निकाल जाहीर होताच रंगल्या राजकीय भूमिकेच्या चर्चा! थेट वक्तव्याला फाटा; मात्र काँग्रेसने साथ न दिल्याची उघड नाराजी प्रकट..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अवघ्या राज्यातील सामान्य नागरिकांना पहिल्यांदाच पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेचे पैलू उलगडून दाखवणार्‍या नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला. अपेक्षेप्रमाणे सत्यजीत तांबे यांनी सुमारे 30 हजारांच्या फरकाने महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांना धूळ चारीत वरिष्ठ सभागृहाच्या पायरीवर पाय ठेवला. या निवडणुकीत तांबे यांनी थेट कोणत्याही राजकीय पक्षाचा पदर धरला नाही, मात्र भाजपाने त्यांना छुपी मदत केल्याचे आजही संपूर्ण मतदारसंघात बोलले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर माध्यमांनीही तांबे पिता-पुत्राकडून पुढची राजकीय दिशा समजते का? याची चाचपणी केली, मात्र त्यातूनही पुन्हा संभ्रम निर्माण झाला असून आमदार सत्यजीत तांबे काय निर्णय घेतात याबाबतची उत्कंठाही कायम आहे.

गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास नाशिक पदवीधर मतदारसंघाचा अंतिम निकाल जाहीर झाला. विविध नाट्यमय घडामोडींनंतर कोणत्याही पक्षाच्या थेट पाठिंब्याशिवाय अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सत्यजीत तांबे यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली ती पाचव्या आणि शेवटच्या फेरीपर्यंत कायम होती. तांबे यांनी पहिल्या पसंदीची एकूण 68 हजार 999 मते मिळवताना महाविकास आघाडीने पुरस्कृत केलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांचा तब्बल 29 हजार 465 मतांनी पराभव केला. पाटील यांना 39 हजार 534 मते मिळाली.

सोमवार 30 जानेवारी रोजी झालेल्या मतदानात 1 लाख 29 हजार 615 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत विजयी ठरणार्‍या उमेदवारासाठी पहिल्या पसंतीच्या 58 हजार 310 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. सत्यजीत तांबे यांनी निश्चित कोट्यापेक्षा 10 हजार 689 मते मिळवित एकूण 68 हजार 999 मते प्राप्त केली. मतमोजणीत 1 लाख 16 हजार 618 मते वैध तर 12 हजार 997 मते अवैध (बाद) ठरली. तांबे यांनी पहिल्या फेरीतच आठ हजारांची आघाडी घेतल्याने त्यांचा विजय निश्चित मानला गेला होता. त्यावर रात्री साडेनऊच्या सुमारास विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शिक्कामोर्तब केले.

निकालानंतर माध्यमांनी या मतदारसंघाचे माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांना सत्यजीत तांबे यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत विचारले असता त्यांनी थेट काहीही बोलण्याचे टाळले. मात्र सत्यजीत तांबे स्वयंनिर्णय घेण्यास सक्षम आहेत, ते अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. योग्यवेळी योग्य निर्णय घेतील असे सांगत त्यांनी यापूर्वीच राज्यावर दाटलेल्या संभ्रमाच्या ढगांमध्ये वाढही केली. त्यांच्या बोलण्यातून एकदाही काँग्रेसचा अथवा घरवापसीचा उल्लेख न झाल्याने पुन्हा राजकीय चर्चांना जागाही प्राप्त झाली. सत्यजीत तांबे आमदार झाल्याने आपण निवृत्त होणार का? या विषयावरही त्यांनी आपण राजकीय कार्यकर्ते असून काम करीतच राहणार असल्याचे सांगत राजकीय जाणकारांच्या डोक्याला चालनाही दिली.

नूतन आमदार सत्यजीत तांबेंनीही माध्यमांच्या समोर येवून काँग्रेसने मदत केली असती तर प्रवास अधिक सोपा झाला असता, दुर्दैवाने तसे न घडता क्लेशदायक अनुभव मिळाल्याचे सांगत एकप्रकारे त्यांनी काँग्रेसबाबतची मनातील सलही बोलून दाखवली. उत्तर महाराष्ट्रातील माणसं तांबे परिवाराशी मनाने जोडली गेली आहेत असे सांगतांना त्यांनी आपला विजय ‘तांबे ब्रँड’वरच झाल्याचे बिंबवण्याचा आणि आपल्या विजयाचे श्रेय अन्य कोणालाही देण्याचे टाळण्याचा प्रयत्न केला. त्यातूनही काहीसा संभ्रम निर्माण झाला असून संभ्रमाचे हे मळभ पुढील काही महिने असेच कायम राहतील असेही संकेत मिळाले आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघात डॉ. सुधीर तांबे यांचा ऋणानुबंध, शिक्षक लोकशाही आघाडीसह (टीडीएफ) अनेक शिक्षक, पदवीधर, डॉक्टर, इंजिनिअर व व्यावसायिकांच्या विविध संघटनांनी सत्यजीत तांबे यांना पाठिंबा जाहीर केला होता. याशिवाय भारतीय जनता पक्षानेही आपले पत्ते पूर्णतः उघड केले नसले तरीही त्यांच्याकडून तांबे यांना छुपी मदत झाल्याचे सर्वश्रृत असल्याने येणारा काळ नाशिक पदवीधर मतदारसंघासह जिल्ह्यात राजकीय उलथापालथ करणारा ठरेल असा अंदाज वर्तविला जात आहे.


नाशिक पदवीधर मतदारसंघात गेल्या महिन्याभरापासून घडलेल्या विविध राजकीय घडामोडी, काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीतून तांबे परिवाराच्या माध्यमातून ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना लक्ष्य करण्याचाही प्रयत्न झाला. या सर्व गोष्टींवर आपण माध्यमांशी बोलणार असून त्यासाठी शनिवारी (ता.4) आपण पत्रकार परिषद घेणार असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी जाहीर केले. माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात आमचे कुटुंबप्रमुख असल्याचा पुन्हा एकदा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.

Visits: 291 Today: 2 Total: 1111528

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *