बेलापूर ग्रामसभेत विरोधकांकडून सत्ताधारी धारेवर माजी जिल्हा परिषद सदस्याने केली यशस्वी मध्यस्थी

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
आर्थिक नियोजनाबाबत ग्रामपंचायतीने केव्हा ग्रामसभा घेतली? विरोधी सदस्यांना का बोलावले नाही? त्या सभेचा अजेंडा दाखवा? असे म्हणत विरोधकांनी सत्ताधार्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यावर सरपंच-उपसरपंच यांनीही आक्रमक होत प्रत्युत्तर दिले. गरमा-गरमीच्या वातावरणात माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी मध्यस्थी करून वादावर पडदा टाकल्यामुळे बेलापूरची ग्रामसभा शांततेत पार पडली.
![]()
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील मराठी शाळेच्या मैदानात सरपंच महेंद्र साळवी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचण्यास सुरुवात केली असता ही सभा केव्हा घेतली, आम्हाला निरोप का दिला नाही? असा सवाल सदस्य भरत साळुंके, रवींद्र खटोड, बेलापूर सोसायटीचे अध्यक्ष सुधीर नवले यांनी केल्याने वाद सुरू झाला. यावेळी उपसरपंच अभिषेक खंडागळे, प्रफुल्ल डावरे, मोहसीन सय्यद यांनी तुम्ही मागे काय केले ते पण सांगा, अशी विचारणा करताच वातावरण तापले. त्यामुळे पोलीसही तातडीने ग्रामसभेस दाखल झाले. माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करू, असे सांगून तो विषय थांबविला.

त्यानंतर ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या 15 टक्के निधी मागासवर्गीयांसाठी खर्च करणे हा नियम असताना तो का केला नाही, असा सवाल विजय शेलार यांनी केला. चंद्रकांत नाईक यांनीही दलित वस्तींना न्याय देण्याची मागणी केली. त्यावर उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी मागील सत्ताधार्यांच्या काळातील मागसवर्गीय निधी वाटप झालेला नाही, असा खुलासा केला. प्रफुल्ल डावरे यांनी अनेक ठिकाणी नवीन बांधकाम झाली असून त्याचे रिव्हिजन करा अथवा नवीन नियमानुसार आकारणी करा, जेणेकरून ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढेल अशी मागणी केली. इस्माईल शेख यांनी गावातील रस्त्यावरील अतिक्रमणावरुन सवाल केला, गोविंद वाबळे व राकेश कुंभकर्ण यांनी फलकांबाबत नियम बनवावेत अशी मागणी केली.

कमलेश सातभाई, संजय रासकर यांनी सातभाई वसाहतीतील स्मशानभूमीचा लागलेला फेर कसा रद्द झाला अशी विचारणा केली असता सरपंच महेंद्र साळवी यांनी सदरचा फेर 2010 सालीच रद्द झाला असून जागा ताब्यात घेण्याबाबत कार्यवाही करू असे सांगितले. शरद नवले यांनी पाणी योजनेची सविस्तर माहिती दिली. पाणीपुरवठा योजनेकरिता जमीन मिळावी, याकरिता उच्च न्यायालयात दावा दाखल करणारे विलास मेहेत्रे, संजय शिरसाठ, मुस्ताक शेख यांचा तसेच पाणी पुरवठा योजनेतील टाक्यांसाठी जागा देणारे माधव कुर्हे, प्रकाश मेहेत्रे, नामदेव मेहेत्रे, मनोज मेहेत्रे, जनार्धन दाभाडे यांचा सत्कार केला. यावेळी तबस्सुम बागवान, शिला पोळ, स्वाती अमोलिक, प्रियंका कुर्हे, जालिंदर कुर्हे, प्रकाश नवले, लहानू नागले, भाऊसाहेब तेलोरे, दत्ता कुर्हे, प्रभाकर कुर्हे, विशाल आंबेकर, अमोल गाढे, अजीज शेख, अय्याज सय्यद, जाकीर शेख, भाऊसाहेब कुताळ, महेश कुर्हे, सचिन वाघ, सुरेश कुर्हे आदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
