहरण केले होते. या प्रकरणी त्याचे वडिल विक्रम चव्हाण यांनी पारगाव (कारखाना) पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीवरुन अपहरणाचा गुन्हा दाखल करुनपोलीस तपास सुरु असतानाच मंगळवारी (ता.24) या प्रकरणातील एकमेव संशयीत असलेल्या राजेंद्र रोहिदास जंबुकर याने ढोलेवाडीतील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.
मात्र त्यानंतरही अपहृत मुलाचा कोणताही ठावठिकाणा नसल्याने पोलिसांची चिंता वाढली असतानाच सायंकाळी आठच्या सुमारास गुंजाळवाडी शिवारातील जयंतराव हारोजी गुंजाळ-पाटील यांच्या शेतशिवारातील कोरड्या विहिरीत अज्ञात बालकाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. विहिरीच्या आसपास तपासणी करता निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरु विद्यालयाचे ओळखपत्रही पोलिसांच्या हाती लागले. त्यावर विहिरीत सापडलेला मृतदेह अपहृत आर्यन चव्हाण याचाच असल्याचे स्पष्ट झाले. कायदेशीर सोपस्कार पूर्ण करुन रात्री उशिराने शहर पोलिसांनी विहिरीतील मृतदेह बाहेर काढला असून उत्तरिय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
अपहरण प्रकरणातील फिर्यादीची पत्नी आणि आरोपी राजेंद्र जंबुकर यांच्यात गेल्याकाही वर्षांपासून अनैतिक संबंध होते. त्यातून ते दोघेही संगमनेरात एकत्र राहायचे. वर्षभरापूर्वी पहाटे दारुच्या नशेत कासारवाडी रस्त्यावर राहणार्या आपल्या प्रेयसीच्या घरी पोहोचल्या जंबुकरला तिच्यासोबत अन्य कोणीतरी असल्याचे दिसल्यानंतर त्याने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला होता. त्यात तिची दोन बोटंही तुटली होती. त्या प्रकरणात दाखल तक्रारीवरुन त्याला दीर्घकाळ कारागृहातही जावे लागले. त्यावरुन दोघांमध्ये सतत वाद होत होते. त्यातूनच त्याने प्रेयसीच्या पतीपासून तिला झालेल्या मुलाचे थेट तिच्या मूळगावी जावू अपहरण केले आणि नंतर त्याचा खून करुन स्वतःही आत्महत्या केल्याचे दिसत असून पारगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.