अपघाती मृत्यूच्या श्रृंखलेत आणखी एका घटनेची भर…! खराडीतील पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू; मुंबई पोलीस दलात होते कार्यरत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर

शुक्रवारी सुरु झालेल्या तालुक्यातील अपघातांच्या श्रृंखलेत आणखी एका घटनेची भर पडली आहे. मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले तालुक्यातील खराडी-वाघापूरचे रहिवासी गोरक्षनाथ साहेबराव जाधव यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. गेल्या 11 मार्च रोजी नाशिकजवळ त्यांच्या दुचाकीला अपघात झाला होता. तेव्हापासून त्यांच्यावर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र मृत्यूशी सुरु असलेली त्यांची झूंज आज अपयशी ठरली आणि सकाळी 11 च्या सुमारास त्यांचे निधन झाले. मुंबई पोलीस दलाच्या वाहतूक शाखेत कार्यरत असलेले जाधव अतिशय कर्तव्यतत्पर कर्मचारी होते, त्यांच्या अपघाती निधनाने मुंबई पोलीस दलासह खराडी-वाघापूर परिसरातून शोक व्यक्त होत आहे.
याबाबत बीकेसी वाहतूक शाखेचे कर्मचारी संभाजी सांगळे यांनी दैनिक नायकला दिलेल्या माहितीनुसार गेल्या शनिवारी (ता. 11) मुंबई पोलीस दलाच्या वाहतूक शाखेत कार्यरत असलेले तालुक्यातील खराडी-वाघापूर येथील मूळ रहिवासी गोरक्षनाथ साहेबराव जाधव हे आपल्या मोटरसायकल वरुन सणाच्या निमित्ताने गावाकडे परत येत होते. यावेळी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंबई नाका भागात त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तेव्हापासून त्यांच्यावर तेथेच उपचार सुरु होते. मात्र गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेली मृत्यूशी त्यांची झूंज आज अपयशी ठरली आणि सकाळी अकरा वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबई पोलीस दलातील कार्यतत्पर पोलीस कर्मचारी अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या अपघाती मृत्यूच्या बातमीने मुंबई पोलीस दलासह खराडी-वाघापूर शिवारावर शोककळा पसरली आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या या चौथ्या घटनेत तालुक्यातील सहावा बळी गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *