समृद्धी महामार्गावर भरधाव वेगातील कारने तोडला कठडा सुदैवाने चालकाचा जीव वाचला; कारचे मात्र मोठे नुकसान
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
समृद्धी महामार्गावर अपघाताची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असलेली कार थेट संरक्षण कठड्यावर चढली अन् खाली कोसळता कोसळता वाचली. अगदी थोडक्यात कार चालकाचा जीव वाचला आहे. खरंतर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे दोन महिन्यांपूर्वी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. या महामार्गावर वाहन चालकांना वेग मर्यादा देखील देण्यात आलेली आहे. परंतु काही वाहनचालक वेग मर्यादेचं उल्लंघन करताना दिसत असून अपघातांच्या संख्येत देखील प्रचंड वाढ झाली आहे.
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातून जाणार्या समृद्धी महामार्गावर सोमवारी (ता.13) दुपारी एक भरधाव कार समृद्धी महामार्गाच्या कोपरगाव येथील टोलनाक्याजवळ असलेल्या संरक्षण कठड्यावर चढली. यामध्ये संरक्षण कठड्याचा काही भाग फुटला असून कार अर्धी बाहेर आली होती. रस्त्यापासून पुलाची उंची 25 ते 30 फूट आहे. सुदैवाने संरक्षण कठड्याजवळ कार अडकल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. चालक देखील यामध्ये बालंबाल बचावला आहे. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत महामार्ग पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कार चालक बाळासाहेब धरम हे एकटेच आपल्या कारमधून (क्र. एमएच.17, सीएम.4074) औरंगाबादहून शिर्डीच्या दिशेने येत असताना सोमवारी दुपारच्या सुमारास त्यांचा कारवरील ताबा सुटला आणि भरधाव कार समृद्धी महामार्गावर असलेल्या संरक्षण कठड्यावर जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की यात समृद्धी महामार्गाच्या संरक्षण कठड्याचा काही भाग कोसळला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून कारचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती महामार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर महामार्ग पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि चालकाला रुग्णालयात उपचारासाठी नेले. या अपघातात कारमध्ये असलेले कारचालक बाळासाहेब धरम हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, समृद्धी महामार्गावर संरक्षण कठड्यावर कार चढल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. तर काहीजण हे सर्व छायाचित्र मोबाईलमध्ये कैद करत होते. दरम्यान, महामार्ग पोलीस आणि समृद्धी महामार्गावरील कर्मचार्यांनी मदतकार्य करत क्रेनच्या साहाय्याने ही कार संरक्षण कठड्यावरून बाजूला काढली.