मेंढवणमधील घरफोडी प्रकरणातील सर्व आरोपींना अटक! पोलीस उपअधीक्षकांची कामगिरी; 94 ग्रॅमच्या दागिन्यांसह सव्वातीन लाखांची झाली होती चोरी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सुमारे दीड वर्षांपूर्वी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेंढवण शिवारात झालेल्या घरफोडीचा तपास पूर्ण करण्यात संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांना यश आले आहे. या प्रकरणात तालुका पोलिसांनी यापूर्वीच तिघांना अटक केली होती, परंतु सूत्रधारासह त्याचा अन्य एक साथीदार मात्र पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर त्या दोघांनाही श्रीगोंदा पोलिसांनी अटक केल्यानंतर सोमवारी त्यांना संगमनेर तालुका पोलिसांनी मेंढवण प्रकरणात वर्ग केले असून आज त्यांना न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे. 21 मार्च 2021 रोजी घडलेल्या या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करीत सर्वच्या सर्व पाचही आरोपींना अटक केली आहे.

याबाबत जिल्हा परिषद शिक्षक हरिश्चंद्र बाजीराव काळे (रा.कारथळवाडी, मेंढवण) यांनी 21 मार्च 2021 रोजी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार 20 मार्च रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ते आपल्या पत्नीसह घरात झोपलेले असताना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने जागे झाले व बाहेर काही घडतंय का हे पहाण्यासाठी घराचा दरवाजा उघडून बाहेर आले. यावेळी त्यांना काहीही वेगळे न दिसल्याने ते पुन्हा घरात जावून झोपले. त्यानंतर काही वेळातच पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने ते दोघेही जागे झाले.

त्यावेळी हरिश्चंद्र काळे यांनी खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले असता चार अनोळखी इसम त्यांच्या घराच्या दाराबाहेर उभे असल्याचे व काही वेळातच ते घरात दाखल झाल्याचे त्यांनी पाहिले. चोरीच्या हेतूने घरात घुसलेल्या त्या चौघांनी दरडावणीच्या सुरात त्या शिक्षकासह त्यांच्या पत्नीला खुर्चीत गुपचूप बसण्यास सांगून त्यांनी घरातील कपाटांची व सामानाची उचकापाचक करण्यास सुरवात केली. यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले 56 ग्रॅम वजनाचे व 1 लाख 57 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण, 20 ग्रॅम वजनाचे व 60 हजार किंमतीचे मिनी गंठण, पाच ग्रॅम वजनाची व 15 हजार रुपये किंमतीची ठुशी, 30 हजार रुपये किंमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुबे, तीन ग्रॅम वजनाची व 9 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी, कपडे ठेवलेली प्रवाशी बॅग, दोन हजार रुपयांचे घड्याळ, 45 हजार रुपयांची रोख रक्कम व दोन मोबाईल संच असा एकूण 3 लाख 21 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल घेवून चोरट्यांनी तेथून पलायन केले.

याप्रकरणी त्या शिक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात भा.दं.वि. कलम 457, 380, 411, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. सुरुवातीला तालुका पोलिसांनी याप्रकरणी 16 मे, 2021 रोजी किरण आबासाहेब भवार (वय 27, रा. ब्राह्मणगाव वेताळ, ता. श्रीरामपूर) याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या चौकशीतून अन्य आरोपींची नावे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांचाही शोध सुरु केला. मात्र आपला एक जोडीदार पकडला गेल्याची माहिती मिळाल्याने उर्वरीत चोरटे पसार झाले. मात्र पोलिसांनी त्यांच्या पिच्छा मात्र सोडला नाही. त्याचा परिणाम 4 जून 2021 रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास पोलिसांनी शिरसगाव येथे छापा घालीत अनिल नंदू पवार (वय 26, रा. पिंपळे, ता. संगमनेर) याला अटक केली तर श्रीरामपूरमधील अशोकनगर परिसरात राहणार्‍या संदीप सुरेश शहाणे (वय 23) याला 8 जून 2021 रोजी त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. मेंढवण शिवारात घरफोडी करणार्‍या टोळीतील तिघे पोलिसांच्या हाती लागले तरीही मुख्य सूत्रधार मात्र सापडत नसल्याने पोलीस हतबल झाले होते.

या दरम्यान संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनीही या प्रकरणाचा समांतर तपास सुरु केला. त्यातूनच त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या जोरावर चोरट्यांचा माग काढला असता ते दोघेही श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाला, मात्र पूर्वानुभव लक्षात घेता संगमनेरातून श्रीगोंद्यापर्यंत पोहोचेपर्यंत सदरचे आरोपी पसार होण्याची दाट शक्यता असल्याने पोलीस उपअधीक्षकांनी श्रीगोंदा पोलिसांशी संपर्क साधून दोन्ही आरोपींची माहिती व त्यांचा ठावठिकाणा कळविल्यानंतर श्रीगोंदा पोलिसांनी कोळगाव शिवरात छापा घालीत बिट्ट्या उर्फ पिट्ट्या उर्फ दिलीप उर्फ अविनाश काढण्या भोसले (वय 40) व राहुल उर्फ ज्ञानेश्वर काढण्या भोसले या दोघांना ताब्यात घेत संगमनेर तालुका पोलिसांकडे सुपूर्द केले.

सोमवारी (ता.22) सायंकाळी या दोघांना घेवून पोलीस उपअधीक्षकांचे पथक संगमनेरात पोहोचल्यानंतर रात्री साडेनऊ वाजता या दोघांनाही अटक करण्यात येवून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. आज या दोघांनाही संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांच्या न्यायालयासमोर हजर केले जाणार असून आरोपींकडून अद्यापही मुद्देमाल हस्तगत करावयाचा असल्याने पोलिसांकडून या दोघांना पाच दिवस पोलीस कोठडीत पाठवण्याची विनंती केली जाणार आहे. या प्रकरणाचा सुरुवातीचा तपास तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग पवार यांनी तर नंतरचा तपास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. अण्णासाहेब दातीर, पोलीस शिपाई सुभाष बोडखे, अमृत आढाव, प्रमोद गाडेकर, गणेश शिंदे, सायबर सेलचे पो. ना. फुरकान शेख यांनी करुन या प्रकरणात गेल्या दीड वर्षांपासून पसार असलेल्या दोघांना अटक करुन या प्रकरणाचा तपास पूर्ण केला आहे.

Visits: 16 Today: 1 Total: 115718

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *