संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागात कोविडचा पुन्हा उद्रेक..! ग्रामीण भागाची रुग्णगती वाढूनही शहरात मात्र दिलासा कायम..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जुलैपासून धक्क्यामागून धक्के देणार्या कोविडने ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही रुग्णवाढीचे धक्के देण्याचे तंत्र कायम ठेवलेले असतांना ऑक्टोबर मात्र त्याला अपवाद ठरला होता. पन्नासच्या आसपास रुग्णगती ठेवीत ऑक्टोबरचा पहिला आठवडा मावळला. मात्र त्यानंतर शहरासह तालुक्यातील रुग्ण गती टप्प्याटप्प्याने मागे सरुन कालपर्यंत सरासरी 32 रुग्ण प्रति दिवसावर येवून पोहोचली होती. मात्र महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोविडने तालुक्याच्या ग्रामीण भागाला जोरदार धक्का देत तब्बल 64 रुग्णांची भर घातल्याने गेली तीस दिवस ओहोटी लागलेल्या तालुक्याला आज रुग्णसंख्येची भरती अनुभवावी लागली. आज एकाच दिवसाच्या रुग्णवाढीने तालुक्याची सरासरी उंचावत 33.65 वर पोहोचवली आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुका आता त्रेचाळीसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर 4 हजार 290 वर पोहोचला आहे. शहरातून मात्र समाधानकारक चित्र असून ग्रामीण भागातील रुग्णगतीत वाढ झाली असली तरीही, शहरी रुग्णगती मात्र आणखी मागे सरली आहे. आजच्या एकूण रुग्णसंख्येत शहरातील अवघ्या चौघांचा समावेश आहे.

मागील महिन्यात तालुक्यातील रुग्णवाढीचा दर दिवसाला 51 रुग्ण दररोज असा होता. त्यामुळे एकट्या सप्टेंबरमध्ये तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत तब्बल 1 हजार 529 रुग्णांची भर पडली. रुग्णवाढीचा असाच चढताक्रम चालू महिन्यातही कायम राहील असाच काहीसा अंदाज असतांना या महिन्याने मात्र संगमनेरकरांना अगदी सुरुवातीपासून दिलासा दिला होता. त्यामुळे गेल्या महिन्यापर्यंत चढत्या दिशेने जाणारा तालुक्याचा कोविड आलेख या महिन्यात उलटा फिरुन मागे सरत गेल्याने जिल्ह्यासह तालुका ‘कोविड मुक्ती’कडे मार्गक्रमण करीत असल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. मात्र आज तालुक्याच्या सरासरी रुग्णगतीत 1.65 ने वाढ झाल्याने काहीशा चिंता वाढल्या आहेत. कालपर्यंत तालुक्याची चालू महिन्यातील रुग्णसंख्या 979 होती. एकंदरीत रोजच्या सरासरीनुसार आज त्यात फारतर 21 रुग्णांची भर पडेल असे वाटत होते. मात्र प्रत्यक्षात आज 64 रुग्णांची भर पडल्याने महिन्यातील एकूण 1000 अपेक्षित असणारी रुग्णसंख्या 1 हजार 43 वर पोहोचली आहे.

गेल्या 31 दिवसांत संगमनेर तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत 1 हजार 43 रुग्णांची भर पडली. त्यातील 191 रुग्ण शहरी तर 852 रुग्ण ग्रामीणभागातील आहेत. दररोज समोर येणार्या रुग्णसंख्येत शहरी रुग्ण समोर येण्याचे प्रमाण 19.10 टक्के तर ग्रामीण रुग्ण समोर येण्याचे प्रमाण 80.90 टक्के आहे. महिन्याभरात दररोज 32.63 टक्के गतीने एकूण, तर 6.19 टक्के गतीने शहरी व 27.45 टक्के गतीने ग्रामीणभागातील रुग्ण समोर येत आहेत. या महिन्यात रॅपिड अँटीजेन चाचणीतून 715, शासकीय प्रयोगशाळेतून 14 तर खासगी प्रयोगशाळेतून 314 रुग्ण निष्पन्न झाले आहेत.

आज रॅपिड अँटीजेन चाचणीतून तब्बल 54 रुग्ण तर खासगी प्रयोगशाळेकडून दहा रुग्ण समोर आले आहेत. आजच्या एकूण रुग्णसंख्येत संगमनेर शहरातील अवघ्या चार रुग्णांचा समावेश आहे. त्यात जनता नगर परिसरातील 51 वर्षीय इसम, अभंगमळा परिसरातील 41 वर्षीय तरुण, गुजर गल्लीतील 40 वर्षीय तरुण व मालदाड रोड येथील 33 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव आला आहे. यासोबतच शहरालगतच्या घुलेवाडी शिवारातील साईश्रद्धा चौकातील 53 वर्षीय महिलेलाही संक्रमण झाले आहे.

ग्रामीण भागातील निमगाव टेंभी, कुरकुंडी, ओझर बुद्रुक, राजापूर, आश्वी बुद्रुक आणि घुलेवाडी येथे बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी नियमांचे पालन करीत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. आज ग्रामीण भागातील 60 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यात हंगेवाडी येथील 52 वर्षीय इसमासह 47 वर्षीय महिला, ओझर बुद्रुक येथील 55 वर्षीय इसमासह 28 वर्षीय तरुण, 50 व 27 वर्षीय महिला, पिंपरणे येथील 35 वर्षीय महिलेसह 24 वर्षीय तरुण, कनोली येथील 70 वर्षीय इसमासह 65 वर्षीय महिला, रायतेवाडी येथील 50 वर्षीय महिलेसह 32 वर्षीय तरुण, खांडगाव येथील 60, 40 व 23 वर्षीय महिला आणि 18 वर्षीय तरुण,

वरुडी पठार येथील 20 वर्षीय महिला, निमगाव टेंभी येथील 50, वर्षीय इसमासह 22 वर्षीय दोघे तरुण, 55, 45 व 18 वर्षीय महिला, घारगाव येथील 45 वर्षीय तरुण, कुरकुंडी येथील 29 वर्षीय तरुणासह पाच वर्षीय बालक, 60 व 25 वर्षीय महिलेसह आठ आणि चार वर्षीय मुली, राजापूर येथील 44 वर्षीय तरुणासह 40 व 29 वर्षीय महिला, 17 व 15 वर्षीय तरुणी, जोर्वे येथील 42 वर्षीय तरुणासह 40 वर्षीय महिला, आश्वी बुद्रुक येथील 58, 43 व 29 वर्षीय इसमासह 55 व 30 वर्षीय महिला, तसेच 9, 7 व एक वर्षीय बालिका, अंभोरे येथील 43 वर्षीय तरुण, ढोलेवाडी येथील 46 वर्षीय इसम,

घुलेवाडी येथील 42 वर्षीय दोघा तरुणांसह 40 वर्षीय महिला व सात वर्षीय बाालिका, वरवंडी येथील 31 वर्षीय महिला, सारोळे पठार येथील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, चनेगाव येथील 50 वर्षीय इसम, मेंढवण येथील एकूण 80 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मंगळापुर येथील 42 वर्षीय तरुण, साकुर येथील 55 वर्षीय महिला व गुंजाळवाडी येथील 30 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव प्राप्त झाला आहे. आज शहरातील चौघांसह ग्रामीण भागातील 60 जणांचे अहवाल पॉझिटिव प्राप्त झाल्याने तालुक्याची रुग्णसंख्या 43 व्या शतकाच्या उंबरठ्यावर 4 हजार 290 वर पोहोचली आहे.

अर्थात आज ग्रामीण भागातील एकाच गावातून अधिक रुग्ण समोर आल्याचे दिसत असले तरीही, त्यात परस्परांच्या संपर्कातून संसर्ग झालेल्यांची म्हणजेच एकाच कुटुंबातील सदस्यांची संख्या अधिक आहे. एका गावातून अधिक रुग्ण समोर आले याचा अर्थ त्या गावात मोठ्या प्रमाणात कोविडचा प्रादुर्भाव झाला आहे असे नाही. सध्याच्या स्थितीत समोर येणारे रुग्ण लक्षणे नसलेले अधिक आहेत. त्यामुळे एखाद्याला संसर्ग झाला तरीही त्याची लक्षणे दिसत नसल्याने ती व्यक्ती आपल्याच घरात सहजतेने वावरत असल्याने कुटुंबातील अन्य सदस्यांनाही त्याचा प्रादुर्भाव होतो. त्यातूनच एखाद्याला लक्षणे दिसू लागल्यास कुटुंबातील अन्य मंडळी बाधित असल्याचे समोर येते, मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. यामुळे संगमनेरकरांनी अधिक सतर्क राहून बाहेर निघताना कटाक्षाने मास्कचा वापर केला पाहिजे. संपूर्ण देशातून कोरोना आता माघार घेत आहे. अशा स्थितीत आपला निष्काळजीपणा त्याला गालबोट लावू शकतो, याचे भान प्रत्येक जबाबदार नागरिकाला ठेवावे लागणार आहे. म्हणूनच नियम पाळा, आपणही सुरक्षित रहा, आपल्या कुटुंबाला आणि पर्यायाने आपल्या देशालाही सुरक्षित ठेवा.

अहमदनगर जिल्ह्यात आज २०७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५४ हजार ५३ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.९४ टक्के झाले आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्येत २६० ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १ हजार ४२८ इतकी झाली आहे.

आज शासकीय प्रयोगशाळेकडून ४३, खाजगी प्रयोगशाळेकडून ४८ तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून १६९ रुग्ण समोर आले.
शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून अहमदनगर महापालिका क्षेत्रातील २४, जामखेड ०१, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०९, नेवासा ०२, पारनेर ०३, पाथर्डी ०२ आणि इतर जिल्ह्यातील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.

खाजगी प्रयोगशाळेचा अहवालातून अहमदनगर महापालिका क्षेत्रातील १४, अकोले ०२, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०१, पारनेर ०२,पाथर्डी ०२, राहाता ०५, राहुरी ०२, संगमनेर १०, शेवगाव ०१, श्रीरामपूर ०१, व लष्करी परिसरातील एका रुग्णाचा समावेश आहे.

रॅपिड अँटीजेन चाचणीतून आज १६९ जण बाधित आढळुन आले. यामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ०९, अकोले १०, जामखेड ०१, कर्जत ०५, कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०१, नेवासा १२, पारनेर २४, पाथर्डी १०, राहाता ०८, राहुरी ०५, संगमनेर ५४, शेवगाव ०३, श्रीगोंदा १४, श्रीरामपूर ०६, व लष्करी परिसरातील एका रुग्णाचा समावेश आहे.

आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील २०, अकोले १४, जामखेड ०८, कर्जत २६, कोपरगाव ०७, नगर ग्रा.०२, नेवासा ०९, पारनेर ०२, पाथर्डी १९, राहाता १८, राहुरी ०३, संगमनेर ३२, शेवगाव ३०, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर ०३, लष्करी परिसरातील ०१ व लष्करी रुग्णालयातील एका रुग्णांचा समावेश आहे.

- जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या : ५४ हजार ५३..
- जिल्ह्यात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची एकूण संख्या : १ हजार ४२८..
- जिल्ह्यातील आजवरचे एकूण मृत्यू : ८६१..
- जिल्ह्यातील आजवरची एकूण रुग्णसंख्या : ५६ हजार ३४२..
- जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९४ टक्के..
- आज जिल्ह्यातील २०७ रुग्णांना डिस्चार्ज तर २६० बाधितांची नव्याने पडली भर..

