मधुमक्षिका पेट्यांमुळे परागीकरणाला मिळाला वेग वीरगाव येथील शेतकर्याचा कलिंगडात भन्नाट प्रयोग
नायक वृत्तसेवा, अकोले
उत्पादन आणि उत्पन्न या सूत्रामुळे शेतीत कमालीचे बदल झाले आहे. त्यानुसार शेतीत कीटकनाशकांचा बेसुमार वापर वाढला आहे. यामुळे परागीकरण करणार्या कीटकांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. परंतु, परागीकरण करण्यासाठी मधमाशांची महत्त्वाची भूमिका असल्याने वीरगाव (ता.अकोले) येथील प्रगतिशील शेतकरी तथा रोपवाटिका व्यावसायिक वीरेंद्र थोरात यांनी स्वतःच्या सहा एकर कलिंगड पिकात दोन मधुमक्षिका पेट्या बसविल्या आहेत. त्यामुळे परागीकरण होवून फुलांचे फळांत रुपांतर होण्यास मोठी मदत होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
एरव्ही निकोप पिकासाठी परागीकरण महत्त्वाची प्रक्रिया असते. या प्रक्रियेत मधमाशी आणि इतर कीटक प्रभावी वाहक असतात. सद्यस्थितीत अनेक कीटक नामशेष झाले आहेत. त्यामुळे मधमाशांद्वारे उत्पादन वाढवणे शक्य आहे. याच दृष्टीकोनातून प्रगतिशील शेतकरी वीरेंद्र थोरात यांनी कलिंगड पिकात दोन मधुमक्षिका पेट्या बसविल्या आहेत. या एका पेटीत साधारण इटालियन मेलिफेरा जातीच्या ५ ते १० हजार माशा ठेवल्या आहेत. त्यातील एक राणी माशी असून ती दिवसाकाठी हजार ते पंधराशे अंडी देते. तर दिवसभरात सुमारे हजार फुलांवर ती बसते.
या प्रक्रियेमुळे परागीकरण होण्यास मोठी मदत झाली असून, आजमितीला फुलांचे फळांत रुपांतर होण्याची प्रक्रिया होत आहे. विशेष म्हणजे मधमाशांची वसाहत असलेल्या ठिकाणी असलेल्या दुसर्या पिकांनाही याचा मोठा फायदा होत. या मशमाशांच्या पेट्यांमुळे नक्कीच उत्पादनात ४० ते ५० टक्के वाढ होईल असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला आहे. त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी देखील भेटी देत आहेत.
मधमाशांशिवाय हे जग अपूर्ण आहे. त्यांची संख्या कमी होणे धोकादायक आहे. विशेष म्हणजे शेतीत मधमाशांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने शेतकर्यांनी मधमाशी संवर्धन करण्याबरोबर शेतीत मधुमक्षिका पेट्या बसवाव्यात.
– वीरेंद्र थोरात (प्रयोगशील शेतकरी-वीरगाव)
मधमाशी केवळ परागीभवन करण्यातच व्यस्त असतात. त्यामुळे फळधारणा अधिक होत असते. याचा कुठलाही परिणाम पिकावर होत नसतो. मधमाशा आहे म्हणून जीवन सुखी आहे. अन्यथा मधमाशा नष्ट झाल्या तर जग नष्ट होण्यास वेळ लागणार नाही.
– प्रा. डॉ. लक्ष्मण घायवट (जीवशास्त्र अभ्यासक)