पत्रकार परिषदेच्या चळवळ वाढीसाठी ‘सोशल मीडिया’चे योगदान ः देशमुख राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट जनसंपर्क प्रमुख’ पुरस्कार देण्याचीही केली घोषणा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मराठी पत्रकार परिषद संघटनेना नियतीने दिलेले उत्तरदायित्व निभावून आपण भरभक्कमपणे उभी केली आहे. परिषदेमुळेच आज सर्वत्र 6 जानेवारी ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा होतो. त्यानिमित्ताने आपण राबविलेल्या विविध उपक्रमातून संघटनेसोबतच परिषदेची मोठी चळवळ पाहून आज कृतकृत्य होण्याची संधी लाभली, त्यामुळेच भांडवलदारी मालकवर्गाची पोटदुखी वाढल्याने परिषदेमुळे मोठे झालेले चार चौघे व काहींची ‘मजबुरी’ असलेल्यांना हाताशी धरून भांडवलदारी मालकधार्जिण्या पत्रकार संघटना उभ्या केल्या जात आहेत. तरीही परिषद त्यांना पुरुन उरली असून याचे श्रेय सर्वस्वी ‘सोशल मीडियाचे’ आहे. पत्रकारांच्या कल्याणासाठी परिषदेची धोरणात्मक भूमिका पत्रकारांसहीत समाजासमोर पोहोचविण्याचे काम जागृतपणे प्रसिद्धी प्रमुखांनी करावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केले.

राज्यातील पदाधिकारी व जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांच्या ऑनलाइन बैठकीत मार्गदर्शन करताना त बोलत होते. या बैठकीस परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य जनसंपर्क प्रमुख अनिल महाजन आदी पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना देशमुख म्हणाले, आदर्श जिल्हा व तालुका संघ पुरस्कार सोहळा 5 मार्च रोजी चाकूर येथे होणार असून राज्यातील 354 तालुक्यांतील अधिकाधिक तालुकाध्यक्षांनी या मेळाव्यास यावे. 3 मार्च रोजी पिंप्री-चिंचवड ते चाकूर या शिक्रापूर, रांजणगाव, शिखर, पारनेर फाटा, जामखेड, पाटोदा, बीड, अंबेजोगाई, लातूर मार्गे चाकूर येथे पोहोचणार्या भव्यदिव्य एकता ज्योत रॅलीत आपल्या वाहनास परिषदेचा झेंडा, स्टिकर लावून मोठ्या संख्येने सामील होऊन गावागावात सरपंच पदाधिकार्यांशी संवाद साधत परिषदेची भूमिका समजावून सांगावी. लाईव्ह कव्हरेज करावे असे आवाहन केले.

फेब्रुवारी महिन्यात 10 व 11 तारखेस सिंधुदुर्ग जिल्ह्यात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पण समारंभासह डिजिटल मीडिया राज्य प्रमुख अनिल वाघमारे व सरचिटणीस हाजी मन्सूर शेख यांच्या पुढाकाराने फेब्रुवारी अखेर नगर येथे डिजिटल मीडियाचे नियोजित राज्यव्यापी मेळाव्यात उपस्थित राहून उपक्रमशील राहण्याचे आवाहन केले. तसेच चाकूर येथील मेळाव्यात मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस, रायगडचे झुंजार पत्रकार स्व. संतोष पवार यांच्या स्मरणार्थ राज्यातील एका प्रसिद्धी प्रमुखास ‘उत्कृष्ट जनसंपर्क प्रमुख’ पुरस्काराने गौरविण्यात येईल अशी घोषणा केली. या घोषित केलेल्या पुरस्कारामुळे राज्यातील जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अधिक जोमाने कार्यरत असल्याने चुरस दिसून येत आहे.

मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी बैठकीच्या प्रारंभी बैठकीच्या आयोजनाबाबत भूमिका विशद केली व बैठकीचे सूत्रसंचालन केले. राज्य जनसंपर्क प्रमुख अनिल महाजन यांनी आभार मानले. या बैठकीस प्रमुख पदाधिकार्यांसह कोषाध्यक्ष विजय जोशी, सरचिटणीस हाजी मन्सूर शेख, भारत निगडे (पुणे), सुभाष राऊत (नागपूर), संदीप कुलकर्णी (अहमदनगर), जमीर खलपे (रत्नागिरी), अमोल वैद्य (अहमदनगर), अमर राऊत (बुलढाणा), सुरेश नाईकवाडे (परभणी), संजय हंगे (बीड), मोहन चौकेकर (बुलढाणा), प्रशांत साळुंके (लातूर), यशवंत पोटे (भंडारा), अॅड. दिगंबर गायकवाड (नांदेड), प्रकाश इंगोले (हिंगोली), लंकेश बारांडे (गडचिरोली) आदिंसह तीस जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांनी यावेळी चर्चेत आपला सहभाग नोंदविला.
