मतदारांनी कौल दिल्यास संगमनेरात छत्रपतींचा अश्वारुढ पुतळा उभारणार! भाजप पदाधिकार्‍यांची घोषणा; ठेकेदारांनी संगमनेरची रया घालवल्याचाही घणाघात..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहराला मोठे ऐतिहासिक महत्व प्राप्त असून जालना लुटीनंतर रायगडावर परततांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने संगमनेरची भूमि पावन झाली आहे. मात्र इतिहासाच्या पाऊलखुणांची जपवणूक करण्यात संगमनेर नगरपालिका अपयशी ठरली असून संगमनेरकरांनी भाजपला कौल दिल्यास शहरात एक एकराच्या विस्तीर्ण परिसरात स्वराज्य निर्माते छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा असलेले देखणे स्मारक उभे करु असे आश्वासन भाजपाचे शहराध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपुले व सरचिटणीस जावेद जहागिरदार यांनी दिले. गेल्या तीन दशकांत संगमनेरातील केवळ ठेकेदारांचा विकास झाला असून त्यांनी केलेल्या सुमार कामांमूळे ऐतिहासिक संगमनेर शहराची अक्षरशः रया गेल्याचा घणाघातही या द्वयींनी यावेळी केला आहे.

सोमवारी दैनिक नायकशी बोलताना भाजपाचे शहर सरचिटणीस जावेद जहागिरदार म्हणाले की, संगमनेर शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. शिवकालपूर्व अहमदनगरच्या निजामशहाची हुकूमत असताना शहाजीराजे भोसले यांनी छोट्या मुर्तुजा निजामाला मांडीवर बसवून संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर स्वतंत्र राज्याची घोषणा केली होती. दुर्दैवाने त्यावेळी त्यांना लष्करी सामर्थ्य प्राप्त न झाल्याने त्यांचा मनसुबा सफल झाला नाही. परंतु त्यातूनच प्रेरणा घेवून राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या आशीर्वादाने शिवरायांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.

छत्रपती शिवरायांच्या जीवनातील अखेरची लढाई संगमनेरात लढली गेल्याचे काही इतिहासकार सांगतात असा दाखला देताना जहागिरदार यांनी 1679 साली तत्कालीन जालनापूर (जालना) लुटीनंतर छत्रपती शिवाजी महाराज संगमनेरातूनच पुढे अकोले तालुक्यातील पट्टे किल्ल्यावर विश्रांतीसाठी गेल्याचा ऐतिहासिक दाखलाही यावेळी दिला. छत्रपती शिवरायांनंतर पेशवाईच्या काळातही संगमनेरचे महत्व अबाधित होते. थोरले बाजीराव आणि मस्तानी यांचे नावही पेमगिरीच्या किल्ल्याशी जोडल्याचे सांगत जहागिरदार यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील संगमनेरातील घडामोडींचा उल्लेख करतांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान विभूतींचा पदस्पर्श संगमनेरला झाल्याचे यावेळी सांगितले.

मात्र नगरपालिकेच्या उदासिनतेमुळे संगमनेरचा ऐतिहासिक ठेवा जतन केला गेला नाही असा आरोप भाजपाचे शहराध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपुले यांनी केला. छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श झालेल्या राज्यातील अनेक शहरांमध्ये त्यांची सुंदर व प्रेरणादायी स्मारके उभारली गेली. संगमनेर नगरपालिकेकडून मात्र आजवर कधीही असा प्रयत्नही केला गेला नाही. मागील तीन दशकांमध्ये तर पालिका पदाधिकार्‍यांनी केवळ ठेकेदारांचे आर्थिक हित जोपासण्याचा एककलमी कार्यक्रम राबविल्याने व त्यातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने संगमनेरची अक्षरशः रया गेल्याचा घणाघातही अ‍ॅड. गणपुले यांनी यावेळी केला.

स्वच्छ कारभार आणि उत्तम सुशासन हा भाजपाचा मूलमंत्र असून राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची टीम दिवसरात्र कार्यरत आहे. मात्र केवळ घराणेशाहीच्या स्वार्थी राजकारणामुळे विकासाची ही गंगा आजवर संगमनेरात पोहोचू न देण्याचे पाप स्थानिक सत्ताधार्‍यांनी केले असून विकासाच्या नावाखाली संगमनेरात सुराज्याऐवजी ठेकेदारांचे राज्य निर्माण केले आहे. पालिकेकडून करण्यात आलेल्या कोणत्याही कामाला दर्जा नसून शाळेचे तोंडही न पाहिलेले ठेकेदार गटारी आणि रस्ते बांधणीची कामे घेवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करीत आहेत. पालिकेकडून सुरु असलेला लुटीचा हा कारभार सहन करुन आता संगमनेरकर पुरते वैतागले असून सुशासन आणि स्वच्छ कारभाराचा शब्द देत आम्ही त्यांना पर्याय उपलब्ध करुन देत असल्याचेही अ‍ॅड. गणपुले यावेळी म्हणाले.

संगमनेरकरांनी भाजपाला कौल दिल्यास प्रत्येकाच्या मनातील शिवस्मारक निर्माण करण्याची आमची योजना असल्याचे जहागिरदार म्हणाले. त्यासाठी शहरातील एक एकरचे क्षेत्र आम्ही निश्चित केले असून त्याठिकाणी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यासह त्यांच्या पराक्रमी इतिहासाची आणि संगमनेरातील ऐतिहासिक घटनांबाबत आजच्या पिढीला माहिती व्हावी यासाठी संग्रहालय उभारण्याचीही संकल्पना असल्याचे त्यांनी सांगितले. ठेकेदारीत बरबटलेले तीस वर्ष आणि सुशासनातले पाच वर्ष यातील फरक लक्षात येण्यासाठी संगमनेरकरांनी यावर्षी भाजपावर विश्वास दाखवून परिवर्तन घडवावे व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या संगमनेरच्या सर्वागीण विकासासाठी भाजपाला कौल द्यावा असे आवाहन यावेळी अ‍ॅड. गणपुले व जहागिरदार यांनी केले.


संगमनेरात छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव स्मारक अरगडे गल्लीत असून सन 1980 साली तत्कालीन नगराध्यक्ष नूरमोहम्मद यांच्या कार्यकाळात ते उभारण्यात आले होते. या घटनेला आज चाळीस वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, मात्र या कालावधीत ना आहे त्या स्मारकाचा विस्तार करुन त्याचे सुशोभिकरण झाले, ना अन्य पर्यायी जागांचा त्यासाठी विचार केला गेला. केवळ ठेकेदारांना पोसून ‘कट’ घेण्यातच सत्ताधार्‍यांनी विकास साधला असून सर्वसामान्य संगमनेरकरांच्या अपेक्षा धुळीस मिळवल्या गेल्या आहेत. स्वच्छ कारभार आणि उत्तम सुशासनाचा भाजपचा मंत्र घेवून आम्ही यावर्षीच्या निवडणुकीत उतरत असून संगमनेरकरांनी ठेकेदारांची सत्ता उलथवून लावावी व आम्हाला पाच वर्ष संधी देवून पाहावी, जनतेच्या मनातील कारभार आम्ही करुन दाखवू असे अभिवचन आम्ही देतो.
– जावेद जहागिरदार
माजी उपनगराध्यक्ष, सरचिटणीस – शहर भाजप

Visits: 318 Today: 1 Total: 1106385

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *