खोकर-भोकर शिवारातून एक लाख रुपयांच्या सोयाबीनची चोरी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल; तातडीने तपास लावण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, श्रीरामूपर
तालुक्यातील खोकर व भोकर परिसरातील शेतकर्यांच्या शेतातून काढणी झालेली सोयाबीन चोरीला जाण्याचा प्रकार सुरू झाला आहे. नुकतीच खोकर येथील एका शेतकर्याची 48 हजारांची तर भोकर येथील एका शेतकर्याच्या शेतातून 65 हजारांची काढणी झालेली सोयाबीन चोरीला गेली आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनांनी शेतकर्यांनी भीतीचे वातावरण पसरले आहे.

खोकर शिवारातील खोकरफाटा ते खोकर गावात जाणार्या रस्त्यालगत संदीप तात्यासाहेब खलाटे यांची शेती आहे. रविवार दिनांक 24 ऑक्टोबरच्या रात्री अज्ञात चारेट्यांनी त्याच्या शेतातील पत्र्याच्या शेडची जाळी व शेडचे कुलूप तोडून गोण्यांमध्ये भरून ठेवलेली 48 हजार रुपये किंमतीची सुमारे 12 ते 13 क्विंटल सोयाबीन, तीन हजार रुपये किंमतीची टेक्स्मो कंपनीची काळ्या रंगाची थ्री फेज केबल, तीन हजार रुपये किंमतीची सबमर्सिबल कंपनीची इलेक्ट्रीक मोटार असा 54 हजारांचा ऐवज घेऊन पोबारा केला आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात संदीप खलाटे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार गुरनं.339/2021 भादंवि कलम 461, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. रवींद्र पवार हे करत आहेत.

तर गेल्या आठवड्यात म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री खोकर-टाकळीभान रस्त्यापासून काही अंतरावर भोकर शिवारातील शंतनू मधुकर दंडवते यांच्या पत्र्याच्या शेडमधील गोण्यांमध्ये भरून ठेवलेली तर काही मोकळी असलेली सुमारे तेरा क्विंटल सोयाबीन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. हा प्रकार दुसर्या दिवशी त्यांचे बंधू शैलेश दंडवते हे शेतात गेल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आला. या प्रकरणी एक आठवडा उलटूनही शंतनू दंडवते यांची सोयाबीन चोरीची फिर्याद तालुका पोलिसांत दाखल नाही. दंडवते हे तालुका पोलिसांत गेल्यानंतर टाकळीभान औटपोस्टचे सहाय्यक फौजदार शरद गायमुखे व पोलीस मित्र बाबा सय्यद यांनी घटनास्थळी भेट देऊनही पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यापूर्वी सुमारे तीन महिन्यांपूर्वी दंडवते यांच्या याच पत्र्याच्या शेडमधून गहू भरलेल्या पाच गोण्या चोरीला गेलेल्या असल्याचे दंडवते यांनी सांगितले. या चोर्यांचा तातडीने तपास लावून संबंधित शेतकर्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी भाजपचे कृषी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पटारे यांनी केली आहे.
