नेवाशामध्ये विनामास्क फिरणार्यांना पोलिसांकडून गुलाबपुष्प व मास्क
नेवाशामध्ये विनामास्क फिरणार्यांना पोलिसांकडून गुलाबपुष्प व मास्क
नायक वृत्तसेवा, नेवासा
दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर अजूनही बिनधास्तपणे विना मास्क अथवा रुमाल न लावता संचार करणार्यांवर नेवासा पोलिसांनी दंडात्मक कारवाई न करता गुलाबपुष्प व मास्क देऊन समज दिली आहे. आत्तापर्यंत 1 हजार 400 जणांना याप्रकारे समज देण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक रणजीत डेरे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे औचित्य साधून पोलिसांनी ‘गांधीगिरी’ अभियान नेवासा, नेवासा फाट्यासह आदी बाजारपेठांच्या गावांत राबविले. विशेष म्हणजे गांभीर्यहीन नागरिकांवर अशाप्रकारे समज देत असल्याचे पाहून अनेकांनी मास्क बांधणे पसंत करत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील श्री खोलेश्वर गणपती, नगरपंचायत तर नेवासा फाटा येथे राजमुद्रा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या चौकांत तर तालुक्यातील कुकाणे, भानसहिवरे, भेंडे, प्रवरसंगमसह आदी गावांत बसथांबा, मुख्य चौकात विनामास्क फिरणार्या नागरिकांना तसेच दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना अडवून समज देत त्यांना मास्क लावून गुलाबपुष्प भेट देऊन सत्कार करून गांधीगिरीने प्रबोधन करण्यात आले. या अभियानात मुख्य हवालदार हेडकॉन्स्टेबल तुळ, श्रीराम गिते, महेश कचे, दिलीप कुर्हाडे, सुहास गायकवाड, बबन तमनर, वसीम इनामदार, गणेश इथापे, मोहन गायकवाड, बाळासाहेब खेडकर आदी पोलीस कर्मचारी सहभागी आहेत.

