महाराष्ट्राने तिसरी राष्ट्रीय योगासन स्पर्धा जिंकली! एकोणावीस सुवर्णपदकांसह सत्तावीस पदके; पश्चिम बंगालचा संघ उपविजेता
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या चार दिवसांपासून संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये सुरु असलेल्या तिसर्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेचा शनिवारी समारोप झाला. दोन स्वतंत्र वयोगट आणि योगासनांच्या पाच प्रकारांमध्ये झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने सर्वोत्तम कामगिरी करतांना 19 सुवर्ण पदकांसह 27 पदके पटकावित अजिंक्यपदाचा किताबही मिळवला. 29 राज्यातून आलेल्या सुमारे आठशे योगासनपटूंचा समावेश असलेल्या या स्पर्धेचे उपविजेतेपद पाच रौप्य व सहा कांस्यपदके मिळवणार्या पश्चिम बंगाल संघाने तर तिसरे स्थान एका सुवर्णपदकासह चार पदके मिळवणार्या तामिळनाडू संघाने मिळवले. या स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करणार्या खेळाडूंना खेलो इंडिया आणि एशियन गेम्स स्पर्धेत सहभागी होण्याची संधीही यानिमित्ताने प्राप्त झाली आहे.
गेल्या मंगळवारपासून (ता.27) येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या क्रीडा संकुलात सुरु असलेल्या तिसर्या राष्ट्रीय योगासन अजिंक्यपद स्पर्धेचा शनिवारी (ता.31) पारितोषिक वितरण समारंभाने समारोप झाला. याप्रसंगी राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे अध्यक्ष उदित सेठ, उपाध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, सेक्रेटरी जनरल डॉ. जयदीप आर्य, महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष बापू पाडळकर, तांत्रिक समितीचे संचालक रचित कौशिक व स्पर्धा व्यवस्थापक डॉ. निरंजन मूर्ती आदी उपस्थित होते.
या स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून योगासनांच्या वेगवेगळ्या पाच प्रकारांमध्ये सादरीकरण करताना महाराष्ट्राच्या संघाने एकेरी, दुहेरी व सांघीक प्रकारातही वर्चस्व निर्माण केले होते. या संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्र संघाने तब्बल 19 सुवर्णपदकांसह सात रौप्य व एका कांस्यपदकाची कमाई करीत या स्पर्धेचे अजिंक्यपदही पटकाविले. उपविजेतेपद प्राप्त करणार्या पश्चिम बंगालच्या स्पर्धकांनीही सरस कामगिरी करताना पाच रौप्य व सहा कांस्यपदकांसह एकूण 11 पदके पटकाविली तर, तिसर्या स्थानावर राहिलेल्या तामिळनाडू संघाने एका सुवर्णपदकासह दोन रौप्य व एक कांस्यपदक मिळवले.
यावेळी बोलताना फेडरेशनचे अध्यक्ष उदित सेठ यांनी अतिशय नेटक्या आणि भव्य-दिव्य स्वरुपात आयोजित झालेल्या या स्पर्धेचे भरभरुन कौतुक केले. डॉ. जयदीप आर्य यांनी देशातील काही विद्यापीठांनी योगाचा आपल्या अभ्यासक्रमात समावेश केल्याचे सांगितले. राष्ट्रीय योगासन फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी या स्पर्धेचा उल्लेख योगासनांचा महाकुंभ असा करताना या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा म्हणजे देशभरातील शेकडो स्पर्धकांनी प्रज्ज्वलित केलेल्या योगयज्ञाचा पूर्णाहुती सोहळाच असल्याचे सांगितले. महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष बापू पाडळकर यांनी या स्पर्धेतील अनुभव योगासनपटूंना आयुष्यभर दिशा दाखविणारे ठरतील असे सांगितले. यावेळी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या व बृहन्महाराष्ट्र योग परिषदेच्या माध्यमातून चार दशके योगसेवा करणार्या सतीश मोहगावकर यांना सर्वोत्कृष्ट पंच म्हणून तर हरिद्वारच्या पतंजली योगपीठाच्या दादा उदयवीर, महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक मंगेश खोपकर, पश्चिम बंगालच्या प्रशिक्षक सपना पाल, तामिळनाडूचे प्रशिक्षक टी. यूवराज यांचा राष्ट्रीय पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.