अखेर बलात्कार व गर्भपात प्रकरणात ‘त्या’ दोघा शिक्षकांचे निलंबन! जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकार्यांची कारवाई; हरीबाबावाडी व मालदाडमधील शिक्षक..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राहुरी तालुक्यातील एका घटस्फोटीत शिक्षिकेशी मैत्री करुन नंतर तिला लग्नाचे आमिष दाखवित आपल्या प्रेमजाळात फसवणार्या आणि त्यातून गर्भधारणा झाल्यानंतर बळजोरीने बेकायदा गर्भपात घडवून आणणार्या घुलेवाडीच्या योगेश थोरात या नराधम शिक्षकासह त्याला साथ देणार्या मालदाडच्या गणेश शेंगाळ याला आज जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकार्यांनी अखेर निलंबित केले. मात्र सदर प्रकरण उघड होवून पंधरवडा उलटला तरीही पोलिसांना मात्र अद्यापही त्यांचा ठावठिकाणा मात्र लागलेला नाही. निलंबित करण्यात आलेला थोरात हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत गुरुकूल मंडळाचा अधिकृत उमेदवार होता. या दोघाही शिक्षकांच्या निलंबनाने जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चांनाही उधाण आले आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार मूळ राहुरी तालुक्यातील रहिवाशी असलेल्या या 41 वर्षीय शिक्षिकेची संगमनेर तालुक्यातील घुलेवाडीत राहणार्या योगेश अण्णासाहेब थोरात या जिल्हा परिषदेच्या शिक्षकासोबत 2019 साली जुन्या पेंशन हक्क संघटनेच्या माध्यमातून ओळख झाली. या दरम्यान दोघेही राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारीही करीत असल्याने दोघांचा एकमेकांशी फोनवरुन संपर्कही वाढला होता. त्यातूनच त्यांच्यात जवळीक वाढू लागल्याने सदर शिक्षिकेने आपण घटस्फोटीत असून आपल्याला 18 वर्षीय मुलगा असल्याचे त्याच्या निदर्शनास आणून दिले होते.
मात्र डोक्यात वासना शिरलेल्या योगेश थोरात याने ‘असल्या गोष्टींचा माझ्यावर काही फरक पडत नाही, माझे तुझ्यावर अतोनात प्रेम आहे. मी तुझ्यासोबत लग्न करुन तुला आयुष्यभर सांभाळेल’ अशी भावनिक साद घालीत त्याने तिला आपल्या जाळ्यात ओढले. त्यातून त्या दोघांमध्ये जवळीक वाढत गेल्याने कधी ती शिक्षीका संगमनेरात येवून त्याला भेटत, तर कधी थोरात राहुरीत जावून प्रेमाच्या आणाभाका घेत. या दरम्यान त्याने त्या शिक्षीकेकडून साडेतीन लाखांची रक्कमही उकळली. त्यातील एक लाख रुपये त्याने तिला परतही केले. त्यानंतरच्या कालावधीत तो त्या शिक्षीकेला घेवून अनेक वेळा पुण्यात जावूनही रहायचा व प्रत्येकवेळी लग्न आणि आयुष्यभर सांभाळाचे आमिषही दाखवायचा.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तो अचानक ‘घरातील मंडळी माझ्या लग्नासाठी तगादा करीत असल्याचे व माझी आई मी सांगेल त्याच मुलीशी लग्न करावे लागेल म्हणून सारखा आग्रह करीत आहे’ असे त्या शिक्षिकेला सांगू लागला. त्यावर त्या शिक्षिकेने ‘तू मला फसवू शकत नाहीस?, प्रेम माझ्याशी अन् लग्न दुसरीशी हे कसे चालेल’ अशी विचारणा केली असता, ‘ठीक आहे! मी नाही करणार लग्न’ असे म्हणत त्याने चर्चा थांबवली. दोन महिन्यांनी जानेवारी 2022 मध्ये त्याने पुन्हा तोच विषय काढून आपल्या घरातील माणसं आता आपलं ऐकत नसल्याचं आणि लग्नासाठी एकसारखा तगादा सुरु असल्याचे सांगू लागला. ‘तू जर मला लग्न करु दिले नाहीस तर दोन-चार दिवसांत माझा मृतदेहच बघायला मिळेल’ असा भावनिक दमही त्याने त्या असाहाय्य शिक्षिकेला भरला.
त्यामुळे सदरची शिक्षिका त्याच्या भूलथापांना बळी पडली. मात्र त्यावरही त्याने ‘मी केवळ आईसाठी लग्न करतोय, मात्र माझं तुझ्यावरच प्रेम आहे. मी तुला कधीही अंतर देणार नाही’ असे म्हणतं चक्क त्याच्या अंगाला हळद लागलेली असतानाही तो संगमनेरहून राहुरीला तिला भेटण्यासाठी गेला. त्याचे लग्न झाल्यानंतरही तो त्या शिक्षिकेला भेटत व मला मुलगी पसंद पडलेली नाही, मी लवकरच तिच्यापासून फारकत घेईल. त्यानंतर आपण दोघंही नोंदणी पद्धतीने विवाह करु असे तो म्हणू लागला. मात्र त्या शिक्षिकेने लग्न झाल्याशिवाय आपल्यात कोणतेही संबंध प्रस्थापित होणार नसल्याचे त्याला ठणकावले व ती त्याच्यापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करु लागली. याच दरम्यान गेल्या 25 जून रोजी त्याने सदर शिक्षिकेला फोन करुन संगमनेरला बोलावले व रात्री आठच्या सुमारास आपल्या इनोव्हा कारने तिला सोडण्यासाठी राहुरीला जात असताना कोकणगावजवळ आडवाटेला वाहन थांबवून त्या नराधमाने वाहनातच बळजबरीने त्या शिक्षिकेवर बलात्कार केला.
त्यातून सदरील शिक्षिकेला गर्भ राहिला. ही गोष्ट योगेश थोरात याला समजल्यानंतर सुरुवातीला त्याने नारळाच्या पाण्यातून गर्भपाताच्या गोळ्या मिसळून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या पोटातील गर्भ पाडला. त्यामुळे संतापलेल्या त्या शिक्षिकेने त्याच्याशी असलेले सगळे संबंध तोडले. या दरम्यान सदरील शिक्षिका संगमनेरातील एका खासगी रुग्णालयात जाण्यासाठी संगमनेरात आली असता योगेश थोरात व त्याचा साथीदार गणेश शेंगाळ या दोघांनी तिला बळजबरीने वाहनात कोंबून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तेथून ते ‘त्या’ रुग्णालयात गेले, काही दिवस रुग्णालयात उपचार घेतले मात्र या दरम्यान योगेशने तिच्याशी कधीही संपर्क केला नाही.
रुग्णालयात असताना तिला योगेश थोरात हा नालायक प्रवृत्तीचा शिक्षक असून त्याने आत्तापर्यंत 7 ते 8 महिलांसोबत असेच प्रकार केल्याचे व गर्भपाताच्या गोळ्याही शहरातील एका महिलेकडून आणल्याचे समजल्यावर याच्यापासून आपल्या जीवितास धोका असल्याचे ओळखून तिने गेल्या 20 सप्टेंबर रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार शहर पोलिसांनी घुलेवाडीत राहणारा जिल्हा परिषदेच्या हरीबाबावाडीतील शिक्षक योगेश अण्णासाहेब थोरात व त्याचा सहकारी मालदाड जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक गणेश शेंगाळ या दोघांविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 376, 313, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकीता महाले यांच्याकडे दिला. मात्र त्या दोघांनाही जेरबंद करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नसताना आता जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकार्यांनी त्या दोघांनाही निलंबित केले आहे.