नाताळ हा प्रेमाचा व शांतीचा संदेश देणारा सण ः थोरात सुदर्शन निवासस्थानी ‘गाणी येशूच्या जन्माची’ कार्यक्रम उत्साहात


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मानवता हाच जगातील सर्वात मोठा धर्म आहे. सुख-समाधान व शांतीसाठी सर्वांनी प्रेमाने एकत्र राहावे हा संदेश देणारा नाताळ हा सण असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले असून नाताळनिमित्त सर्व ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.

संगमनेरातील सुदर्शन निवासस्थानी गाणी येशूच्या जन्माची या कार्यक्रमानंतर शुभेच्छा देताना ते बोलत होते. याप्रसंगी कांचन थोरात, कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. हसमुख जैन, तर आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या निवासस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, डॉ. मैथिली तांबे या उपस्थित होत्या. यावेळी आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, अ‍ॅड. अरविंद राठोड, बाळासाहेब घोडके, धर्मगुरू जॉर्ज चोपडे, प्रतीक खरात, सत्यानंद कसाब, प्रवीण रोहम, अल्फा खरात, प्रज्ज्वल चोपडे आदी उपस्थित होते. यावेळी समूहाने येशू जन्माची विविध गीते गायली.

आज जगाला येशू ख्रिस्तानी दिलेल्या दया, क्षमा शांती या संदेशाची नितांत गरज आहे. समाजातील गरीब, वंचित यांना मायेने ख्रिस्ताने जवळ केले. आचार, विचार याचबरोबर शत्रूलाही प्रेमाने जिंकण्याचे सामर्थ्य त्यांनी सर्वांना दिले. जागतिक पातळीवर नाताळ हा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. बंधूभाव जपताना प्रत्येक मनुष्यावर प्रेम करा हा मोलाचा संदेश त्यांनी सर्वांना दिला असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. तर आमदार डॉ. तांबे म्हणाले, माणसाने रागावर नियंत्रण मिळवत प्रेमाने जग जिंकायला हवे. हा प्रेमाचा संदेश संपूर्ण जगाला येशूंनी सर्वांना दिला असून आज अशांततेच्या वातावरणात हा प्रेमाचा संदेश मोलाचा ठरत आहे. संपूर्ण भारतातही हा अत्यंत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. संगमनेरमध्येही नाताळ सण मोठ्या उत्साहाने साजरा होत असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक चोपडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. बाबा खरात यांनी केले तर सत्यानंद कसाब यांनी आभार मानले.

Visits: 9 Today: 1 Total: 117233

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *