कलेच्या साधनेमुळे जीवन समृद्ध झाले ः गोरे संगमनेर महाविद्यालयात जागतिक फोटोग्राफी दिन साजरा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षण, व्यायाम आणि आरोग्य यांच्या जोडीनेच एखाद्या कलेची जोपासना करावी. कारण कलेतून व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो, असे मत शिक्षण प्रसारक संस्था व संगमनेर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फोटोग्राफी दिनाचे औचित्य साधून, फोटोग्राफर सतीश गोरे यांनी व्यक्त केले.

जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त सतीश गोरे यांचा यथोचित सत्कार आणि प्रकट मुलाखत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य डॉ. ओंकारनाथ बिहाणी यांनी घेतली. यावेळी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सतीश गोरे म्हणाले, जीवनात शिक्षणाला खूप महत्त्व आहे. पण शिक्षणाबरोबर प्रत्येकाने छंद म्हणून एखाद्या कलेची उपासना करावी. त्यामुळे निरपेक्ष आनंद मिळतो. फोटोग्राफीचे काम करत असताना, पारंपारिक कॅमेरा ते डिजिटल कॅमेरा हा बदल खूप जवळून मी पाहिला आहे. संगमनेर महाविद्यालयाला एक वेगळी सामाजिक बांधिलकीची परंपरा लाभलेली आहे. त्यामुळे येथे फोटोग्राफीचे काम करत असताना, माजी प्राचार्य म. वि. कौंडिण्य व स्वर्गीय ओंकारनाथ मालपाणी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे गेली 44 वर्षे इथे काम करताना निश्चितच मनस्वी आनंद होतो आहे. मी कलेची नैसर्गिक साधना करत असताना निसर्गातूनच घडत गेलो. चांगल्या माणसाच्या सान्निध्याने आयुष्याला आकार मिळाला. जीवनात आयुष्यभर कलेची साधना केली. त्याचेच फलित म्हणजे मी आदर्श कलाकार झालो. व्यवसायाच्या रुपाने पैसाही खूप मिळाला. त्यामुळे माझे जीवन समृद्ध झाले. कलेची जोपासना करत असताना, एक सामाजिक जबाबदारी भान म्हणून नव्या पिढीने या व्यवसायाकडे पाहणे गरजेचे आहे, असेही शेवटी गोरे म्हणाले.

या कार्यक्रमास व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, सचिव डॉ. अनिल राठी, प्रकट मुलाखतकार डॉ. ओंकारनाथ बिहाणी, प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, प्रकट मुलाखत देणारे गौरवमूर्ती सतीश गोरे, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लढ्ढा, उपप्राचार्य डॉ. रवींद्र तशिलदार, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र ढमक, क्रीडा संचालक डॉ. अजितकुमार कदम आदी मान्यवर उपस्थित होते. मराठी विभाग प्रमुख डॉ. अशोक लिंबेकर यांनी मानपत्राचे वाचन केले. सूत्रसंचालन डॉ. जितेंद्र पाटील यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी मानले.
