कोल्हारच्या पुलावर वाहतूक कोंडी बनली नित्याची कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची मागणी

नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील कोल्हारच्या पुलाची बारमाही समस्या म्हणजे वाहतूक खोळंबा. मात्र अद्याप यावर तोडगा काही निघालेला नाही. परिणामी प्रवाशांची आणि ग्रामस्थांची डोकेदुखी काही संपत नसल्याची चिन्हे आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी यानिमित्ताने जोर धरु लागली आहे.

कधी पुलावरील खड्डे वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरतात तर कधी ऊस वाहतुकीची साधने. कधी सुट्ट्यांमुळे शनि शिंगणापूरला येणार्या भाविकांची वाढलेली गर्दी कारणीभूत ठरते तर कधी वाहनचालकांचा बेशिस्तपणा कारणीभूत ठरत आहे. कारणे कोणतीही असोत समस्या मात्र वाहतुकीचा खेळखंडोबा आणि तो देखील नित्याचा. या रोजच्या वाहतूक कोंडीला ग्रामस्थ पुरते वैतागले आहेत. यामुळे महामार्गावरील प्रवाशांचीच नव्हे तर स्थानिकांची देखील घुसमट होत आहे.

कोल्हार बुद्रुक, भगवतीपूर आणि कोल्हार खुर्द या तीन गावांशी निगडीत असलेला हा प्रवरा नदीपत्रावरील पूल. उत्तर आणि दक्षिणेकडील असंख्य तालुक्यांना, जिल्ह्यांना आणि राज्यांना जोडणारा हा महत्वाचा दुवा आहे. नगर-मनमाड महामार्गावर असल्याकारणाने वाहनांची वर्दळ प्रचंड असते. शिर्डी, शनि शिंगणापूर या दोन आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्रांचा मध्यवर्ती पूल आहे. या अनेक अर्थांनी या पुलाचे महत्व अनन्यसाधारण ठरते. परंतु त्याच्या नशिबी कायम वाहतूक कोंडी ठरलेली. ही समस्या आता येथील रहिवाशांच्या अंगवळणी पडू लागल्यागत झाले आहे.

पुलावरील खड्ड्यांची सध्या तत्पुरची डागडुजी झाली. त्यामुळे थोडे ठीक नाहीतर पुलावरील खड्ड्यांमुळे वाहनांमध्ये बिघाड होणे, अॅक्सल तुटणे, पाटे तुटणे, चाक निखळणे, पंक्चर होणे हे प्रकार नित्याचेच घडतात. या कारणास्तव पुन्हा पुन्हा वाहतूक कोंडी होते. आणि एकदा का वाहतूक कोंडी झाली की मग ती पुन्हा सुरळीत होता होता नाकीनऊ येते. यात वेळ खर्ची पडतो तो भाग वेगळाच. अगदी काही मिनिटांकरिता जरी या पुलावर वाहतूक खोळंबली तरी देखील अल्पावधीतच वाहनांच्या दूर अंतरापर्यंत रांगा लागतात. त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरु लागली आहे.
