जिल्ह्यात आज तिसर्या लाटेतील उच्चांकी रुग्ण! एकूण रुग्णसंख्येत अकोले पहिल्या पाचमध्ये; जिल्ह्याची सरासरीही पाचशेहून अधिक..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यात कोविड संक्रमणाच्या तिसर्या लाटेचा बॉम्ब फुटला असून आज उच्चांकी रुग्ण समोर आले आहेत. आजच्या रुग्णवाढीत अहमदनगर महापालिका क्षेत्राशिवाय श्रीरामपूर, पाथर्डी, नगर तालुका व अकोले तालुक्यातून शंभराहून अधिक रुग्ण समोर आले असून उच्चांकी रुग्णसंख्येत जिल्ह्यातील पहिल्या पाच तालुक्यांमध्ये अकोल्याचा समावेश झाला आहे. आज जिल्ह्यातून एकूण 1 हजार 544 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात अकोल्यातील 120 तर संगमनेरातील 45 रुग्णांचा समावेश आहे. जानेवारीत आत्तापर्यंत आढळून आलेली जिल्ह्यातील ही सर्वोच्च रुग्णसंख्या असून सक्रीय रुग्णांच्या संख्येनेही साडेसात हजारांचा आकडा ओलांडला आहे.
गेल्या 5 जानेवारीपासून जिल्ह्यातील रुग्णवाढीचा आलेख उंचावण्यास सुरुवात झाली. मात्र सुरुवातीच्या काळात राज्यातील एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत समोर येणार्या रुग्णांची संख्या नियंत्रित वाटत असतांना मागील पाचच दिवसांत जिल्ह्यात तब्बल सहा हजारांहून अधिक रुग्ण समोर आले. 1 ते 10 जानेवारी या कालावधीत रुग्ण समोर येण्याची सरासरी गती 140 रुग्ण प्रती दिवस होती, त्यात टप्प्याटप्प्याने वाढ होवून 11 ते 20 जानेवारी या कालावधीत जिल्ह्यात 873 रुग्ण दररोज इतक्या मोठ्या गतीने अवघ्या दहा दिवसांत जिल्ह्यात 8 हजार 729 रुग्णांची भर पडली. 1 जानेवारी रोजी जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या अवघी 346 होती, त्यात गेल्या 20 दिवसांत मोठी भर पडून जिल्ह्यात आज साडेसात हजारांहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत.
जिल्ह्यात गेल्या 20 दिवसांत सरासरी 507 रुग्ण या गतीने 10 हजार 130 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यात (कंसात दैनिक सरासरी) रुग्णसंख्येच्या क्रमानुसार अहमदनगर महापालिका क्षेत्र 3 हजार 410 (171), राहाता 947 (47), नगर तालुका 692 (35), श्रीरामपूर 572 (29), अकोले 500 (25), पाथर्डी 462 (23), पारनेर 431 (22), कोपरगाव 375 (19), श्रीगोंदा 363 (18), संगमनेर 313 (16), शेवगाव 260 (13), राहुरी 258 (13), नेवासा 245 (12), जामखेड 156 (8) व कर्जत 155 (8) या पद्धतीने तालुकानिहाय रुग्णांचा समावेश आहे. 1 जानेवारीरोजी जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 3 लाख 59 हजार 30 होती त्यात अवघ्या 19 दिवसांत दहा हजार रुग्णांची भर पडून ती आता 3 लाख 69 हजार 126 झाली आहे. 20 दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील 11 नागरिकांचा कोविड संसर्गातून बळीही गेला आहे.
अपवाद वगळता गेल्या सहा दिवसांत संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येतही काहीशी वाढ झाली आहे. त्या श्रृंखलेत आज 45 रुग्णांची भर पडली असून त्यात शहरातील तिघांसह भारतीय स्टेट बँकेतील तब्बल सहा कर्मचार्यांचा समावेश आहे. आज शहरातील अशोक चौक येथील 32 वर्षीय महिला, मालदाड रोडवरील 19 वर्षीय तरुण व नायकवाडपुरा येथील 30 वर्षीय महिलेसह स्टेट बँकेतील 53 वर्षीय इसमासह 37 व 35 वर्षीय तरुण, 39, 37 व 29 वर्षीय महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय अन्य तालुक्यातील 54 वर्षीय इसमाचाही त्यात समावेश आहे.
तालुक्याच्या ग्रामीणभागातील हिवरगाव पठारावरील 16 वर्षीय मुलगा, साकूर येथील 32 वर्षीय महिलेसह 12 वर्षीय मुलगा, आरामपूर येथील 55 वर्षीय महिलेसह 20 वर्षीय तरुणी, धांदरफळ खुर्द येथील 18 वर्षीय तरुणीसह नऊ वर्षीय मुलगी, नांदुरी दुमाला येथील 28 वर्षीय तरुण, घारगाव येथील 23 वर्षीय महिला, घुलेवाडीतील 42, 35, 33 व 24 वर्षीय तरुणांसह 41 व 38 वर्षीय महिला व 13 वर्षीय मुलगी, जोर्वे येथील 39 व 19 वर्षीय तरुण, रायतेवाडीतील 33 वर्षीय तरुण, राजापूर येथील 35 वर्षीय महिला, सह्याद्री महाविद्यालय परिसरातील 19 वर्षीय तरुणी,
शेडगाव येथील 41 व 36 वर्षीय तरुण, उंबरी बाळापूर येथील 35 व 24 वर्षीय महिला, हिवरगाव पावसा येथील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, आश्वी बु. येथील 20 वर्षीय तरुण, आश्वी खुर्द येथील 40 वर्षीय तरुण, चंदनापुरीतील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 58 वर्षीय महिला, मोधळवाडीतील 23 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 56 वर्षीय इसमासह 29 वर्षीय महिला व रहिमपूर येथील 36 वर्षीय महिलेसह 33 वर्षीय तरुण अशा एकूण 45 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तालुक्याची आजवरची एकूण रुग्णसंख्या आता 35 हजार 119 झाली आहे. तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचा सरासरी वेगही आता 99.33 टक्के इतका आहे.
गेल्या काही दिवसांत सार्वजनिक सेवेत असलेल्या व्यक्ति बाधित होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सुरुवातीला संगमनेरचे तहसीलदार, त्यानंतर शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांसह एक अधिकारी आणि सात कर्मचारी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि आता भारतीय स्टेट बँकेतील तब्बल सहा कर्मचार्यांनाही कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरी सेवेतील अधिकारी व कर्मचार्यांनी मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतराच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याची गरजही निर्माण झाली आहे.