जानेवारीत संगमनेरात भरणार माहेश्वरी समाजाचे परिचय संमेलन! अध्यक्ष मनीष मालपाणी; देशभरातील माहेश्वरी समाजातील उपवरांचा सहभाग
नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील राजस्थान युवक मंडळाने महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभा, माहेश्वरी समाज आणि मालपाणी परिवाराच्या सहयोगाने नूतन वर्षात अखिल भारतीय विवाह योग्य माहेश्वरी युवक-युवतींसाठी परिचय संमेलनाचे आयोजन केले आहे. गेल्या दहा वर्षांपासून नियमितपण ेआयोजित होणार्या या संमेलनातून आजवर समाजातील शेकडो उपवरांना मनासारखे स्थळ प्राप्त होवून त्यांचे वैवाहिक जीवन सुखमय बनले आहे. यावर्षी होणार्या या संमेलनात माहेश्वरी समाजातील उपवर मुला-मुलींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी केले आहे.
नूतन वर्षातील 8 जानेवारी रोजी कासारवाडी रस्त्यावरील मालपाणी हेल्थ क्लबच्या प्रशस्त परिसरात होणार्या या संमेलनात एकाचवेळी देशभरातील विविध ठिकाणची स्थळे प्रत्यक्ष पाहण्याची व त्यांच्याशी समोरासमोर बोलण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे. अत्यंत हायटेक पद्धतीने केले जाणारे नियोजन, उपक्रमाला सातत्याने मिळणारा मोठा प्रतिसाद आणि भव्यता यामुळे मागील प्रत्येक संमेलनांच्या यशाचा आलेख सातत्याने उंचावत राहिला आहे. देशाच्या कानाकोपर्यातून समाजातील युवक-युवती आपल्या पालकांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहताहेत या संमेलनाचे वैशिष्ट्य आहे. या संमेलनात सहभागी होवू इच्छिणार्यांनी येत्या 25 डिसेंबरपर्यंत नाव नोंदणी करावी असे आवाहनही करण्यात आले आहे.
नाव नोंदणी करण्यासाठी माहेश्वरी सभेच्या प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा व तालुकाध्यक्षांकडे नोंदणी फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या संमेलनासाठी नाव नोंदणी करणार्या प्रत्येक उपवर युवक-युवतीची सचित्र परिपूर्ण माहिती असलेल्या पुस्तिकेचेही यानिमित्ताने प्रकाशन होणार असून त्यामाध्यमातूनही आपल्या पाल्यासाठी योग्य जोडीदाराची निवड करता येणार आहे. संमेलनस्थळी अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. त्यात पत्रिका जुळविण्यासाठी संगणक व पारंपरिक पद्धतीच्या पंडिताचीही सोय करण्यात येणार आहे. गेल्या दहावर्षांपासून समाज परिवर्तनाच्या चळवळीत महत्वाची भूमिका बजावणार्या या उपक्रमात माहेश्वरी समाजातील अधिकाधिक युवक-युवतींनी नाव नोंदणी करावी असे आवाहन माजी कार्याध्यक्ष कैलास राठी, राजस्थान युवक मंडळाचे कार्याध्यक्ष रोहित मणियार, उपाध्यक्ष सम्राट भंडारी, सचिव आशिष राठी, खजिनदार उमेश कासट, सहसचिव ओम इंदाणी, सहखजिनदार व्यंकटेश लाहोटी यांच्यासह मंडळाच्या सदस्यांनी केले आहे.