पदाधिकारी-ग्रामस्थांतील संघर्ष वाढणार; येडूआई देवस्थान संघर्ष समितीची स्थापना विकासकामे करणार असल्याचा समितीचा निर्धार; तर सहकार्य न करणार्यांस इशारा

नायक वृत्तसेवा, अकोले
महाराष्ट्रातील भिल्ल समाजाचे श्रद्धास्थान असणारे पिंपळदरी (ता.अकोले) येथील देवस्थान पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यातील संघर्ष आता वाढणार असून ग्रामस्थ विश्वासात घेत नसल्याने भिल्ल समाजाने येडूआई देवस्थान संघर्ष समितीची स्थापना केली आहे.
![]()
श्री येडूआई देवस्थान पिंपळदरी येथील येडूआई गडावर आदिवासी भिल्ल कोळी समाजाची नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमच्याकडे या देवस्थानचे सर्व अधिकार असून देखील गावकरी आम्हांला टाळत आहे. आमच्या आदिवासी समाजाच्या देवाला आता गावकर्यांनी सहकार्य करावे. गावातील कोणत्याही देवस्थानमध्ये आम्ही भिल्ल कोळी समाज लक्ष देत नाही. देवस्थानची जागा ही वन विभागाची आहे तिचा विकास आजपर्यंत त्यांनी केला. परंतु आज गावकरी, काही राजकारणी लोक हे गिळंकृत करू पाहत आहे. हे आदिवासी भिल्ल कोळी समाज मान्य करणार नाही. बेकायदेशीर ट्रस्ट स्थापन करून आम्हांला वंचित ठेवणार असाल तर हे कदापिही सहन करणार नाही. आम्हांला अंधारात ठेवून आणि देवस्थनाला 5 एकर जागा मिळत असून फक्त 16 गुंठे जागा गावकरी मागत आहे हे कोणालाही मान्य नाही. विरोध करणार्याला हे लोक दमबाजी करत आहेत. यासाठी आदिवासी समाजातील काही भक्तांना एकत्र घेऊन यावर विचारविनिमय करून श्री येडूआई देवस्थान संघर्ष समितीची स्थापना एकमताने करण्यात आली.

आगामी काळात ही समिती विविध प्रकारचे विकासकामे करणार आहेत. त्यामध्ये पाणपोई, बसण्याची जागा, कचर्यासाठी डब्बे, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, भक्तांना निवास, नैवैद्य बनवण्यासाठी जागा व भांडी स्वछता, कर्मचारी, हायमॅक्स दिवे, सूचना फलक, प्रसादालय अशी कामे राबवण्यात येणार आहेत. तसेच शासनाच्या विविध प्रकारच्या आदिवासी योजनांची माहिती समाजापर्यंत पोहोचण्यासाठी देखील प्रयत्नशील राहणार आहे. महाराष्ट्रातून भाविक यात्रा काळात येतात. त्यांना कोणतीही सुविधा मिळत नाही. आमच्यापासून देवस्थानवरील ताबा आम्ही कोणालाही देणार नाही. आमच्या हक्कांना आणि श्रद्धेला जर कोणी बळकावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सहन करणार नाही असा इशारा संघर्ष समितीने दिला आहे. यावेळी बाळासाहेब बर्डे, बाळासाहेब कोंडाजी बर्डे, अशोक माळी, ज्ञानेश्वर बर्डे, विठ्ठल बर्डे, गेणू माळी, बाबुराव गांगुर्डे, लहानू पवार, प्रल्हाद विठ्ठल माळी, गंगाधर आरणे, गोविंद दिवे, दशरथ बर्डे, अमोल बर्डे, अमोल बर्डे, नामदेव माळी, किरण बर्डे व संपत बर्डे आदी उपस्थित होते.
