वृद्धाला मारहाण करुन लुटणार्या चौघांना केले गजाआड दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; अकोले पोलिसांची कामगिरी

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील समशेरपूर येथून ठाणगावकडे जाताना चिंचखांड परिसरात दोन दुचाकींवरुन आलेल्या चौघांनी दैनंदिन ठेव गोळा करणार्या वृद्धाला मारहाण करुन त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाइल बॅग हिसकावून पळ काढला होता. मात्र, पोलिसांनी तत्काळ ग्रामस्थांच्या मदतीने तिघांना मुथाळणे परिसरातील डोंगरामध्ये लपलेले असताना शिताफीने पकडले. यातील एकजण फरार झाला होता. त्यात पकडण्यात अकोले पोलिसांना यश आले असून, चौघा आरोपींकडून रोख रक्कम, मोबाइल, दुचाकी असा एकूण 2 लाख 3 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील सुनील बाबुराव केदार हे रोज दैनंदिन ठेव गोळा करण्यासाठी समशेरपूर भागात येतात. ते ठेव गोळा करुन ठाणगावला जात असताना अविनाश उर्फ बाळ्या कारभारी विधाते, लखन डेरासिंग माचरेकर, प्रेम विजय वाल्हेकर आणि फरारी प्रशांत मंगलदास गिर्हे हे चौघे दोन दुचाकींवरुन आले आणि त्यांनी सुनील केदार यांना अडवून गाडीवरुन खाली पाडत मारहाण करुन बळजबरीने रोख रक्कम आणि मोबाइल हिसकावून पोबारा केला. हा प्रकार केदार यांनी ग्रामस्थांसह अकोले पोलिसांना सांगितला.

पोलिसांना माहिती मिळताच तत्काळ पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने लुटारुंचा माग काढला. मुथाळणे येथील डोंगरात लपून बसलेल्या तिघांना मोठ्या शिताफीने पकडले तर प्रशांत गिर्हे फरार होण्यात यशस्वी झाला होता. अखेर त्याला पकडून गजाआड केले आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम, चोरलेला मोबाइल, गुन्ह्यात वापरलेली वाहने आणि मोबाइल असा एकूण 2 लाख 3 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे हे करत आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांतून कौतुक होत आहे.
