चाकूचा धाक दाखवत तरुणाला लुटले!

नायक वृत्तसेवा, अहिल्यानगर 
शहरातील कायनेटिक चौक परिसरात दोन अनोळखी इसमांनी पहाटे एकच्या सुमारास चाकूचा धाक दाखवून एका युवकाकडून मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण १२ हजार रूपयांचा ऐवज चोरुन नेला. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 
हसनेन मोहम्मदपजीर शेख (वय २३, रा. कायनेटिक चौक, अहिल्यानगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तो त्याचे मित्र मोहम्मद समीर व मोहम्मद इम्रान हे तिघे स्वप्निल साई सुर्या हॉटेल येथे वेटर म्हणून काम करतात. मंगळवार दि. ७ ऑक्टोबर रोजी पहाटे १ वाजता हॉटेलमधील काम आटोपून तिघेजण रूमकडे परतत असताना रणजित हॉटेलजवळ दोन अनोळखी इसम दुचाकीवर आले. त्यांनी दुचाकी आडवी लावून खिशातील मोबाईल व पैसे बाहेर काढा असा दम दिला. फिर्यादी व त्याच्या मित्रांनी नकार दिल्यावर हे दोघे इसम काही अंतरावर जाऊन पुन्हा परत आले. त्यातील मागे बसलेल्या इसमाने चाकू दाखवत फिर्यादीवर झडप घातली व मारहाण करून जबरदस्तीने त्याच्या खिशातील दोन हजार रूपये व मोबाईल असा एकूण १२ हजार रूपयांचा ऐवज हिसकावून पळून गेले. घटनेनंतर फिर्यादीचे मित्र घाबरून गेले व तत्काळ दुसऱ्या मित्राला संपर्क साधून घटनास्थळी बोलावून घेतले. या घटनेबाबत फिर्यादी हसनेन शेख याने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान  घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना देण्यात आल्यावर पोलिसांच्या रात्रगस्त पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपींचा शोध सुरु केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही लुटमार करणारे महेश अशोक ठोंबरे (वय २२, रा. आव्हाड वीटभट्टी जवळ, कायनेटिक चौक) तसेच यश सुभाष साठे (वय ३०, रा. भिंगारदिवे मळा, बालिकाश्रम रोड) या दोघांना पहाटेच्या  सुमारास पकडण्यात आले.
Visits: 78 Today: 3 Total: 1108915

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *