शहराच्या बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शिवसेना सरसावली! पोलिसांना कारवाईसाठी निवेदन; वैभवशाली शहरावरील बेशिस्तीचा डाग पुसण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
बसस्थानकासह शहराच्या विविध भागात निर्माण झालेल्या थांब्यांवर मोठ्या संख्येने रिक्षा उभ्या राहतात व त्या माध्यमातून विद्यार्थी, प्रवासी, रुग्ण व वृद्ध व्यक्ती प्रवास करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून काही रिक्षाचालकांची बेशिस्ती आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेण्याच्या प्रवृत्तीमुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून अपघातांची संख्याही वाढली आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी रिक्षाथांबे आणि रिक्षातील प्रवासी संख्या यावर नियंत्रण मिळवण्यासह त्यांच्या अंतर्गत वाहतूकीला शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली असून पोलिसांनी या गंभीर प्रकारांकडे लक्ष्य देवून शहरातील बेशिस्त वाहतुकीला लगाम लावण्याची मागणी शहर शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

याबाबत शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, संगमनेर बसस्थानक व शहर परिसरातील विविध ठिकाणच्या रिक्षा थांब्यावरुन दररोज शेकडो विद्यार्थी व नागरिकांची प्रवासी वाहतूक होते. मात्र अनेक प्रसंगात प्रत्यक्ष प्रवासी वाहण्याची परवानगी असल्यापेक्षा कितीतरी अधिक प्रवासी रिक्षांमध्ये कोंबले जातात. रिक्षाचालक काही प्रवाशांना चालकाच्या सीटवरही जागा देत असल्याने त्यातून अपघातांची शक्यता निर्माण होते. अपघातांची संख्या कमी व्हावी व निष्पापांचे जीव वाचावेत यासाठी शिवसेनेने वेळोवेळी प्रशासनाला निवेदने देवून त्यांचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्या उपरांतही अपघात थांबत नसल्याने याबाबत गांभीर्याने विचार करण्याची वेळ येवून ठेपल्याचे या निवदेनातून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा तसेच शहराच्या अंतर्गत वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पोलिसांना निवेदन देण्यात आले असून यातून कोणत्याही रिक्षाचालकाचा रोजगार जावा अशी भावना नसल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. उलटपक्षी शिवसेनाप्रणित रिक्षासेनेच्या माध्यमातून आम्ही सातत्याने रिक्षाचालकांसाठी विविध उपक्रम राबविले असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक रिक्षाचालकांचा अपघाती विमाही उतरविण्यात आला आहे.

जिल्ह्यात वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहरातील वाहतूकही आदर्श व अपघातमुक्त असावी हा एकमेव हेतू असल्याचे या निवेदनातून सांगण्यात आले असून त्यावर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे, शहरप्रमुख अमर कतारी, उपशहर प्रमुख इम्तियाज शेख, विकास डमाळे, दीपक वनम, वेणुगोपाल लाहोटी, फैसल सय्यद, रवी गिरी, सचिन साळवे, युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवासेना शहरप्रमुख अमोल डुकरे, राजेंद्र सातपुते, शरद कवडे, अक्षय बिल्लाडे, विजू भागवत, पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक सातपुते, संदीप राहणे, वैभव अभंग, संभव लोढा, शहर सचिव प्रथमेश बेल्हेकर, दीपक साळुंखे, नारायण पवार, केवल कतारी, गोविंद नागरे, संकेत घोडेकर, शहर समन्वयक आसिफ तांबोळी, संजय फड, अजीज मोमीन, भाऊ चव्हाण, उप तालुकाप्रमुख सोमनाथ काळे, कांचन गायकवाड, त्रिलोक कतारी, प्रशांत खजुरे, उप तालुकाप्रमुख अमित फटांगरे, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख शीतल हासे, उपजिल्हाप्रमुख मंगल घोडके, सुरेखा गुंजाळ व आशा केदारी यांच्या सह्या आहेत.

संगमनेर बसस्थानक व शहरातील रहदारीच्या रस्त्यांवरील विविध चौकांमध्ये रिक्षांचे अनेक थांबे आहेत. त्या माध्यमातून दररोज शेकडो विद्यार्थी व प्रवासी ऐच्छिकस्थळी जात असतात. मात्र गेल्याकाही कालावधीत प्रवाशी रिक्षांच्या अपघातात मोठी वाढ होवून निष्पापांचे बळी जावू लागल्याने हा विषय गंभीर झाला आहे. रिक्षा चालवून प्रपंच चालविणार्यांची मोठी संख्या आहे. त्यामुळे आमचे आंदोलन रिक्षा चालकांच्या विरोधात नसून शहरात बेशिस्तपणे होणार्या वाहतुकीला विरोध करण्यासाठी आणि पर्यायाने त्यातून होणारे अपघात रोखण्यासाठी आहे. पोलिसांनी वैभवशाली शहराला लागलेला बेशिस्त वाहतुकीचा डाग पुसण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी अशी आमची आग्रही मागणी आहे.
– अमर कतारी (शहरप्रमुख-शिवसेना)
