समाज माध्यम समूहाकडून उपअधिक्षकांचे कौतुक गुंतागुतीच्या गुन्ह्यांचा तपास; जातीय सलोखा राखण्यातही यश..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
पोलीस आणि समाजाचे परस्परांशी आंतरिक संबंध असतात. सर्वसामान्य माणसांचा पोलिसांशी तसा थेट संबंध नसला तरी शहरात अथवा परिसरात ‘पोलीस’ नावाचा घटक आहे, या एका विचारानेच आपण रात्री शांत झोपू शकतो. पोलिसांप्रति असलेला विश्वासाचा हा दोरच समाजाशी बांधलेला असतो. काही अधिकार्यांकडून समाजाच्या मनातील या विश्वासाला तडेही गेले आहेत. मात्र त्याचवेळी काही अधिकार्यांच्या कर्तृत्वाचे ठसे मात्र आजही उमटलेले दिसतात. अशाच काही नावांमध्ये संगमनेरच्या विद्यमान पोलीस उपअधिक्षकांचाही समावेश आहे. आपल्या दीड वर्षाच्या कारकीर्दीत सोमनाथ वाघचौरे नावाच्या या अधिकार्याने एकापाठोपाठ खुनाच्या घटनांसह जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर बजावलेली भूमिका वाखाणण्याजोगी ठरली. पोलीस आणि समाजात योग्य संतुलन राखताना त्यांनी स्फोटक परिस्थितीतही शहरातील शांततेला बाधा होवू दिली नाही. त्यांच्या येथील कारकीर्दीची दखल घेत संगमनेरच्या सोशल माध्यमात चर्चात्मक ‘हॉट’ म्हणून ओळखल्या जाणार्या ‘सौ शहरी एक संगमनेरी’ या सोशल समूहातील सदस्यांनी शुक्रवारी शिवप्रतिमा देत त्यांचे अभिनंदन केले.

पोलीस ठाणे हा शब्द उच्चारताच सामान्यांची हृदयगती तीव्र होते. समाजातील बहुतांशी वर्ग केवळ ‘कायदा’ आणि ‘पोलीस’ या भीतीमूळे प्रासंगिक आवेगात येवूनही शांत रहात असतो. ‘सदरक्षणाय, खलनिग्रहनाय..’ असं ब्रीद असलेल्या पोलीस दलाबाबत समाजाच्या मनात विश्वास आणि गुन्हेगारांच्या मनात धाक असला पाहिजे. ऐतिहासिक काळापासून संगमनेरची बाजारपेठ आसपासच्या मुलुखात नावाजलेली आहे. त्यामुळे येथील सार्वजनिक सुरक्षा व्यवस्थेलाही खूप मोठा इतिहास आहे. पोलीस दलाच्या या प्रदीर्घ परंपरेत हनुमान जयंती रथोत्सवाच्या माध्यमातून घडलेल्या संगमनेरकरांच्या संघटीत प्रतिकाराची अन् वाघाशी झुंजणार्या पोलीस अधिकार्याच्या नागरी सत्काराची पानं सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहेत.
यापूर्वी पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात व राहुल मदने या दोघा अधिकार्यांनी समाजाशी बांधिलकी जोपासताना संगमनेरकरांच्या सुरक्षेत भर घालणार्या गोष्टींना चालना दिली. आज संगमनेरातील रस्त्यारस्त्यावर विणलेल्या सीसीटीव्हीच्या जाळ्याचे जनक हे दोघे अधिकारी आहेत. त्यांच्या प्रयत्नाने मुख्यरस्ते तिसर्या डोळ्याच्या टप्प्यात आल्याने सोनसाखळी, मोटार सायकली व अन्य भुरट्या चोर्यांवर नियंत्रण आले आहे. तपासाच्या कामासह सामाजिक शांततेसाठीही या प्रणालीचा वापर होत आहे. राहुल मदने यांनी त्यांच्या कार्यकाळात पाठोपाठ सात खुनाच्या घटनांचा उलगडा केला होता. त्यातील काही घटना अतिशय क्लिष्ट होत्या. सोनसाखळी व मोबाईल चोरांविरोधात त्यांनी विशेष मोहिम राबवून श्रीरामपूरच्या वडाळा महादेव येथील विनोद उर्फ खंग्या चव्हाण याच्या टोळीला जेरबंद केले होते.
तोच वारसा कायम चालवताना त्यांच्या जागी आलेले पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांची कारकीर्दही ‘धडाकेबाज’ राहिला आहे. यापूर्वी शिर्डीत त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा सोडून भुसावळ (जि.जळगांव) येथील गुन्हेगारी बिमोड केला. तेथून त्यांची बदली झाली त्यावेळी भुसावळकर भावनावश झाले होते. संगमनेरचा पदभार घेतल्यापासून त्यांनी आपल्या विभागातील सहा पोलीस ठाण्यांमधील दैनंदिन कारभारात बदल घडवून आणले. प्रलंबित तपास, खोळंबलेले न्यायालयीन समन्स, प्रलंबित प्रतिबंधात्मक कारवाया याकडे विशेश लक्ष देवून समाजातील गुन्हेगारी वृत्तींवरील फास आवळण्यास सुरुवात केली.

संगमनेरला तसा जातीयतेचा किनारा आहे. किरकोळ कारणावरुन दोन समाजात तेढ निर्माण होवून स्फोटक परिस्थिती तयार व्हायला वेळ लागत नाही. सोमनाथ वाघचौरे यांच्या कारकीर्दीत असे प्रसंगत एकदा-दोनदा नव्हेतर चारवेळा घडले आहेत. मात्र प्रत्येकवेळी त्यांनी नेमकी नाडी ओळखून भूमिका बजावल्याने अशा स्थितीतही शहराची शांतता भंग झाली नाही. गोवंशावरुन होणारा तणाव लक्षात घेवून त्यांनी येथील कत्तलखान्यांवरही करडी नजर ठेवली. त्यासोबतच पठारभागात वाघाचा हल्ला भासवला गेलेला खून, अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची प्रकरणं, संगमनेरच्या ‘कॅफे’ नावाच्या अश्लिल केंद्रांविरोधात घेतलेली कठोर भूमिका,

विनापरवाना रिक्षांची तपासणी, सोनसाखळी व मोबाईल चोरीचे तपास, अलिकडेच मालदाडच्या जंगलात झालेला बेकरी चालकाचा खून आणि त्याची उत्तरप्रदेशपर्यंतची व्याप्ती, हिवरगाव पावसातील दोघा लेकरांच्या खुनाची घटना आणि काल-परवाच्या कासारवाडी शिवारातील विवाहितेच्या खुनाचा प्रकार त्यांनी अतिशय शिताफीने उलगडला. या सर्व प्रकारांमधून त्यांनी समाजाच्या मनातील पोलिसांची प्रतिमा उजाळण्याचेही काम केले. त्याची देखल घेत संगमनेरच्या सामाजिक विश्वास वावरणार्या नागरिकांसह अधिकारी, पुढारी व मान्यवरांचा समावेश असलेल्या ‘सौ शहरी एक संगमनेरी’ या समूहाच्या सदस्यांनी शुक्रवारी त्यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांना शिवप्रतिमा भेट म्हणून देण्यात आली. यावेळी या समूहाचे एडमीन संजय शिंदे, ज्ञानदेव गायकर, रवींद्र गंगवाल, मन्सूर शेख, संतोष साळुंखे, एन.सी.शेख, प्रकाश सातपुते, प्रवीण गवांदे, भैय्या तांबेाळी आदी उपस्थित होते.

