मूठभर ध्येयवेड्या माणसांच्या शहाणपणावर समाज टिकून ः आवटे शांती फौंडेशनच्यावतीने समाज गौरव पुरस्काराचे वितरण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
समाजातील मूठभर ध्येयवेड्या लोकांच्या शहानपणावर समाजातील चांगुलपणा टिकून आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व पत्रकार संजय आवटे यांनी केले. ते संगमनेर येथील शांती फौंडेशनच्यावतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषद सदस्य आमदार डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर श्रमिक दलाचे संस्थापक भारत पाटणकर, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. विशाल मुटकुळे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अॅड. रंजना गवांदे उपस्थित होत्या.

आवटे आपल्या भाषणात म्हणाले, समाजात चांगुलपणा आहे हे शिकण्याची गरज आहे. अंधाराचे मार्केटिंग फार काळ चालत नाहीत. एक पणतीचे अस्तित्वही त्याला नष्ट करते. सकारात्मतेचा जागर हा आनंदाचा मार्ग आहे. आपण प्रतिक्रियावादी होण्यापेक्षा परिवर्तनवादी होण्याची गरज आहे. वर्तमानात कृतिशीलतेची अधिक गरज आहे. सारे संपले तरी स्वप्न संपत नाहीत आणि अजून तरी स्वप्नावर कर लावलेले नाही. त्यामुळे स्वप्न पाहायला हवे. दोन पिढ्यांमधील संवादाचे अंतर कमी करण्याची गरज आहे. नव्या पिढीला नवे आयकॉन हवे आहेत. समाजात प्रत्येकाने विचार करण्याची नितांत आवश्यकता असून विचारात व्यवस्था बदलण्याची शक्ती सामावली आहे. वर्तमानात विचाराचे भय वाटू लागले आहे. आपण संत नव्या तरुणांपर्यंत पोहोचवले नाहीत त्यामुळे संत त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत. महापुरुष हे कोणत्याही जातीचे नव्हते, त्यांचा वारसा मोठा आहे पण विचाराचा आरसा पाहण्याची गरज निर्माण झाल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

भारत पाटणकर म्हणाले, ज्ञान हे भांडवल आहे. विज्ञान हेही भांडवल ठरू पाहत आहे. विचारच जनतेला मुक्त करू पाहणारी व्यवस्था आहे. संतांनी समतेचा विचार दिला. शब्दांची ताकद मोठी असून शब्दासमोर माणसं नतमस्तक होतात. आज माणसाने काय करावे व काय करू नये हे दुसरे कोणी तरी ठरवत आहेत. शिकलेली माणसं अडाणी वाटू लागली आहेत. त्यामुळे समाजाला शहाणपण देणारी माणसं उभी करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. अध्यक्षीय भाषणात डॉ. सुधीर तांबे म्हणाले, आपण अधिक संवेदनशील होण्याची आवश्यकता आहे. वर्तमान भीतीदायक आहे. लोकशाही समोर नवे आव्हान उभे आहे. परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे. त्यामुळे संघर्ष करावा लागणार आहे. त्यासाठी संघटित होण्याची गरज असून एका दिलाने काम केले तरच लोकशाही समोरची आव्हाने संपुष्टात येतील. प्रास्ताविक नाट्य लेखक डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी केले. सूत्रसंचालन संदीप वाकचौरे यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर वर्पे यांनी मांनले. प्राचार्य सुरेश परदेशी यांनी पसायदान गाऊन कार्यक्रमाचा समारोप केला. कार्यक्रमास सूर्यकांत शिंदे, सूर्यभान वर्पे, सुखदेव वर्पे, विलास वर्पे, दत्तात्रय वर्पे, भारत वर्पे, बाळासाहेब राऊत, बाळासाहेब घुले, वसंत बंदावणे, प्राचार्य गवांदे, संतोष खेडलेकर, दगडू लांडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शांती फौंडेशनच्यावतीने समाज गौरव पुरस्काराने राजाभाऊ अवसक, साहित्य गौरव पुरस्काराने प्रा. मा. रा. लामखडे, नाट्य गौरव पुरस्काराने दिनेश भाणे यांना सन्मानित करण्यात आले. विशेष सत्कार आयर्न मॅन डॉ. संजय विखे, ज्येष्ठ चित्रकार डी. बी. राठी, सहायक अभियंता कल्याणी अहिरे, आंतरराष्ट्रीय सायकलपटू प्रणिती सोमन, स्मित घुले, समृद्धी मुटकुळे, श्रृती कडलग, सरपंच गायत्री माळी, उपसरपंच सी. के. मुटकुळे यांचा सन्मान करण्यात आला.
