राहुरी तालुक्यात कांदा लागवडीसाठी उडाली धांदल शेतकर्यांवर मजूर शोधण्याची आली दुर्दैवी वेळ
नायक वृत्तसेवा, राहुरी
ऊस दराअभावी उदासीन झालेला शेतकरी सध्या कांदा पिकाकडे वळला आहे. कांदा लागवडीमुळे मजुरांची चांगलीच चांदी झाली आहे. सध्या सर्वत्र कांदा लागवडीची धांदल उडाली असून एकाचवेळी टाकलेली कांदा रोपे लागवडीसाठी आल्याने मोठ्या प्रमाणात मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी मजूर मिळेल का? मजूर, अशी राहुरी तालुक्यातील शेतकर्यांची अवस्था झाली आहे.
ऑगष्ट-सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये जवळपास सर्वच शेतकर्यांनी कांद्याची रोपे टाकली. ही रोपे डिसेंबर, जानेवारीमध्ये लागवडीसाठी तयार झाली आणि सर्वत्र कांदा लागवडीची एकच झुंबड उडाली. कांदा लागवडीसाठी महिला मजूर मिळत नसल्याने तसेच पंधरा-पंधरा दिवस त्यांची वाट पाहावी लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. मजूर मिळाले तरी त्यांना ये-जा करण्याची व्यवस्था करावी लागत आहे. यासाठी रोज पाचशे ते हजार रुपये मोजावे लागत आहेत. कांदा लागवडीसाठी मजुरीचे वेगवेगळे दर आहेत. सरी पध्दत, वाफा पध्दत, बेड पध्दत अशा लागवडीसाठी वेगवेगळे मजुरीचे दर आहेत. त्यात जाण्या-येण्याचा खर्च वेगळा. हेच दर पुढे कांदा काढणीसाठी असतात. यामुळे यंदा अनेक शेतकर्यांनी कांदा पेरणी करून केला आहे. त्यांचा कांदा देखील चांगला असल्याने पुढील वर्षी कांद्यांचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. लागवडीनंतरही पुढे फवारणी, खते व खुरपणी काढणी या सर्वांचा हिशोब केला तर हा खर्च एकरी 70 ते 80 हजाराच्या पुढे जात आहे.
भाव जर चांगला मिळाला तर पाच महिन्याच्या या पिकात ऊसा पेक्षा जास्त पैसे मिळतात. शिवाय कांदा निघाल्यानंतर पुढे सोयाबीन किंवा कपाशी ही पिके देखील घेता येतात. म्हणून या पिकावर जादा खर्च करण्याचे शेतकरी धाडस करत आहे. मागील वर्षी कांद्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकर्यांनी यंदा कांदा साठवून ठेवला. परंतु महिना-दीड महिन्याचा कालावधी सोडता यंदा कांदा बाराशे ते पंधराशेच्या पुढे गेला नाही. तरी यावर्षी देखील कांद्याची विक्रमी लागवड राहुरी तालुक्यात झाली आहे. संक्रांतीपर्यंत कांदा लागवडीची ही धांदल अशीच सुरु राहणार आहे.
साधारणपणे दहा मजूर महिला एक एकर कांदा लागवड करतात. कांदा लागवडीचा भाव पाहता त्यांना हजार ते अकराशे रुपये रोजंदारी पडते. शिवाय जाण्या-येण्याची मोफत सोय होत आहे. अशीच परिस्थिती कांदा काढणी वेळी होते. त्यामुळे कांदा लागवडीने मजुरांची चांदी झाली आहे.