भंडारदरा धरण सत्तर तर मुळा धरणात बावन्न टक्के पाणीसाठा! पावसाला जोर नाही; मात्र संततधारेने जिल्ह्यातील मोठ्या धरणांची स्थिती समाधानकारक
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संपूर्ण जिल्ह्याच्या अर्थकारणाचे केंद्र असलेल्या धरणांच्या पाणलोटात गेल्या आठवडाभरापासून संततधार सुरु असून जिल्ह्यातील तिनही मोठ्या धरणांचा पाणीसाठा समाधानकारक स्थितीत पोहोचला आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील घाटघर आणि रतनवाडीत आषाढसरींचा खेळ सुरु असल्याने धरणातील पाण्याची आवक कायम असून पाणीसाठा सत्तर टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे 15 ऑगस्टपूर्वी भरण्याची परंपरा यंदाही कायम राहण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मुळा खोर्यातील पावसाचा जोरही ओसरला आहे, मात्र संततधार कायम असल्याने धरणात होणारी पाण्याची आवकही कायम असून धरणाने 52 टक्क्यांची पातळी गाठली आहे. अकोले तालुक्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर अवलंबून असलेल्या धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस होत असला तरी उत्तरेकडील आढळा खोर्याला अद्यापही पावसाची प्रतीक्षा असल्याचे चित्रही पहायला मिळत आहे.
आगमनानंतर दीर्घकाळ मरगळ आलेल्या वरुणराजाला मागील आठवड्यापासून काहीसा जोर चढला. तत्पूर्वी भर पावसाळ्यात जिल्ह्यातील मोठ्या धरणांचे पाणीसाठे उणे होवू लागल्याने काहीशा चिंता निर्माण झाल्या होत्या. त्यातच आषाढाचा महिना म्हणजे पाणलोटात पावसाचा रुद्रावतार अनुभवायला मिळणारा काळ असतो. यंदामात्र आषाढातील पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही पाणलोटात सूर्यदर्शन होत राहिल्याने आदिवासी बांधवांसह लाभक्षेत्रातही चिंता निर्माण झाल्या होत्या. मात्र आठ-दहा दिवसाच्या पावसाने धरणांचे चित्रच पालटले असून भंडारदरा व मुळा धरणाचा पाणीसाठा समाधानकारक स्थितीत पोहोचवला आहे. आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत भंडारदर्यात 70 टक्के, मुळा धरणात 52 टक्के तर निळवंडे धरणात 32 टक्के पाणी जमा झाले आहे.
भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील रतनवाडी व घाटघर परिसरात पावसाचा जोर काहीसा मंदावला असला तरीही आषाढसरींचा खेळ कायम असल्याने धरणातील पाण्याची आवक कायम आहे. गेल्या चोवीस तासांत भंडारदर्याच्या पाणीसाठ्यात तब्बल 311 दशलक्ष घनफूटाची नव्याने भर पडली असून त्यातील 71 दशलक्ष घनफूट पाणी टनेलद्वारा विद्युतगृहात सोडण्यात आले. निळवंडे धरणाच्या पाणलोटातील कळसूबाईच्या शिखरांवरही संततधार सुरु असून कृष्णवंतीवरील 112.66 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या वाकी जलाशयाच्या भिंतीवरुन 1 हजार 22 क्युसेक्स व भंडारदरा धरणातून सोडण्यात आलेले 840 क्युसेक्स असे सुमारे दोन हजार क्युसेक्स पाणी रंधा धबधब्यावरुन कोसळत निळवंडेच्या जलसाठ्यात मिसळत आहे. गेल्या चोवीस तासांत निळवंडे धरणात 260 दशलक्ष घनफूट नव्याने पाणी दाखल झाले आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मुळा धरणाच्या पाणलोटातील हरिश्चंद्रगडाच्या माथ्यावर आषाढसरींचा खेळ भरात असून मंगलगंगा नदी आवेशाने वाहत आहे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या उर्वरीत परिसरातील पावसाचा जोर पूर्णतः ओसरला असून अधुनमधून कोसळणार्या आषाढसरींनी मुळेकडे धावणारे ओघळ मात्र जिवंत ठेवले आहेत. आज सकाळी सहा वाजता कोतुळनजीकच्या मुळापात्रातून 5 हजार 527 क्युसेक्सचा प्रवाह वाहत असून गेल्या चोवीस तासांत मुळा धरणात सर्वाधिक 422 दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले आहे.
अकोले पश्चिम तालुक्याच्या पश्चिमेकडील घाटमाथ्यावर कमी-अधिक प्रमाणात पावसाचा जोर टिकून असला तरीही उत्तरेकडील आढळा व भोजापूर या दोन्ही जलाशयांच्या पाणलोटाला अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. मागील चोवीस तासांत आढळा धरणाच्या परिसरात अवघ्या चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून धरणात नवीन पाणी दाखल झालेले नाही. भोजापूर धरणाची स्थितीही यापेक्षा वेगळी नसून सध्या धरणात उणे पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे म्हाळुंगी आणि आढळा या दोन्ही नद्यांच्या लाभक्षेत्रातील चिंता मात्र अजूनही कायम आहेत. पाणलोटासह मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांच्या लाभक्षेत्रातही सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला असून बहुतेक ठिकाणच्या पेरण्यांची कामेही आटोपली आहेत. त्यामुळे सध्यातरी पाणलोटासह लाभक्षेत्रात समाधान असून यंदाही भंडारदरा धरण 15 ऑगस्टपूर्वी भरण्याची परंपरा कायम राहण्याच्या आशा पुन्हा एकदा जिवंत झाल्या आहेत.
गेल्या चार दिवसांपासून धरणांच्या पाणलोटातील पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र पावसाची संततधार टिकून असल्याने धिम्यागतीने का असेना धरणातील पाणीसाठे हलते आहेत. मागील चोवीस तासांत रतनवाडीत सर्वाधिक 127 मिलीमीटर, घाटघर 106 मिलीमीटर, पांजरे 101 मिलीमीटर, भंडारदरा 97 मिलीमीटर, वाकी 81 मिलीमीटर, निळवंडे 09 मिलीमीटर, आढळा 04 मिलीमीटर, कोतुळ दोन मिलीमीटर व अकोले येथे तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळी सहा वाजता मुळा धरणात 13 हजार 475 दशलक्ष घनफूट (51.83 टक्के), भंडारदरा 7 हजार 646 दशलक्ष घनफूट (69.26 टक्के), निळवंडे 2 हजार 615 दशलक्ष घनफूट (31.40 टक्के), आढळा 497 दशलक्ष घनफूट (46.89 टक्के) व भोजापूर 52 दशलक्ष घनफूट (14.40 टक्के) इतका पाणीसाठा झाला आहे.