लव्ह जिहादच्या संशयातून संगमनेरात एकाला बेदम मारहाण! आठ जणांना अटक; पोलिसांच्या तत्काळ भूमिकेने ‘बाका’ प्रसंग टळला..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहराच्या उपनगरातील एका कॅफे सेंटरमध्ये एका मुलीसोबत गप्पा मारत बसल्याचे पाहून हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचे समजून दहा ते पंधरा जणांनी दोघांचे अपहरण करीत त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेत दोन भिन्न समाजातील तरुणांमध्ये हा वाद झाल्याने त्याचे पडसाद सार्वजनिक शांततेवर उमटण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. मात्र पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी कठोर भूमिका घेत शेकडोंच्या संख्येने जमलेल्या जमावाला तत्काळ कारवाईचे आश्वासन देत आज पहाटेपर्यंत आठ जणांना अटक केली आहे. या घटनेनंतर काहीकाळ शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. जखमी फिर्यादीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पंधरा जणांवर अपहरणासह दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदर प्रकरणाची सुरुवात शनिवारी (ता.26) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मालदाड रोडवरील डिलाईट कॅफे सेंटर येथून झाली. सिन्नर तालुक्यातील एक तरुणी सचिनकुमार महंतो या आपल्या मित्रासोबत या कॅफे हाऊसमध्ये बसलेली असतांना काही वेळाने तेथे डोक्यावर टोपी असलेला एक तरुण येवून बसला व त्यानंतर त्यांच्यात तेथेच गप्पा रंगल्या. हा सर्व प्रकार पाहून काहींना हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा संशय आल्याने त्यांनी आपल्या अन्य सहकार्यांना ‘त्या’ कॅफे हाऊसमध्ये बोलावून घेतले.
काही वेळातच पाच ते सहा जण मालदाड रोडवरील त्या कॅफे हाऊसजवळ आले आणि त्यांनी त्या दोघाही तरुणांना बळजोरीने दुचाकीवर बसवून सुकेवाडी-खांजापूर परिसरातील विठ्ठलकडा परिसरात नेले. तेथे आणखी काही तरुण एकत्रित येवून दहा ते पंधरा जणांनी त्या दोघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत कोल्हेवाडी रोड परिसरात राहणार्या मफाज मतीनखान पठाण (वय 19) याच्यासह सचिनकुमार महंतो किरकोळ जखमी झाला. ही घटना समोर आल्यानंतर एका समाजाचा जमाव आरोपींवर तत्काळ कारवाईसाठी आक्रमक होवून पोलीस ठाण्यात आला होता.
यावेळी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी जमावाला समोरे जावून कायद्यानुसार योग्य असेल त्याप्रमाणे कारवाई होईल, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. त्यामुळे नाहक गर्दी करुन रमजानच्या पवित्र महिन्यात शहराचे सामाजिक स्वास्थ खराब न करण्याचे आवाहन जमावाला केले. दरम्यानच्या कालावधीत तिघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यशही आल्याने जमाव शांत झाला. यानंतर पोलिसांनी खासगी रुग्णालयात उपचार घेणार्या मफाज पठाण याचा जवाब नोंदवून दहा ते पंधरा जणांच्या विरोधात दरोड्याचे कलम 395, अपहरण करणे 363, जीवे मारण्याची धमकी देणे 506 यासह बेकायदा जमाव जमवून दंगल घडवल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपासाला गती देत शहर व उपनगराच्या विविध भागातून करण संपत गलांडे (वय 21, रा.अभंगमळा), सोहम शेखर नेवासकर (वय 22, रा.गणेशनगर), ओंकार राजेंद्र जोर्वेकर (वय 19, रा.अकोले नाका), विश्वास सीताराम मोहरीकर (वय 21, रा.नेहरु चौक), संकेत बाबासाहेब सोनवणे (वय 21), अजीत अंकुश भरते (वय 24, दोघेही रा.कुंभार आळा), निशांत नंदू अरगडे (वय 21, रा.अरगडे गल्ली) व विक्रम खडकसिंग लोहार (वय 22, रा.घुलेवाडी) या आठ जणांना अटक केली असून त्यांना आज न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे.
या प्रकरणात पोलिसांनी गांभीर्य ओळखून तातडीने कारवाई केल्याने जातीय तणावासारखा ‘बाका’ प्रसंग निर्माण होण्यापूर्वीच् निवळला. पहाटे दोनच्या सुमारास पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनीही संगमनेरला भेट देवून परिस्थितीची माहिती घेतली व अधिकार्यांना तपासाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या.
गेल्या काही वर्षांपासून रमजानच्या काळात शहरातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करणार्या घटना समोर येत आहेत. यापूर्वी एका पोलीस कर्मचार्याला मारहाण झाल्यावरुनही ऐन रमजानमध्ये शहरातील वातावरण बिघडले होते. यावेळीही रमजानचा महिना सुरु होताच हा प्रकार समोर आल्याने यामागे जाणीवपूर्वक काही गोष्टी तर नाहीत? याचाही शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा आज राखेच्या खाली धगधगणारा विस्तव उद्या धुमसायलाही वेळ लागणार नाही.