महात्मा फुले कृषी विद्यापीठात फळ प्रक्रिया केंद्राचे खासगीकरण विद्यापीठाचा ‘फुले ड्रिंक’ शीतपेयांचा ब्रँड पुन्हा विकसित होणार

नायक वृत्तसेवा, राहुरी
येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात काढणी पश्चात तंत्रज्ञान केंद्र हे सरकारी-खासगी भागीदारीद्वारे भाडेतत्वावर लिलियम फुडस् प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला चालविण्यास दिले. या प्रकल्पाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या हस्ते नुकतेच झाले.

शेतकर्‍यांचे भाजीपाला तसेच फळे यांच्या हाताळणीमध्ये, वाहतुकीमध्ये तसेच साठवणूक करताना फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हेच नुकसान टाळण्यासाठी काढणी पश्चात तंत्रज्ञान विद्यापीठाने मोठ्या प्रमाणावर विकसित केले आहे व या केंद्रामध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली मशिनरी देखील विद्यापीठाकडे आहे. मात्र अपुर्‍या मनुष्यबळामुळे हे केंद्र खाजगी भागीदारीमध्ये सुरू करण्यासाठी विद्यापीठाच्या संशोधन संचालनालयाने पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने विद्यापीठाचे उत्पन्न वाढणार असून रोजगार निर्मिती होणार आहे.

यावेळी लिलियम फुडस् प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक सुरेश शेटे यांनी या केंद्रातून विविध फळे, भाजीपाल्यांचे, प्रक्रियायुक्त पदार्थ तसेच ज्यूस, सरबत, सीरप, स्क्वॅश, जाम, कँन्डी असे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यात येणार असल्याची माहिती दिली. दरम्यान, विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. सुभाष पुरी व डॉ. राजाराम देशमुख यांनी विद्यापीठाच्या काढणी पश्चात केंद्रांमध्ये फुले ड्रिंक हा विद्यापीठाचा शीतपेयांचा ब्रँड विकसित करून त्याचे मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग केले होते. मात्र काळाच्या ओघात हा ब्रँड मागे पडला होता. आता कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील व डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली शासन व खासगी भागीदारीतून पुनःश्च हा ब्रँड विकसित होईल अशी आशा आहे. यावेळी संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, डॉ. श्रीमंत रणपिसे, कुलसचिव प्रमोद लहाळे, डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. सचिन नलावडे, डॉ. कैलास कांबळे, डॉ. विक्रम कड आदी उपस्थित होते.

Visits: 166 Today: 1 Total: 1105874

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *