अपघातग्रस्तांनाच अरेरावी करण्यापर्यंत पोहोचली टोलगुंडांची मजल! टोलवसुली सुरु असतांना महामार्गाची चाळण कशी झाली? या प्रश्‍नावर भडकले ठेकेदार कंपनीचे गुंड


नायक वृत्तसेवा, संगमनेर
काही राजकीय पक्ष, संघटना, माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते, काही पत्रकार आणि तत्कालीन अधिकारी यांना नोटांचे घास भरवून ‘सिन्नर ते खेड’ हा सुमार दर्जाचा आणि अर्धवट कामांची भरमार असलेला ‘आदर्श’ बायपास रस्ता तीन वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी खुला झाला. मात्र या अल्प कालावधीतच या महामार्गाची अक्षरशः दैना उडाली आहे. अपूर्ण कामे, रस्त्याची झालेली चाळण आणि त्यातही ठेकेदार कंपनीकडून ‘बिनदिक्कतपणे’ सुरु असलेली ‘सक्तीची’ टोलवसुली यामुळे या महामार्गावर दररोजचे छोटेमोठे अपघात आणि टोलवरुन हाणामार्‍या नियमीत झाल्या आहेत. मात्र ज्यांच्याकडून ही समस्या सुटण्याची अपेक्षा आहे, त्यांनी आधीच ठेकेदाराकडून मलिदा लाटल्याने सामान्य वाहनचालक आणि नागरिकांना आता कोणीही वाली उरला नसल्याचा अनुभव सध्या या महामार्गावर नित्याचा झाला आहे. गुरुवारी खड्ड्यात दुचाकी आदळून दोघे रक्तबंबाळ झाले होते, त्यांना तात्काळ मदतीची गरज असतानाही लुटीच्या गणितात माणूसकी हरपलेल्या ठेकेदार कंपनीच्या टोलगुंडांनी उलट त्यांनाच अरेरावी करण्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी या महामार्गाने अनुभवला, हा प्रकार पाहून जाणार्‍या-येणार्‍या प्रवाशांचा संताप अनावर झाल्याने अखेर महामार्गावरील रुग्णवाहिकेतून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.


श्रीरामपूर तालुक्यातील ममदापूर येथील मूळनिवासी असलेले रविंद्र गेणू किरते (वय 57) व जरेरा उस्मान शेख (वय 29) ही महिला गुरुवारी आपल्या मोपेडवरुन (क्र.एम.एच.46/बी.टी.6210) रायगडहून सिन्नरला निघाले होते. संपूर्ण रस्त्यात असलेले खड्डे चुकवित ते चंदनापूरी घाटात आले. गेल्या महिन्यातील एकाच तुफान पावसाने घाटातील रस्त्याची अक्षरशः वाट लागलेली असल्याने खड्डे चुकविण्याच्या नादात त्यांची गाडी दुसर्‍या एका मोठ्या खड्ड्यात आदळली आणि ते दोघेही गाडीसह रस्त्यावर कोसळून काही अंतर गाडीसह फरफटत गेले. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापती होवून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरु झाला. या दरम्यान रस्त्यावरुन जाणार्‍या अन्य काही वाहनचालकांनी थांबून मानवतेच्या नात्याने त्यांना सहकार्य केले. रक्तस्राव पाहून रुग्ण गंभीर असल्याचे ताडून आसपासच्या काहींनी टोलनाक्यावर फोन करुन अपघाताची माहिती दिली.


मात्र सक्तिच्या वसुलीत मानवता खुटींला टांगलेल्या मॉटोंकार्लो कंपनीच्या टोलगुंडांनी या घटनेला फारसे महत्त्व दिले नाही. मात्र त्या दरम्यान दोन्ही जखमींच्या जखमांमधून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरु झाल्याने काही तरुणांनी वारंवार फोन करुन टोलनाक्यावरील कर्मचारी व रुग्णवाहिका पाठविण्याची विनंती केल्याने अखेर अर्धा-पाऊण तासाने घटनास्थळी आलेल्या टोलगुंडांनी जखमींची विचारपूस करण्यापेक्षा फोन करुन बोलवणार्‍यांचा शोध घेण्याला अधिक महत्त्व देत उलट त्यांनाच दमबाजी करण्यास सुरुवात केली. मात्र हा सगळा प्रकार पाहून घटनास्थळी गर्दी वाढू लागल्याने विजार ओली झालेल्या ‘त्या’ गुंडांनी जखमींवर उपकार करीत आहोत या अविर्भावात त्यांना महामार्ग रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात पाठवण्याचे सोपस्कार उरकले. सध्या त्या दोघांवरही शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


संगमनेरची जटील वाहतुक समस्या सुटावी आणि पुणे-नाशिक दरम्यान प्रवास करणार्‍यांचा वेळ वाचावा यासाठी पुणे-नाशिक महामार्गाला बायपास रस्ता निर्माण करण्याची संगमनेरकरांची अनेक वर्षांची मागणी होती. गेल्या पंचवार्षिकमध्ये ती मार्गी लागली आणि खेड ते सिन्नर पर्यंतच्या महामार्गाचे नूतनीकरण करण्यासोबतच संगमनेर शहराच्या बायपासची मागणीही पूर्ण होऊन 1 जानेवारी 2017 रोजी 70 टक्के काम पूर्ण झालेला आणि महत्वाची 30 टक्के कामे अपूर्ण असलेला हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला. सुरुवातीला हा रस्ता टोलमुक्त असल्याचे गाजरही संगमनेरकरांना दाखवले गेले, मात्र काही कालावधीनंतर सक्तीची टोलवसुली सुरु झाल्याने स्थानिकांना टोलमधून सुट मिळण्यासाठीही आंदोलन करावे लागले हा या महामार्गाचा इतिहास आहे.


काही ठेकेदार कंपन्यांनी एकत्रित होत या रस्त्याचा ठेका मिळविला. त्यात मॉन्टोकार्लो या कंपनीचा संगमनेर तालुक्यातील रस्ता निर्मितीत मोठा वाटा आहे. बीओटी पद्धतीने उभारले जाणारे प्रकल्प सशुल्क असतात. त्याच्या वापरापोटी वापरकर्त्यांना ठराविक रक्कम मोजावी लागते हा नियम सर्वश्रृत आहे आणि मॉन्टोकार्लोकडून या नियमाची अगदी सक्तीने अंमलबजावणीही सुरु आहे. टोल न भरणार्‍यांना अगदी भीमटोले देण्यापर्यंतचे शेकडों दाखले हिवरगाव पावसा टोलवरुन मिळू शकतात. मात्र त्याचवेळी ‘टोलवसुली’ सुरु असेपर्यंत या मार्गाचा वापर करणार्‍या वाहनधारकांची सुरक्षितता आणि रस्त्याची निगा राखण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारीही टोल वसुल करणार्‍या कंपनीची असते हे मात्र सदरची कंपनी ज्याप्रमाणे 30 टक्के राहीलेली कामे विसरली, तशाच पद्धतीने विसरुन गेली आहे.


अर्थात या महामार्गाची निर्मिती अत्यंत वादग्रस्त आणि लुटालुटीतून झालेली आहे हे सर्वश्रृत आहे. अगदी शेतकर्‍यांच्या जमीनींचे संपादन करण्यापासून ते रस्ता निर्मितीत वापरलेल्या गौणखनिजांपर्यंत तत्कालीन वरीष्ठ अधिकारी, काही राजकीय पक्षांचे व संघटनांचे पदाधिकारी, काही माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते आणि काही पत्रकारांनीही या वाहत्या गंगेत आंघोळी उरकून घेतल्या आहेत. यासर्व घटकांना वेळोवेळी नागरी आंदोलनाच्या नावाने उभ्या केलेल्या नाटकाच्या बदल्यात कंपनीने भरमसाठ पैसे दिल्याने आता कंपनीला जाब विचारणार्‍यांची कोणतीच नैतिकता शिल्लक राहीलेली नाही, अथवा ठेकेदार कंपनीने ती शिल्लक ठेवलेली नाही.


त्यामुळे गेल्या अवघ्या तीनच वर्षात सदोष आणि अर्धवट कामांची भरमार असलेल्या या महामार्गावर शेकडों अपघात झाले, अनेक निष्पापांचे बळी गेले, अनेकांना कायमचे अपंगत्त्व प्राप्त झाले तर शेकडोंचे आर्थिक नुकसानही झाले. पण मलिदा वाटून सुस्त झालेल्या मॉन्टोकार्लो कंपनीच्या दगडी काळजाला मात्र या तीन वर्षात एकदाही पाझर फुटला नाही. त्यामुळे 70 टक्के कामाच्या पूर्ततेवर सुरु झालेला हा रस्ता आज तीन वर्षांनंतरही 70 टक्क्यांवरच असून गेल्या तीन वर्षात या महामार्गावरील खड्डे बुजविण्याची तसदीही कंपनीने घेतलेली नाही. महामार्ग सुरु करतांना 2017 साली राहीलेल्या 30 टक्के कामाचे पैसेही एकप्रकारे वरील घटकांच्या तोंडात कोंबून ठेकेदार कंपनी आपली मनमानी करण्यात मश्गुल झाल्याचेच चित्र गेल्या काही वर्षात ठळकपणे समोर आले आहे.


कंपनीच्या या मनमानीला आता महामार्ग विभागाचे पोलीसही वैतागले असून गुरुवारी घाटात झालेल्या अपघाताची गंभीर दखल घेत डोळासणे विभागाचे उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी प्रकल्प संचालकांशी पत्रव्यवहार करुन कर्‍हे ते बोट्यापर्यंतच्या महामार्गाची झालेली दुर्दशा पत्रातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अपघातांची कारणं, रस्त्याची स्थिती, घाटातील रस्त्यांची अवस्था अशा सगळ्याच गंभीर विषयांना स्पर्श करणार्‍या या पत्राची महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक किती गांभिर्याने दखल घेतात हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.


बोट्याहून अथवा कर्‍ह्याहून टोलनाक्यावर आलेल्या वाहनचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे ‘टोलगुंडां’चे लक्ष्य वेधल्यास त्याला अरेरावी केली जाते, एखाद्याने रस्ता योग्य नसल्याने टोल कशाचा? असा सवाल केल्यास त्याला स्वर्गाची सफर घडवून पुन्हा जमीनीवर आणण्यासाठी राखीव वसुली गुंडांचीही फौज तैनात असते, त्यांच्याकडून अनेकांना मारहाण झाल्याचीही असंख्य उदाहरणे आहेत. मात्र हा महामार्ग सुरु होताच संगमनेरातील पांढरपेशा टोळधाडीने आपापला वाटा ओरबाडून नेलेला असल्याने मॉन्टोकार्लो कंपनीला जाब विचारणारेच शिल्लक नसल्याचे भयानक दृष्य सध्या पुणे-नाशिक महामार्गावर कर्‍हे ते बोटा या हद्दित दररोज बघायला मिळत आहे.

Visits: 106 Today: 1 Total: 1099007

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *