घुलेवाडीतील ‘अ‍ॅब्रोसिया’ वसाहतीत चोरट्यांचा धुमाकूळ! पासष्ट हजारांचा मुद्देमाल लांबविला; घुलेवाडीसह अनेक भागात नागरिकांचा जागता पहारा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील आठवड्यात सुकेवाडी परिसरात एकाचवेळी चार घरांवर पडलेल्या दरोड्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा चोरटे सक्रीय झाले आहेत. सोमवारी पहाटे चोरट्यांच्या अशाच एका टोळीने घुलेवाडी शिवारातील खाबीया अ‍ॅब्रोसिया या पॉश निवासी संकुलात एकाचवेळी काही घरांमध्ये चोरीचा प्रयत्न केला. यातील एका बंद असलेल्या सदनिकेमधून चोरट्यांनी 65 हजारांचा मुद्देमालही लांबविला. सुकेवाडीतील दरोड्यानंतर शहराच्या उपनगरीय भागासह आसपासच्या ग्रामीण भागात चोरटे दृष्टीस पडल्याने सद्यस्थितीत अनेक ठिकाणी नागरिक जागता पहारा देत आहेत. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास अ‍ॅब्रोसिया वसाहतीतही चोर आल्याच्या संशयाने तेथील रहिवाशांनी हातात काठ्या-लाठ्या घेत आसपासचा परिसर पिंजून काढल्याचा एक व्हिडिओही सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. याशिवाय शहरातील अन्य चोरीच्या घटनांमध्येही सातत्याने वाढ होत असून सोमवारी एटीएमची अदलाबदल करण्यासह दिवाणी न्यायालयाच्या अधीक्षकांचे पाकीट लांबविण्याचीही घटना समोर आली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार घुलेवाडी शिवारातील मालपाणी नगरच्या जवळच असलेल्या खाबीया अ‍ॅब्रोसिया या निवासी संकुलात रविवारी (ता.25) सकाळी 11 ते सोमवारी (ता.26) पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान घरफोडीची घटना घडली. या घटनेत संकुलात राहणार्‍या देवा मोहन भगत यांच्या राहत्या सदनिकेचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी घरात कोणीही नसल्याने त्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी संपूर्ण घराची उचकापाचक करुन कपाटात ठेवलेले 10 हजार रुपये किंमतीचे मणीमंगळसूत्र व 55 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 65 हजार रुपयांचा ऐवज घेवून पोबारा केला. पहाटे घडलेल्या या घटनेची नोंद सोमवारी सायंकाळी पोलीस दप्तरी करण्यात आली.

याच घटनेच्या अनुषंगाने सध्या सोशल मीडियात एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून त्यात पाच-पन्नास नागरिक हातात काठ्या-लाठ्या व बॅटर्‍या घेवून आसपासच्या परिसरातील झाडाझुडपात चोरट्यांचा शोध घेत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओसोबत एक लिखीत संदेशही जोडण्यात आला असून सदरची घटना सोमवारी रात्री 10 वाजता याच अ‍ॅब्रोसिया निवासी संकुलात घडल्याचे सांगण्यात आले आहे. त्यावरुन संगमनेर शहराच्या उपनगरीय परिसरासह आसपासच्या ग्रामीणभागात चोरट्यांची प्रचंड दहशत निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

एकीकडे दरोडेखोर व चोरट्यांचा वावर आणि त्या अनुषंगाने सोशल माध्यमात फिरणार्‍या वेगवेगळ्या संदेशांनी सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले असताना दुसरीकडे शहर व परिसरात घडणार्‍या अन्य चोरीच्या व गुन्हेगारी घटनांमध्येही वाढ होत असल्याचे दिसत आहे. सोमवारी सकाळी ‘पारनेर-नाशिक’ या परिवहन महामंडळाच्या बसमधून संगमनेरात पोहोचलेल्या दिवाणी न्यायालयाच्या सहाय्यक अधीक्षकांचेच पाकीट मारण्याचा प्रकार समोर आला आहे. मूळ नगरचे मात्र सध्या नोकरीनिमित्त घुलेवाडीत राहणारे खान महमूद बिबन हे सोमवारी सकाळी याच बसमधून संगमनेरात पोहोचले. ते बसमधून खाली उतरत असतानाच अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशावर डल्ला मारीत त्यांचे पाकीट लांबविले.

या पाकिटात रोख 13 हजार 200 रुपयांसह त्यांच्या घराच्या चाव्या व काही महत्त्वाची कागदपत्रेही होती. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला. संगमनेर बसस्थानकात होणारी वाहनांची आणि प्रवाशांची वर्दळ बघता या ठिकाणी कायमस्वरुपी पोलीस तैनात करण्याची गरज आहे. मात्र प्रत्यक्षात वारंवार महिलांच्या गळ्यातील दागिने, प्रवाशांचे पाकीटे लांबविण्याच्या घटना घडत असताना पोलीस त्याकडे गांभीर्याने बघत नसल्याने अशा प्रकारच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून बसस्थानकावर अभावानेच पोलिसांचे दर्शन घडते.

एकामागून एक घडणार्‍या चोरीच्या या घटना कमी होत्या की काय म्हणून त्यात एका लबाडीच्या घटनेचाही समावेश झाला. अर्थात बँकांना दोन दिवस सुट्टी असल्याने शुक्रवारी (ता.23) दुपारी पावणेचार वाजता घडलेल्या या घटनेची नोंद सोमवारी रात्री पावणेआठ वाजता करण्यात आली. या घटनेत मूळचे लहित (ता.अकोले) येथील रहिवासी मात्र हल्ली संगमनेरातील पंपींग स्टेशन परिसरात राहणार्‍या सतीश प्रकाश चौधरी हे यूनियन बँक ऑफ इंडियाच्या कासारवाडी शिवारातील एटीएममधून पैसे काढत असतांना तेथे आलेल्या एका अज्ञात इसमाने त्यांचे लक्ष विचलित करुन एटीएम कार्डची अदलाबदल केली व त्यांच्या खात्यातील 22 हजार 600 रुपयांची रक्कम त्यांच्या डोळ्यादेखत लांबविली.


अतिशय चलाखीने घडलेला हा प्रकार लक्षात येईपर्यंत संबंधित चोरटा फिर्यादीचे बँक खाते रिकामे करुन पसार झाला होता. याबाबत फिर्यादी बँकेत तक्रार करण्यासाठी गेले असता दोन दिवस बँकांना सुट्टी असल्याने त्यांना प्रतीक्षा करावी लागली. मात्र सोमवारी बँक उघडताच ते शाखा व्यवस्थापकांना भेटले असता त्यांनी सदरील प्रकार फौजदारी असल्याने त्यांना पोलीस ठाण्यात जावून तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार काल सायंकाळी उशीराने त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या आठवड्यात शहरालगतच्या सुकेवाडी, पावबाकी परिसरात सहा सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घालीत चार घरे फोडून जवळपास पाच लाखांचा मुद्देमाल लांबविला होता. या घटनेनंतर शहराच्या उपनगरांसह आसपासच्या गावांमध्ये विस्तारलेल्या काही नागरी वसाहतींच्या परिसरात चोरट्यांचा वावर दिसून आल्याने तेव्हापासून अनेक भागांमधील नागरिक रात्रीचा जागता पहारा देत असल्याचेही समोर आले असून; साधव रहा, जागे रहा.. अशा आशयाचे वेगवेगळे संदेशही गावोगावच्या सोशल मीडियात फिरत असल्याचे समोर आले आहे. यावरुन चोरीच्या या घटना रोखण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याने आता नागरिकच आपली सुरक्षा करीत असल्याचेही दिसू लागले आहे.


दिवसा वेगवेगळ्या वस्तू घेवून फेरी विक्रेत्याप्रमाणे गल्ली-बोळात फिरुन माहिती संकलीत केली जाते. त्यातून बंद असलेली, सधन असलेली, घरात म्हातारी माणसं असलेली घरं निवडून रात्री त्यावर धावा केला जातो. अशाप्रकारचे सोशल मीडियातील काही संदेश सध्या तुफान व्हायरल होत असून संगमनेरात अचानकपणे वाढलेल्या अशाप्रकारच्या फेरी विक्रेत्यांची संख्या पाहता त्यात तथ्य असल्याचेही जाणवू लागल्याने काही वसाहतींमधून नव्याने हाळ्या ठोकीत काहीतरी विकण्याचे नाटक करणार्‍यांना हुसकावून लावण्याचे प्रकारही कानावर आले आहेत. त्यावरुन दरोडेखोर व चोरट्यांची दहशत स्पष्टपणे दिसत असून पोलीस सुरक्षेची हमी देण्यास सपशेल कमी पडले आहेत.

Visits: 22 Today: 1 Total: 114974

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *