संगमनेरच्या विकासकामांना परमेश्वराची साथ ः थोरात राजहंस दूध संघात मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गोरगरीब माणसांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी संगमनेर तालुक्याच्या सर्व सहकारी संस्थांच्या माध्यमातून सातत्याने काम होत आहे. या चांगल्या कामाला ईश्वराचे कायम आशीर्वाद असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे वरीष्ठ नेते, माजी महसूल मंत्री तथा आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर तालुका सहकारी दूध संघाच्या प्रांगणात म्हसोबा महाराज व माऊली मूर्ती प्राणप्रतिष्ठा व मंदिराच्या लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, वरवंडीचे दत्तगिरी महाराज, महानंदचे व राजहंसचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, शरयू देशमुख, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, इंद्रजीत थोरात, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, रामहरी कातोरे, दूध संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र चकोर, संचालक लक्ष्मण कुटे, आर. बी. रहाणे, विलास वर्पे, भास्कर सिनारे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबन कुर्‍हाडे, बादशहा वाळुंज, संजय पोकळे, विक्रम थोरात, विष्णू ढोले, तुकाराम दातीर, रवींद्र रोहोम, प्रतिभा जोंधळे, मंदा नवले, कार्यकारी संचालक डॉ. सुजीत खिलारी, अजय फटांगरे, सुभाष सांगळे, पांडुरंग सागर आदी उपस्थित होते.


संगमनेर तालुका हा सहकारातून समृद्धीकडे वाटचाल करत आहे. तालुक्यातील सर्व शिखर संस्था या गोरगरीब माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम करत आहे. या सर्व चांगल्या कामाला परमेश्वराचा सदैव आशीर्वाद लाभला आहे. संगमनेर तालुका दूध संघ हा गायीच्या दुधामध्ये राज्यात एक नंबरचा दूध संघ आहे. तालुक्यात सध्या सुमारे सात लाख लिटर दूध उत्पादन होत असून तालुक्याची ओळख आता दुधाचा तालुका म्हणून झाली आहे. गुणवत्ता हे या संघाचे वैशिष्ट्य राहिले आहे. महाराष्ट्र बाहेरही राजहंस दूध संघाला मोठी मागणी असून या प्रांगणात होत असलेल्या सुंदर मंदिरामुळे परिसराच्या वैभवात भर पडणार असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक कार्यकारी संचालक डॉ. सुजीत खिलारी यांनी केले. सूत्रसंचालन अ‍ॅड. सुरेश जोंधळे यांनी केले तर उपाध्यक्ष राजेंद्र चकोर यांनी आभार मानले.

Visits: 9 Today: 1 Total: 116687

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *