कोठे बुद्रुक येथे अवैध दारू विक्रेत्यावर घारगाव पोलिसांची कारवाई
कोठे बुद्रुक येथे अवैध दारू विक्रेत्यावर घारगाव पोलिसांची कारवाई
बत्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त; धडाकेबाज कारवाईचे नागरिकांतून कौतुक
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील कोठे बुद्रुक येथे घारगाव पोलिसांनी अवैधरित्या देशी-विदेशी दारूची विक्री करणार्यास दुचाकी व रोख रकमेसह पकडले. सदर कारवाई शनिवारी (ता.10) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास केली आहे. पोलिसांच्या अवैध दारूविक्री विरोधातील धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कोठे बुद्रुक गावातील साहेबराव काशिनाथ वाकळे हा शनिवारी टपरीच्या आडोशाला दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवलेल्या विना परवाना व बेकायदेशीररित्या देशी-विदेशी दारूची विक्री करत असल्याची माहिती गुप्त खबर्यामार्फत घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांना समजली. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र लांघे, गणेश लोंढे, किशोर लाड, प्रमोद चव्हाण आदिंनी घटनास्थळी धाव घेत देशी-विदेशी दारूसह, दुचाकी व रोख रक्कम असा एकूण 32 हजार 554 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी पोलीस शिपाई किशोर लाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी साहेबराव वाकळे याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 377/2020 मु. प्रो. का. कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र लांघे हे करत आहे. दरम्यान, गावात चालणार्या अवैध दारू विक्री व जुगारीमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे. दारूबंदी व्हावी म्हणून काही दिवसांपूर्वीच गावातील पोपट खंडू भालके यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. या उपोषणाला महिलांनीही पाठिंबा दिला होता. त्यावेळी अवैध दारू विक्री करणार्यांवर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलिसांनी दिले होते. त्यानंतर भालके यांनी आमरण उपोषण मागे घेतले होते. तसेच पोलिसांनी अवैध दारू विक्री करणार्यांवर गुन्हाही दाखल केला होता. अखेर शनिवारी पुन्हा पोलिसांनी धडक कारवाई करत देशी-विदेशी दारूसह रोख रक्कमही जप्त केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

