सध्या जिल्ह्यात दहशतीचे राजकारण रुजविण्याचा प्रयत्न : आ. थोरात! फोनवरुन महाआक्रोश मोर्चाला मार्गदर्शन; मंत्री विखेंचे नाव न घेता जोरदार टीका..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
आपण राज्याच्या महसूल मंत्रीपदावर प्रदीर्घ काळ काम केले आहे. मात्र कधीही कोणावर अन्याय होईल, कोणाचे वाईट होईल असे चुकीचे निर्णय घेतले नाहीत. संगमनेर तालुक्याची संस्कृतीही तशीच राहिली आहे. मात्र काही लोकं दहशतीचे राजकारण करुन आपलं वाईट करायला निघाले असून आपल्या सर्वांना या अन्यायाचा संघटितपणे विरोध करावा लागणार आहे. हा अन्याय आम्ही कोणत्याही स्थितीत सहन करणार नाही असं त्यांना ठणकावून सांगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी महसूल मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

महसूल विभागाने राज्यातील गौण खनिज उत्खणनाच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्राशी निगडीत असलेल्या लाखो लोकांवर उपासमारीची वेळ आणल्याचा आरोप करीत या क्षेत्रातील शेकडो व्यावसायिकांनी आज संगमनेर शहरात महाआक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रस्त्यावरील मालपाणी लॉन्स येथून आज मोर्चा काढण्यात आला. नवीन नगर रस्त्यावरील प्रशासकीय भवनासमोर या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. बांधकाम क्षेत्रातील विविध घटकांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर माज ीमंत्री थोरात यांनी फोनवरुन संपर्क साधतांना या सभेच्या निमित्ताने आपले मत व्यक्त केले.

यावेळी पुढे बोलताना थोरात म्हणाले की, गवंडी, त्याच्या हाताखालील मजूर, रस्त्याची कामे करणारे कामगार यांचा विचार केला तर शासनाच्या गौण खनिजाबाबतच्या निर्णयाने या सर्वांच्या रोजीरोटीचा आणि भाकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील काही मंडळींचे राजकारण हे दहशतीवरच अवलंबून असल्याचे सांगत त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीकाही केली. दहशतीच्या राजकारणाची हीच पद्धत आता जिल्ह्यात रुजविण्याचा खटाटोप सुरु असून अशा प्रकारांना अहमदनगर जिल्हा कधीही सहन करणार नसल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

राज्याच्या महसूल विभागाने घेतलेल्या या निर्णयाने आज हजारो, लाखो गोरगरीबांवर उपासमारीची वेळ आली असून या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आपल्या सर्वांना संघटित व्हावे लागेल आणि सरकारला ठिकाणावर आणावे लागेल असे ते म्हणाले. जिल्ह्यात जेथे-जेथे अशा प्रकारच्या दहशतीचे राजकारण सुरु आहेते आपण संघटितपणे मोडल्याशिवाय राहणार नसल्याचा एल्गारही त्यांनी पुकारला. यासाठी आपण सर्वांनी मिळून या अन्यायाविरोधात लढा दिल्यास विजय आपलाच होईल असा विश्वासही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

याप्रसंगी अ‍ॅड. अरविंद पवार यांनी राज्य सरकारचा तीव्र निषेध करत महसूल विभागाच्या जुलमी कारभाराविरुद्ध ताशेरे ओढले. तर किसन पानसरे, अजिंक्य वर्पे, सुभाष दिघे, व्यंकटेश देशमुख, दीपाली वर्पे, अनुपमा शिंदे, नीलेश कडलग, योगेश पवार, प्रा. बाबा खरात, मोहनराव करंजकर, प्रदीप हासे, रामहरी कातोरे, के. के. थोरात, नरेंद्र पवार, बी. आर. चकोर यांनीही महसूल व सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध केला. यावेळी इंजिनिअर असोसिएशनच्यावतीने झालेल्या मोर्चाचे निवेदन नायब तहसीलदार लोमटे, तळेकर, पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी स्वीकारले.


सदरचा मोर्चा प्रशासकीय भवनात पोहोचल्यानंतर मंचाच्या समोरच वाळू वाहतूक करणारी सुमारे अर्धा डझन गाढवं आणून उभी करण्यात आली होती. त्यातून गाढवांचा वापर करुन वाळू वाहतूक करणार्‍यांसह या मुक्या जीवांच्या चारा-पाण्याचाही प्रश्न बिकट झाल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न मोर्चाच्या आयोजकांनी केला. सुरुवातीला सदरची गाढवं गर्दीत शिरली की काय असा समज झाल्याने काहीसा गोंधळ उडाला होता, मात्र सदरील गाढवंही या मोर्चाचाच भाग असल्याचे समोर आल्यानंतर उपस्थित शेकडो नागरिक शांत झाले.

Visits: 203 Today: 6 Total: 1101979

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *