लोणीमध्ये शेतकरी संघटनेचे राख रांगोळी आंदोलन

लोणीमध्ये शेतकरी संघटनेचे राख रांगोळी आंदोलन
केंद्र सरकारकडे कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याची मागणी
नायक वृत्तसेवा, राहाता
केंद्र सरकारने कांद्यावर लागू केलेली निर्यातबंदी उठवावी, यासाठी शेतकरी संघटनेने राहाता तालुक्यातील लोणी या खासदार डॉ.सुजय विखे यांच्या गावात नुकतेच राख रांगोळी आंदोलन केले.


कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी शेतकर्‍यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी लोकसभेत आवाज उठवावा, कांदा उत्पादक शेतकर्‍यांवरील अन्याय दूर करावा, यासाठी राज्यभर खासदारांच्या दारात निर्यातबंदी आदेशाची जाळून राख करणे, कांद्याची रांगोळी काढण्याचे आंदोलन शेतकरी संघटनेने करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे आंदोलक खासदार विखे यांच्या घराकडे जात असताना पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. त्यामुळे आंदोलकांनी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतुळ्यासमोर राख रांगोळी आंदोलन केले.


शेतकर्‍यांनी निवडून देलेले खासदार जर शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी लोकसभेत आवाज उठवणार नसतील, तर शेतकरी त्यांना पुन्हा निवडून देणार नाहीत. जो पक्ष कांद्याचे भाव पाडण्याचा प्रयत्न करेल व जो पक्ष कांद्याचे भाव कमी करण्याची मागणी करेल, अशा पक्षांना शेतकर्‍यांनी यापुढे मतदान करू नये, असे आवाहन घनवट यांनी यावेळी केले. कांद्याचे भाव पाडण्यासठी निर्यातबंदी व कांद्याची आयात करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा शेतकरी संघटनेने निषेध केला. या आंदोलनात उत्तर नगरचे संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब आढाव, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम शेळके, अनिल भुजबळ, महादू खामकर, मधुकर शिंदे, नानासाहेब जाधव, नीलेश शेडगे, जितेंद्र शहा, अंबादास चव्हाण, बन्सी इंगळे, दत्ता वाळुंज, दत्तात्रय जाधव आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Visits: 14 Today: 1 Total: 115295

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *