प्रेम प्रकरणातूनच झाली आदिवासी तरुणीची निर्घृण हत्या! शिक्षक प्रियकरासह तिघे गजाआड; राजूर पोलिसांनी महिनाभरात लावला छडा..

नायक वृत्तसेवा, राजूर
महिन्याभरापूर्वी अकोले तालुक्यातील शेंडी येथून अचानक बेपत्ता झालेल्या 21 वर्षीय तरुणीचा छडा लावण्यात राजूर पोलिसांना अखेर यश आले आहे. दुर्दैवाने या प्रकरणात संबंधित तरुणीच्या शिक्षक असलेल्या प्रियकरानेच योजना आखून आपल्या अन्य दोघा साथीदारांसह तिला शेंडीतून पळवून नेत शहापूर तालुक्यातील एका दगडाच्या खाणीत तिची निर्घृण हत्या केल्याचे व पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पाण्यात फेकून दिल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी राजूर पोलिसांच्या मदतीने किनवलीच्या पोलीस पथकाने मयत तरुणीच्या प्रियकरासह तिघांना वेगवेगळ्या ठिकाणांवरुन अटक केली आहे. या घटनेने अकोले तालुक्यात खळबळ उडाली असून शिक्षकी पेशाला काळीमा फासणार्या या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत राजूर पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात 14 फेब्रुवारी रोजी शेंडी येथील भारती दत्तू खादे ही एकवीस वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाली होती. याबाबत तिच्या कुटुंबियांनी राजूर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंदही केली होती. तेव्हापासून राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे या तरुणीच्या शोधात होते. या दरम्यान पोलिसांनी आसपासच्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जावूनही तपासाला गती देण्याचा प्रयत्न केला, मात्र हाती काहीच लागत नव्हते.

एकीकडे या तरुणीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंकडून तिचा मागमूस काढण्याची शर्थ सुरु असतानाच दुसरीकडे पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषणाचाही आधार घेतला जात होता. त्यातूनच एक धागा हाती लागला आणि राजूर पोलिसांनी थेट नाशिकमध्ये जावून छापा घातला. मात्र पोलिसांना पोहोचण्यास काहीसा उशीर झाल्याने आरोपी तेथून निघून जाण्यात यशस्वी ठरला. मात्र त्यानंतरही पोलिसांनी त्याचा माग काढीत आरोपीच्या बहिणीचे घर गाठले. पोलिसांची ही विद्युत चपळाई पाहून हादरलेल्या आरोपीने पळून जाणं व्यर्थ असल्याचे ताडून राजूर पोलिसांसमोर शरणागती पत्करली आणि महिनाभर सुरु असलेल्या पोलिसांच्या धावपळीला प्रकाशाचा पहिला किरण दिसला.

पोलिसांना शरण आलेल्या अमोल शांताराम गोपाल (वय 33, रा.नाशिक) या पहिल्या आरोपीकडे बेपत्ता तरुणीची चौकशी केली असता त्यातून वासळी (ता.इगतपुरी) येथे कार्यरत असलेल्या दत्तू धोंडू डगळे (वय 42) या प्राथमिक शाळेच्या शिक्षकासह त्याचा दुसरा साथीदार मनोहर पुनाजी कोरडे (वय 22, रा.वासळी) या दोघांची नावे समोर आली. दत्तू डगळे याचे पूर्वीपासूनच सदरील तरुणीशी प्रेमसंबंध होते. त्यातून पाच महिन्यांपूर्वी मोठे महाभारत घडल्याने सदरचे प्रकरण राजूर पोलिसांच्या दप्तरी पोहोचले होते. त्यावेळी दोन्ही बाजूने समेट घडवण्यात आल्याने या संपूर्ण प्रेमप्रकरणावर पडदाही पडला होता. त्यामुळे पोलिसांनी केवळ डायरीला नोंद करीत सदरचे प्रकरण बंद केले होते.

या घटनेला पाच महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर सदरील मुलीच्या वयापेक्षा दुपटीने मोठ्या असलेल्या त्या नराधम शिक्षकाच्या मनातील प्रेमाला पुन्हा पाझर फुटला आणि त्याने काडीमोड झालेल्या आपल्या प्रेयसीला पुन्हा प्रेमाच्या तळ्यात उतरवण्यासाठी नोकरीचे आमिष दाखवून तिला आपला साथीदार अमोल गोपाल याच्या माध्यमातून शेंडीतून उचलले व पुढे मुख्य आरोपी दत्तू डगळे व मनोहर कोरडे यांना आपल्या वाहनात घेवून थेट ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असलेल्या साकुर्ली येथील एका दगडाच्या खाणीजवळ नेले. याठिकाणी दोघांमध्ये वाद झाल्याचा पोलिसांना संशय असून त्यानंतर आरोपींनी भारती खादे या तरुणीचा निर्घृणपणे खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिचा मृतदेह खाणीतील तलावात फेकून दिला.

एकीकडे राजूर पोलिसांकडून बेपत्ता तरुणीचा शोध सुरु असतानाच दुसरीकडे साकुर्लीच्या तलावात खून करुन फेकून दिलेल्या तरुणीचा मृतदेह फुगून वर आला. याबाबतची माहिती मिळताच किनवली पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक कमलेश बच्छाव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सदरील मृतदेह पाण्याबाहेर काढला. शवविच्छेदनात ‘त्या’ तरुणीचा खून झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी भा.दं.वि. कलम 302 सह पुराव नष्ट करण्याचे कलम 201 नुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. त्यामुळे एकाच व्यक्तीचा दोन जिल्ह्यातील पोलिसांकडून तपास सुरु झाला.

या दरम्यान किनवली पोलिसांना सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे वर्णन शेंडीतून बेपत्ता झालेल्या भारती खादे या तरुणीशी जुळत असल्याने राजूर पोलिसांनी किनवलीत जावून शहनिशा केली असता मयत झालेली तरुणी भारती खादेच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर राजूर पोलिसांनी अमोल गोपाल याच्या चौकशीतून समोर आलेल्या वासाळीचा नराधम शिक्षक दत्तू धोंडू डगळे व त्याचा साथीदार मनोहर कोरडे या दोघांनाही अटक करीत त्यांना किनवली पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. गेल्या महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या आदिवासी तरुणीचा अशाप्रकारे अंत झाल्याने अकोले तालुक्यातून हळहळ व्यक्त होत असून शिक्षकी पेशाला काळीमा फासणार्या या घटनेबाबत संतापही व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणाच्या तपासात कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा नसतानाही राजूर पोलिसांनी केवळ तांत्रिक विश्लेषणाच्या जोरावर तीनही आरोपींना जेरबंद केले. या कारवाईत राजूरचे सहायक निरीक्षक गणेश इंगळे, उपनिरीक्षक ए. जे. शेख, पोलीस नाईक दिलीप डगळे, अशोक काळे, अशोक गाडे, साईनाथ वर्पे, विजय फटांगरे, विजय मुंढे, सुनील ढाकणे, कैलास नेहे, श्रीरामपूर सायबर सेलचे पोलीस नाईक फुरकान शेख व महिला पोलीस रोहिणी वाडेकर यांनी भूमिका बजावली. राजूर पोलिसांच्या या कामगिरीचे तालुक्यातून कौतुक होत आहे.

अकोले तालुक्यातील आदिवासीबहुल क्षेत्रात राहणार्या अवघ्या 21 वर्षीय तरुणीला फूस लावून तिच्यापेक्षा वयाने दुप्पट असलेल्या नराधम शिक्षकाने तिला पळवून नेले आणि अशाप्रकारे तिचा निर्घृण खून करुन गुरुस्थानी असलेल्या शिक्षकी पेशाला काळीमा फासला आहे. या घटनेने संपूर्ण अकोले तालुक्यात संताप निर्माण झाला असून ‘त्या’ नराधमाला कठोर शिक्षा होण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे. कोणताही पुरावा हाती नसतानाही राजूर पोलिसांनी अतिशय शिताफीने या प्रकरणाचा छडा लावल्याने पोलिसांच्या कामगिरीचेही सर्वत्र कौतुक होत आहे.

