… पण लोकांनी खासदार असदुद्दीन ओवेसींना ओळखलंच नाही! औरंगाबादहून नाशिकला जाताना चांदेकसारेतील मशिदीत केले नमाज पठण


नायक वृत्तसेवा, कोपरगाव
औरंगाबादहून नाशिककडे निघालेले एमआयएमचे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवेसी अचानक कोपरगाव तालुक्यातील एका वस्तीवरील मशिदीमध्ये मगरिबची नमाज पठणासाठी थांबले. पण तेथील लोकांनी असदुद्दीन ओवेसी यांना ओळखलंच नाही. ‘आपको कही देखा है’ म्हणत सुरुवातीला स्थानिकांनी त्यांना ओळखलं नाही. मात्र हे ‘ओवेसी साहब’ असल्याचं समजल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी एमआयएम पक्षाच्या माध्यमातून देशाच्या राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते उत्कृष्ट संसदपटू म्हणून देखील ओळखले जातात. राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवरील चर्चा सत्रांमध्ये सडेतोड भूमिका मांडणार्‍या खासदार ओवेसींनी एमआयएम या पक्षाचा देशभरात, विशेषतः मुस्लिम समाजात विस्तार करण्यात बर्‍याच अंशी यश मिळवलं आहे. पक्षाच्या कामानिमित्त ते देशभर दौरे करत असतात. बुधवारी औरंगाबादहून नाशिकच्या दिशेने जात असताना सायंकाळच्या नमाजची वेळ झाल्याने ओवेसी यांची गाडी कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील एका छोट्याशा वस्तीवरील मशिदीसमोर थांबली. यावेळी त्यांच्या सोबत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील देखील होते. दोघेही अनपेक्षितपणे त्या मशिदीमध्ये नमाज पठणासाठी पोहचले असता तेथे उपस्थित मुस्लिम समाजातील लोकांनी त्यांना ओळखलेच नाही.

नमाज संपल्यावर सर्वजण कुतूहलाने दोघांकडे बघत असताना काही लोक त्यांच्या जवळ आले आणि ‘आपको कही देखा है’ म्हणत विचारपूस करू लागले. मात्र काहींना हे ‘ओवेसी साहब’ असल्याचे समजताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. खासदार असदुद्दीन ओवेसी स्वतः आपल्या छोट्याशा वस्तीवरील मशिदीमध्ये आल्याने स्थानिक लोक भारावून गेले. लगेचच धावपळ करत शॉल आणली आणि खासदार ओवेसी आणि खासदार जलील यांचा सत्कार केला. तर त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *