विविध मागण्यांसाठी राजूर प्रकल्प कार्यालयावर विद्यार्थ्यांचा मोर्चा वसतिगृहातील प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची यादी तत्काळ जाहीर


नायक वृत्तसेवा, अकोले
शासकीय वसतिगृहातील समस्या व इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध विद्यार्थी संघटनांनी सोमवारी (ता. 9) राज्यभर मोर्चा काढला होता. राजूर प्रकल्प कार्यालयावरही हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करीत विविध मागण्यांचे निवेदन प्रकल्प अधिकारी राजन पाटील यांना दिला.

सदर निवेदनात म्हटले आहे की, शासकीय आदिवासी वसतिगृह प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता प्रवेश देऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहांच्या इमारतींचे बांधकाम करावे, भविष्याचा विचार करता लोणी, श्रीरामपूर, नगर, पारनेर वसतिगृहातील विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढवावी अशा विविध मागण्या करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज भरलेल्या आणि प्रवेशापासून वंचित राहिलेल्या 48 विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची यादी तत्काळ जाहीर करण्यात आली. राजुर व अकोले येथे वसतिगृह प्रवेश क्षमता वाढविण्याचा प्रस्ताव तत्काळ पाठविला, संगमनेर येथे मुलांचे व मुलींचे प्रत्येकी 100 क्षमतेचे वसतिगृह सुरू करण्याचा प्रस्तावही पाठविला, प्रवरानगर येथे मुलींचे नवीन वसतिगृह सुरू करण्याचा प्रस्तावही पाठविला, घारगाव व प्रवरानगर येथे आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह इमारत बांधकाम प्रस्ताव शासनास सादर करण्यात आल्याचे प्रकल्प अधिकारी पाटील यांनी सांगितले.

तसेच शासकीय आदिवासी वसतिगृह आणि आश्रमशाळांसाठी स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी व मानसोपचार तज्ज्ञांची नियुक्ती करण्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी विद्रोही विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुमार भिंगारे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे सचिव डॉ. जालिंदर घिगे, राज्य सहसचिव स्वप्नील धांडे, प्रवीण कोंडार, कविता धांडे, अमोल सोनवणे, किशोर देशमुख, योगेश बारे, पंकज खर्डे यांसह वसतिगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 135 Today: 1 Total: 1111950

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *