जमीन मिळवण्यासाठी वयोवृद्धेचे घारगावात आमरण उपोषण
जमीन मिळवण्यासाठी वयोवृद्धेचे घारगावात आमरण उपोषण
नायक वृत्तसेवा, घारगाव
स्वत्तःचीच जमीन मिळवण्यासाठी संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथील वयोवृद्ध महिलेवर आमरण उपोषण करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. ही महिला आजपासून (शुक्रवार ता.9) घारगाव तलाठी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसली आहे.
![]()
घारगाव येथील कमल भिका शिंदे या वयोवृद्धेची बोरबन येथे गट क्रमांक 240 मध्ये 0.77 गुंठे वडिललोपार्जित शेतजमीन आहे. या मिळकतीमध्ये महिलेच्या वडीलांचा मृत्यू झाल्यापासून आजपर्यंत ताबा आहे. मात्र, दरम्यानच्या काळात महिलेच्या मोठ्या भावाचे निधन झाल्यामुळे शेजारील गावी राहण्यासाठी महिला आली असता राहते घर (कोपी) काही अज्ञातांनी जाळून तिच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण करुन जमिनीवर ताबा घेतला आहे. याबाबत अनेकदा घारगाव पोलिसांत तक्रारीही केलेल्या आहे. परंतु अद्यापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. तसेच तहसीलदारांकडेही तक्रार दाखल केली होती. परंतु, प्रशासनाकडून कोणताही न्याय्य तोडगा निघाला नसल्याने वयोवृद्ध महिला अखेर आजपासून घारगाव तलाठी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसली आहे. या महिलेबरोबर नाना गणा बर्डे हे वृद्धही उपोषणास बसलेले आहेत. जोपर्यंत आम्हांला आमची जमीन मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. आता याबाबत प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

